प्रकाश मेहरा यांच्या ‘जंजीर’ चित्रपटामुळे लोकप्रियतेच्या एका नवीन टप्प्यावर पोहोचलेला प्रख्यात अभिनेता अमिताभ बच्चन याने लेखक सलीम खान आणि जावेद अख्तर जोडीने त्याच्यावर दाखवलेल्या विश्वासासाठी आभार मानले आहेत. या चित्रपटाने अमिताभला ‘अ‍ॅंग्री यंगमॅन’ ची ओळख दिली. १९७३ मध्ये आलेल्या या चित्रपटाने या आधीच्या त्याच्या अनेक अयशस्वी चित्रपटांची मालिका संपुष्टात आणली.
जंजीर चित्रपटाच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त ७० वर्षीय अमिताभने ट्विटरवर लिहिले आहे की, अनेक वर्षे सरली… ही चांगली संधी आहे… सलीम आणि जावेद यांनी या चित्रपटासाठी माझा विचार केला, त्याबद्दल धन्यवाद… मला नेहमीच या गोष्टीचे आश्चर्य वाटले की एका फ्लॉप न्युकमरवर त्यांनी विश्वस कसा काय दाखवला… या चित्रपटाबरोबर खूप सा-या आठवणी जोडलेल्या आहेत… काय दिवस होते ते.
या चित्रपटाने संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीला एक नवी दिशा दिली आणि गुलाबी स्वप्नरंजनात हिंदोळे खाणारा हिंदी सिनेमा ‘जंजीर’ चित्रपटानंतर सामान्य माणसाच्या संघर्षाचे आणि चुकीच्या गोष्टीं विरोधात आपले म्हणणे मांडण्याचे साधन बनला.
हा चित्रपट ११ मे १९७३ रोजी प्रदर्शित झाला होता. अमिताभशिवाय  जया बच्चन, प्राण, अजीत आणि बिंदू यांनी चित्रपटातील मुख्य भूमिकांसाठी काम केले होते. अपूर्व लखिया हे या चित्रपटाचा रिमेक बनवत आहेत, ज्यात राम चरण तेजा आणि प्रियांका चोप्रा यांच्या प्रमूख भूमिका आहेत.