जीवनात शाश्वत समाधान हवं असेल, तर ते ज्याच्या योगे लाभतं त्या सद्गुरूंच्या बोधाचं आचरणार्थ मनन, चिंतन आणि स्मरण हेच खरं ‘राम-भजन’ आहे, हे आपण जाणलं. आता समर्थ म्हणतात, ‘‘जपू नेमिला नेम गौरीहराचा!’’  त्या रामानं अर्थात सद्गुरूंनी कोणता जप नेमून दिला आहे? तर तो आहे ‘गौरीहरा’चा! इथं उमा आणि शंकर हे दोघंही रामनामातच दंग असतात त्यामुळे त्यांचा जपच नेमून दिला आहे, असा सरळ अर्थ आहेच. दुसरी अर्थछटा ही काणेमहाराज आणि उमदीकर महाराज यांनीही मांडली आहे. अर्थात ‘गौरीहर’ म्हणजे मायेचं जो हरण करतो, निवारण करतो त्या परमात्म्याच्याच जपाचा नेम हवा.. म्हणजे ज्यायोगे मायेचा प्रभाव कमी होईल त्या साधनेचाच खरा नेम हवा! तेव्हा त्या सद्गुरूंनी जो जप नेमून दिला आहे तो या ‘गौरीहरा’चा आहे. अर्थात मायानिवारणाचा आहे! आता ‘जप’ म्हणजे काय? आपण एखाद्या गोष्टीचा जो ध्यास घेतो, मनात तिचं जे सतत चिंतन करीत राहातो तो खरा जप आहे. तोंडानं रामाचं नाम घेत मनानं कामाचं चिंतन सुरू असेल तर तो जप रामाचा नव्हे, नश्वर भौतिकाचाच आहे. तेव्हा साधना ही बाहेरून अचूकपणे करण्याची क्रिया किंवा बाह्य़ देखाव्यात अचूकता सांभाळण्याची गोष्टच नाही. साधना ही अंतरंगातच पालट घडवणारी असली पाहिजे. ती अंतरंगात पोहोचणारी असली पाहिजे. त्या साधनेचा  नेम सद्गुरू सांगतात. साधना किती तास होते, याला महत्त्व नाही, तर साधनेनं अंतरंगात पालट किती घडला, यालाच महत्त्व आहे. आता अंतरंगात पालट म्हणजे काय? तर आधी जे अंतरंग जगासाठी आसुसलेलं असायचं, जगातून सुख मिळवण्यासाठी हपापलेलं असायचं, जगातले नश्वर आधार टिकवण्यासाठी तळमळत असायचं त्याच्या या आंतरिक रचनेत किती बदल झाला? जगाचं, जगाच्या आधाराचं, जगाच्या सुखाचं खरं स्वरूप किती उकललं? त्यानुसार जगण्यातल्या सवयी किती बदलल्या? आसक्ती, दुराग्रह, हट्टाग्रह, अपेक्षांमध्ये किती घट झाली? या साऱ्याची तपासणी आपली आपणच प्रामाणिकपणे केली, तर साधनेआधीचं आपलं मन आणि साधनेनंतरच आपलं मन यात किती फरक पडला, हे उमगेल. जर फरक पडला नसेल तर साधनेत नव्हे, साधना करणाऱ्यातच उणीव आहे, हेच सत्य! तेव्हा नुसता संख्यात्मकदृष्टय़ा अत्युच्च जप केला, सगळ्या वेदांमध्ये आणि उपनिषदांमध्ये काय काय म्हटलं आहे हे धडाधडा सांगता यायला लागलं किंवा कठोर योगसाधनेत कित्येक तास सरत असले, ‘ध्याना’त कित्येक तास सरत असले, पण आंतरिक स्थिती खुजीच राहिली असली, संकुचित-स्वकेंद्रितच राहिली असली, जगाच्या आधारासाठी आणि जगात नावलौकिक व्हावा यासाठी आसुसलेलीच राहिली असली, तर ती ‘दीर्घ’ साधना निर्थक आहे! दुसरी गंभीर गोष्ट अशी की अध्यात्म पथावर आलेले जगातल्या संबंधांमध्ये गुंतणं कमी करतात, पण अध्यात्म पथावरील वाटचालीत मनातच तयार झालेल्या किंवा मनानंच गृहित धरलेल्या, मनानंच प्रक्षेपित केलेल्या नव्या संबंधांमध्ये त्याच आसक्तीनं, दुराग्रहानं, हट्टाग्रहानं जखडू पाहातात. हे खरं अध्यात्म नाही, ही खरी साधनाच नाही. हा दुसरा आणि अधिक धोकादायक असा प्रपंचच आहे. तेव्हा आधार केवळ सद्गुरूंचा आहे.. नश्वरामध्ये ईश्वर शोधण्याची.. अपूर्णात पूर्णत्व शोधण्याची धडपड व्यर्थ आहे.. जो खऱ्या अर्थानं पूर्ण आहे, शाश्वताशी संयुक्त आहे अशा सद्गुरूंच्या बोधानुरूप जगण्याच्या व्रतासाठीच केवळ आसक्त राहिलं पाहिजे. साधनेची कितीही आटाआटी करूनही खरं जे साधायचं तेच दुरावत असेल तर ती साधनाही खरी नाही, तो नेमही खरा नाही. हा चुकीचा नेम चुकलाच पाहिजे!

चैतन्य प्रेम