रामनामाच्या आधारानं या जगात धन्यत्व येतं, हे सांगतानाच हे नाम घेण्यासाठी बाह्य़ाचरण आणि आंतरिक धारणा कोणती असली पाहिजे, हेच समर्थ ५७व्या श्लोकात सांगत आहेत. रामनाम घेताना सत्क्रियेची, सदाचाराची जोड असलीच पाहिजे. संतजनांनी ज्या गोष्टी त्याज्ज्य ठरविल्या आहेत त्यांचा त्याग आणि ज्या गोष्टी स्वीकारार्ह ठरविल्या आहेत त्या आचरणात आणण्याचा अभ्यास आणि जगात वावरताना मनात रामाचं, शाश्वताचं चिंतन आणि या जगाचा पाया शाश्वत तत्त्वच आहे, याची जाण, हाच तो सदाचार आहे. या सदाचारानुसार भक्ती केली पाहिजे, असं समर्थ सांगतात. एकदा या जगाचा पाया शाश्वत तत्त्वच आहे, हे भान टिकलं, तर मग जगण्यातल्या अशाश्वत गोष्टींच्या चढउतारांनी मनाचं हिंदकळणं कमी होऊ लागेल. या सत्क्रियेनंतर भक्ती ज्यायोगे दृढ होईल अशी गोष्ट समर्थ सांगतात ती आहे उपासनेचा नित्यनेम! चरणातल्या शुद्धलेखनानुसार सांगायचं तर ऊपासनेचा नित्यनेम! हा जो ‘ऊपासना’  शब्द आहे ना, तो उपसण्याच्या दीर्घ प्रक्रियेचंच सूचन करतो. अंतरंगात अशाश्वतासाठीची जी जी ओढ आहे, जे जे प्रेम आहे, जी जी तळमळ आहे ती सतत उपसून टाकायची आहे! हाच नित्यनेम आहे. त्यासाठी जगताना आपल्या धारणेचं, मनोभावाचं, विचारस्थितीचं सूक्ष्म अवलोकन करीत राहायचं आहे. मग ही धारणा, मनोभाव, विचारस्थिती अशाश्वताशी चिकटत आहे का, अशाश्वतामागे वाहात जात आहे का, अशाश्वतात रूतत आहे का, याचं सदोदित परीक्षण करून ती ओढ उपसून टाकण्याचा नित्य अभ्यास हाच नित्यनेम आहे! श्रीगोंदवलेकर महाराज यांनी ‘नित्यनेम’ या शब्दाची व्याख्या ‘नित्याचा नेम’ अशी केली आहे! जे जे नित्य आहे त्याचाच नेम करायचा. जे जे अनित्य आहे त्याच्या प्राप्तीचा नेम मनातून काढून टाकायचा. त्याची ओढ मनातून काढून टाकायची. अंतरंग सदोदित नित्याशी जोडण्याचा अभ्यास करायचा. जे अनित्य आहे ते कायमचं टिकणारं नाही. त्यामुळे त्या अनित्याच्या आधारावर नित्य समाधान लाभू शकत नाही. माणूस मात्र जगताना पदोपदी अनित्य अशा परिस्थितीतच नित्य समाधान शोधण्याची अविरत धडपड करतो. अनित्य वस्तूंच्या संग्रहातून नित्य सुख मिळविण्याची धडपड करतो. अनित्य अशा व्यक्तिंच्या आधारावर नित्य दिलासा टिकविण्याची धडपड करतो. काळाच्या पकडीत असलेले हे अनित्य आधार कधीच नित्य समाधान देऊ शकत नाहीत. त्यामुळे या अनित्याची ओढ मनातून उपसून टाकण्याचा नित्यनेम साधकाला आचरणात आणावाच लागतो. अनित्याचा संग, अनित्याचा सहवास सोडायची गरज नाही, पण तो सहवास अखंड टिकावा, या ओढीनं त्या सहवासाला अखंड सुखाचा आधार मानण्याची धारणा सोडायची गरज असते. जिथं देहाची शाश्वती नाही तिथं त्या देहाच्या आधारावर जी नाती निर्माण झाली आहेत, भौतिकात जे काही मिळवलं आहे, जे काही उभारलं आहे, जे काही गवसलं आहे ते शाश्वत कसं असेल, ही जाणीव जागवणारा जो नेम तोच खरा नित्यनेम आहे. तो साधला पाहिजे. जेव्हा शाश्वताचं, नित्याचं खरं भान येतं तेव्हाच अशाश्वताबद्दल, अनित्याबद्दल उदासीनता येते! उदासीनता म्हणजे एखाद्या गोष्टीच्या प्रभावातून बाहेर पडणे. जगाबाबत साधक उदासीन होतो, याचा अर्थ जगातून तो बाहेर पडत नाही, तर जगाच्या प्रभावातून तो बाहेर पडतो. जगातली कर्तव्यं तो अधिक नेमकेपणानं पार पाडतोच, पण मोहापायी कर्तव्यांची सीमारेषा ओलांडण्याची त्याची सवय नामशेष झाली असते. जोवर जगाच्या प्रभावापासून नि:संगता साधत नाही तोवर खरा सत्संग साधत नाही.

चैतन्य प्रेम

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
in Relationships Your self-esteem is in your hands
नातेसंबंध : आपला आत्मसन्मान आपल्या हाती!