गेल्या काही दिवसांपासून देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. आज लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा पार पडला. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान पार पडलं. अगदी सामान्य माणसांपासून ते सेलिब्रिटीजपर्यंत सगळ्यांनी मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
अनेक कलाकारांनी मतदान केल्यानंतर त्यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं. तर काही कलाकारांचं नाव मतदारयादीत आलं नाही म्हणून ते माघारी परतले. प्रत्येकाने आपल्याबरोबर घडलेला अनुभव आज सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदेही आज त्यांच्या कुटुंबासमवेत आपलं मत नोंदवायला गेले होते. केदार शिंदेंची लेक सना शिंदे हिने तिच्या सोशल मीडियावर आई बाबांबरोबरचा फोटो शेअर करत मतदानाचा हक्क बजावल्याचं सांगितलं आहे.
अभिनेत्री सना शिंदेने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर वडील केदार शिंदे आणि आई बेला शिंदेबरोबर फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देत तिनं लिहिलं, “आज मला मतदानाचा सर्वात अनपेक्षित अनुभव आला. मी मतदान केंद्रावर गेले तेव्हा जवळपास ३६ अंश सेल्सिअस तापमान होतं. ४ तास घामाने भिजल्यानंतर अखेर मला मतदानाचा हक्क बजावता आला.”
सनाने शेअर केलेला हा फोटो केदार शिंदे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देतं त्यांनी लिहिलं, “चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर बजावलेला हक्क.”
दरम्यान, सना शिंदेच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, २००४ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटात सनाने बालकलाकाराची छोटीशी भूमिका साकारली होती. हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे.
सनाने तिच्या वडिलांबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनदेखील काम केलं आहे. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून तिने काम केलं आहे. तर केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहिर’ ‘या चित्रपटाद्वारे सनाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटात सनासह अंकुश चौधरी प्रमुख भूमिकेत झळकला होता.