07 June 2020

News Flash

८. गणाधीश : २

इंद्रियांना ताब्यात आणून साधनमार्गावर अग्रेसर होण्यासाठी गणाधीश अशा सद्गुरूचाच आधार आवश्यक असतो.

आपलं समस्त जीवन हे इंद्रियाधीन आहे आणि साधनपथावर पाऊल टाकताना या इंद्रियांची जी खळबळ सुरू असते तिचं आव्हान तीव्रतेनं जाणवू लागतं. या इंद्रियांना ताब्यात आणून साधनमार्गावर अग्रेसर होण्यासाठी गणाधीश अशा सद्गुरूचाच आधार आवश्यक असतो. गण म्हणजे इंद्रियगण. आता जी गोष्ट आपण आपली मानतो त्यावर आपला ताबा हवा ना? पण ही इंद्रियं ‘आपली’ असूनही ती आपल्या ताब्यात नाहीत! या इंद्रियांद्वारे आपलं सततच जे बाहेर धावणं सुरू आहे त्या धावण्यावर आपलं म्हणजेच आपल्या मनाचं नियंत्रण नाही. तेव्हा आपण इंद्रियगणांचे गुलाम आहोत. त्यांच्या बंधनात अडकून आहोत. भ्रम आणि मोहानं जगत आहोत. पण खरंच इंद्रियं आपल्यावर मालकी गाजवतात का हो? की इंद्रियांच्या माध्यमातून मनच आपल्याला फरपटत नेतं? थोडा विचार केला की लक्षात येतं की, इंद्रियं तर नुसती स्थूल आणि सूक्ष्म अशी साधनं मात्र आहेत. स्थूल कर्मेद्रियांद्वारे आपण प्रत्यक्ष कृती करतो आणि सूक्ष्म ज्ञानेंद्रियांद्वारे त्या कृतीसाठी चालना मिळते. पण हा सारा मनाचाच खेळ असतो. मनाच्याच इच्छेनुसार आपण कृती करतो. मनाविरुद्ध जाऊन कृती करणं आपल्या जिवावर येतं. इतकं आपलं आपल्या मनावर जिवापाड प्रेम आहे. मागेच एका सदरात आपली चर्चा झाली होती की, इंद्रियांना आवड-निवड नाही. डोळ्यांना पाहायची इच्छा नाही, कानांना ऐकायची इच्छा नाही, मुखाला बोलायची इच्छा नाही. अमुक पहावं, अमुक पाहू नये, अमुक ऐकावं, अमुक ऐकू नये; हे सगळं मनच ठरवतं. इंद्रियं नुसती त्या मनाच्या इच्छेप्रमाणे वागत असतात. तेव्हा खरं नियंत्रण हवं मनावर. इंद्रियांवर नव्हे. मग इंद्रियगणांवर मालकी मिळवायला का सांगतात? मनावरच मालकी मिळवायला का सांगत नाहीत? वर्गात सर्वात मस्तीखोर मुलाला जसं वर्गप्रमुख करतात ना? तसंच आहे हे! ज्या मनाच्या ओढीमुळेच इंद्रिय बहिर्मुख आहेत त्या मनालाच त्या इंद्रियांवर दंडुका उगारायला सांगायचं आहे. मग जो मुलगा वर्गात सर्वात जास्त दंगामस्ती करतो तो जेव्हा इतर मुलांना शांत रहायला सांगतो तेव्हा मुळात तोच शांत झाल्यानं दंगा कमी झाला असतो! अगदी त्याचप्रमाणे मन जेव्हा इंद्रियांवर नियंत्रण आणू पाहतं तेव्हा एकप्रकारे स्वत:वरच ते नियंत्रण आणणं असतं! अर्थात हे देखील इतकं सोपं नाही. इंद्रियांना अंतर्मुख करण्याच्या निमित्ताने मनावर नियंत्रण आणण्याची कला स्वत:ची स्वत:ला शिकता येत नाही. समर्थही सांगतात, ‘‘सद्गुरूविण ज्ञान कांहीं। सर्वथा होणार नाहीं। अज्ञान प्राणी प्रवाहीं। वाहातचि गेले।।’’ (दास० द. ५, स. १). जीवनात इंद्रियांचा वापर करीत मनानं माजवलेला  गोंधळ आपल्या लक्षात येऊ शकत नाही. कारण मनाच्या खेळात आपणही मनापासून सामील आहोत. त्यामुळे वासनावृत्तींच्या प्रवाहात आपण वाहात आहोत. भ्रम, आसक्ती आणि मोहातून मग जी जी कृती घडते ती आत्मघातकच असते. समर्थाच्या शब्दांत सांगायचं तर, ‘‘ज्ञानविरहित जें जें केलें। तें तें जन्मासि मूळ जालें।’’ भ्रम, मोह आणि आसक्तीतून जी मनमानी सुरू आहे त्यातूनच प्रारब्धाची बीजं पेरली जात आहेत. त्यामुळे हा खेळ चिरंतन सुरू आहे. त्यासाठीच या इंद्रियगणांवर अर्थात मनावर ताबा आणण्यासाठी गणाधीश अशा सद्गुरूची नितांत गरज आहे. समर्थ सांगतात, ‘‘ज्ञानविरहित जें जें केलें। तें तें जन्मासि मूळ जालें। म्हणौनि सद्गुरूचीं पाउलें। सदृढ धरावीं।।’’अज्ञानानं जगणं थांबवायचं असेल तर सद्गुरूंच्या बोधाच्या वाटेवर दृढ पावलं टाकलीच पाहिजेत. जसजशी ही वाटचाल सुरू होईल तसतसं या ‘गणाधीशा’च्या बोधानुसार मनाचा भ्रामक प्रभावही ओसरेल. त्यासाठी या गणाधीश सद्गुरूला वंदन असो!
चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2016 1:41 am

Web Title: organs to bring under control
टॅग Confusion
Next Stories
1 ७. गणाधीश : १
2 ६. विचार संस्कार
3 ५. मनोबोधाची पृष्ठभूमी : २
Just Now!
X