मालिका म्हटलं तर १२ ते १५ तास कलाकार मंडळी काम करत असतात. यादरम्यान त्यांना अनेक वाईट अनुभव येतात. असाच काहीसा धक्कादायक अनुभव एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे. या प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे.

‘ये है मोहब्बतें’, ‘नागिन ३’, ‘कुछ तो है: नागिन के एक रंग में’ या मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री कृष्णा मुखर्जीनं ‘शुभ शगुन’ मालिकेच्या सेटवरील धक्कादायक प्रसंग शेअर केला आहे. मालिकेच्या सेटवर निर्मात्याकडून झालेल्या छळाविषयी ती सोशल मीडियावर व्यक्त झाली आहे.

हेही वाचा – ‘जुनं फर्निचर’ चित्रपटात सलमान खान झळकणार होता ‘या’ भूमिकेत, महेश मांजरेकर खुलासा करत म्हणाले, “त्याला…”

कृष्णाने पोस्टमध्ये लिहिलं, “मला कधीही मनातील गोष्ट सांगायची हिंमत नव्हती. पण आज मी निर्णय घेतला की ही गोष्ट अजून मनात नाही ठेवू शकतं. मी सध्या कठीण काळातून जात असून मागील दीड वर्ष माझ्यासाठी अजिबात सोपे नव्हते. मी खूप अस्वस्थ आहे. जेव्हा मी एकटी असते तेव्हा खूप रडत असते. हे सर्व सुरू झालं, जेव्हा मी ‘दंगल’ वाहिनीवरील शेवटची मालिका ‘शुभ शगुन’ करायला सुरुवात केली. माझ्या आयुष्यातला हा सर्वात वाईट निर्णय होता.”

पुढे अभिनेत्रीनं लिहिलं, “मी दुसऱ्यांचं ऐकून ही मालिका करण्याचा निर्णय घेतला होता. मी स्वतः ही मालिका करू इच्छित नव्हती. या मालिकेच्या प्रोडक्शन हाउस आणि निर्माता कुंदन सिंहनं मला खूप त्रास दिला. एवढंच नाही तर ऐकवेळ त्यानं मला मेकअप रुममध्ये बंद केलं होतं. तेव्हा मी आजारी होते. या मालिकेचा निर्माता मला मानधन देखील वेळच्या वेळी देत नव्हता. त्यामुळे मी शूटिंगला न जाण्याचा निर्णय घेतला. जेव्हा मी आजारी असताना मेकअप रुम कपडे बदलत असायची तेव्हा बाहेरून जोरजोरात दरवाजा वाजवायचे, जसं काही दरवाजा आता तोडणारचं आहेत.”

हेही वाचा – ‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्रीची कलर्सच्या नव्या ‘अबीर गुलाल’ मालिकेत वर्णी, पोस्ट करत म्हणाली, “लवकरच…”

“मला पाच महिन्यांचं मानधन मिळालं नाहीये. यासाठी मी प्रोडक्शन हाउस आणि ‘दंगल’ वाहिनीकडेही गेले. परंतु मला कोणाकडूनही उत्तर मिळालं नाही. याऐवजी मला धमकी दिली जात होती. मला असुरक्षित वाटतं आहे. याप्रकरणी मी अनेकांकडून मदत मागितली. मात्र कोणीही मदत केली नाही,” असं स्पष्ट कृष्णा सांगितले.