News Flash

७८. दु:ख ऋण

नवव्या श्लोकात मनाच्या दु:खाकडे संकेत होता आणि दहाव्या श्लोकात देहदु:खाकडे बोट आहे.

नवव्या श्लोकात मनाच्या दु:खाकडे संकेत होता आणि दहाव्या श्लोकात देहदु:खाकडे बोट आहे. दहाव्या श्लोकाच्या प्रचलित अर्थात असं नमूद आहे की, ‘‘ज्या दु:खांनी आपला जीव तळमळतो त्याची आठवणच मनातून काढून टाकावी..’’ मननार्थाच्या विवरणाच्या सुरुवातीलाच, ही गोष्ट आपल्याला अशक्यप्राय वाटते, हेदेखील नमूद आहे. तरी एका साधकानं म्हटलंय की, ‘‘कदाचित आपण मानसिक अस्वास्थ्यावरील हा उपाय सांगितला आहे, पण या उपायाची (म्हणजे ज्या दु:खांनी आपला जीव तळमळतो त्याची आठवणच मनातून काढून टाकावी) अंमलबजावणी कशी करायची? कारण मनावर ताबा मिळवणं ही फार अवघड प्रक्रिया आहे.’’  खरं तर विचारांचा प्रवाह वाहात असताना मध्येच थांबून सहसा उत्तर देता येत नाही. याचं एक कारण असं की जो प्रश्न वाचकाच्या मनात येतो त्याचं उत्तर ओघानं पुढे येतंही. तरीही अपवाद करून या मुद्दय़ाचा विचार करू. मनावर ताबा मिळवणं म्हणजे नेमकं काय आणि तो कसा मिळतो, हे या मनोयोगाच्या समारोपापर्यंत उलगडत जाणार आहेच. त्यामुळे त्याकडे आत्ताच वळत नाही. आता ज्या दु:खांनी आपला जीव तळमळतो त्याची आठवणच मनातून काढून टाकावी, म्हणजे नेमकं काय, ती प्रक्रिया कशी असावी, याकडे वळू. प्रथम एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे ती अशी की, देहदु:खं कितीही नकोशी वाटत असली तरी ती एकवेळ आपण सहन करतो, पण मानसिक दु:खं आपल्याला देहदु:खापेक्षाही क्लेशदायक वाटतात. आजार झाला, अशक्तपणा आला तरी त्याला आपण तोंड देऊ शकतो, पण जवळच्या माणसाच्या वियोगाचं मानसिक आणि भावनिक दु:ख स्वीकारणं सोपं नसतं. आपण ज्यांना आत्मीय मानतो त्यांचा वियोग होतो तेव्हा मन खचून जातं. हा वियोग मृत्यूनं घडवला असेल तरी एकवेळ मनाची समजूत काढता येते, पण हा वियोग मतभेदांतून झाला असेल तर त्याचं मानसिक आणि भावनिक दु:ख आत्यंतिक असतं. ते स्वीकारणं, सोसणं आणि पचवून त्यापलीकडे जाणं आव्हानात्मक असतं. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात असे अनेक चढउतार होत असतात आणि त्यांचा मनावर भावनिक परिणाम झाल्याशिवाय राहात नाही. बरेचदा आपण परिस्थितीबाबत किंवा व्यक्तिबाबत एकतर्फी अनेक गोष्टी गृहित धरतो. त्या गृहितांना धक्का बसतो आणि त्याचेही भावनिक परिणाम होतात. आपल्या मनातल्या कल्पना, भावना, विचार यांची जाण आपल्यालाच असते. त्या कल्पनांमागे, भावनांमागे, विचारांमागे आपण कुठवर वाहावत जातो, याचं भानही अनेकदा उरत नाही. ‘भावदिंडी’त म्हटलं होतं की, प्रेमाबाबत प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या असतात. प्रेमाची पातळी प्रत्येकाची वेगवेगळी असते. त्यामुळे एखाद्याच्या दृष्टीनं प्रेमाचा परमोच्च बिंदू गाठला गेला असतो, पण दुसऱ्याला ते प्रेम पुरेसं वाटत नसतं! त्यामुळे एकमेकांशी प्रेमाचं नात असलेल्या दोघांमध्येही प्रेमावरूनच तणाव निर्माण होतो! तेव्हा प्रत्येकाचा भावनिक, मानसिक आवाका आणि अपेक्षा वेगवेगळ्या पातळीवरच्या असल्यानं जगाकडून ज्या प्रेमाची आपल्याला अपेक्षा असते ते प्रेम मिळत नाही आणि त्यामुळेही दु:ख होतं. म्हणूनच या दु:खांकडे आपणच वेगळ्या दृष्टीनं पाहायला हवं. सुखच सुख वाटय़ाला आलं तर ते आपल्याला गाफील करतं, दु:खं मात्र आपले डोळे उघडतं आणि वास्तवाची जाण करून देतं. सुखांतून जे शिकता येत नाही ते दु:खं शिकवतात!  त्यामुळे आपल्या जीवनातील अनिश्चिततेचं भान आणून देणाऱ्या आणि खरं सुख, खरा आधार, खरी निश्चिंती नेमकी आहे तरी का आणि असेल तर ती कशी मिळेल, याचा शोध घेण्याची आस मनात निर्माण करणाऱ्या दु:खांचं आपण ऋणीच असलं पाहिजे.

-चैतन्य प्रेम

 

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2016 3:06 am

Web Title: samarth ramdas philosophy 10
Next Stories
1 ७७. स्व-प्रेरणा
2 ७६. प्रारब्ध प्रेरणा..
3 ७५. दु:ख-विवेक
Just Now!
X