शाश्वताशी आबद्ध आणि मायेच्या बद्धतेपासून मुक्त अशीच साधना असली पाहिजे, हे आपण जाणलं. आता या श्लोकाचा तिसरा आणि चौथा चरण हा समुद्रमंथनातून उत्पन्न झालेलं हलाहल रामनामानं पचविणाऱ्या शंकरांचा फार सूचक उल्लेख करतो. समर्थ म्हणतात स्वयें नीववी तापसी चंद्रमौळी।  तुम्हां सोडवी राम हा अंतकाळी।। ज्या रामाच्या नामानं चंद्रकोर मस्तकी धारण करणाऱ्या शंकरानं स्वत:ला निववलं तो रामच तुम्हाला अंतकाळी सोडवील! आता शंकरांनी रामनाम ज्याकारणे कंठी धारण केलं ते समुद्रमंथनाचं कारणही फार अर्थव्यापक आहे. समुद्रमंथनाची कथा आपल्याला माहीत असेलच. अमृताच्या निर्मितीसाठी म्हणून देव आणि दानव एकत्र आले आणि त्यांनी क्षीरसमुद्रात मांदार पर्वताची रवी आणि वासुकी सर्पाची दोरी करून मंथन केलं. त्यातून अनंत रत्ने बाहेर पडली त्याचप्रमाणे हलाहल हे सर्वात जहाल असं विष आणि अमृतही बाहेर पडलं. हे हलाहल इतकं जहाल होतं की त्यानं सृष्टीच नष्ट झाली असती. त्यामुळे ते शिवानं प्राशन केलं. ते त्याच्या पोटात जाऊ नये म्हणून पार्वतीनं त्याची जिव्हा ओढून घेतली तरी ती निळी पडली इतकं ते विष भीषण होतं. तरीही शिवांच्या सर्वागाची आग होऊ लागली. रामनामानंच ते शांत झाले. तर ही जी कथा आहे तिचा साधकाशीच थेट संबंध आहे. अंतरंगात भवसमुद्र सतत खवळत आहे. त्यातूनच अमृत काढण्यासाठी देव आणि दानव एकत्र आले आहेत. माणूस कसाही असो.. तो कपटी असो, कोत्या मनाचा असो, दुष्ट प्रवृत्तीचा असो त्याला शाश्वताचीच ओढ असते. त्याला शाश्वत समाधानाचीच ओढ असते. साधनपथावर आलेला साधक हा संमिश्र आंतरिक घडणीचा जीवच असतो.  सत्त्वगुण, रजोगुण आणि तमोगुणांचा कमीअधिक प्रभाव परिस्थिती आणि प्रसंगपरत्वे त्याच्यावर पडत असतो. तरीही त्याला शाश्वताचीच ओढ असते. त्यासाठी जी साधना आहे ती म्हणजे अंतरंगात उतरणंच आहे.. अंतरंगताल्या भवसमुद्राची घुसळणच आहे!  ही घुसळण अंतरंगातील ‘देव’ अर्थात सद्गुण आणि ‘दानव’ अर्थात अंतरंगातील दुर्गुण एकत्र येऊन सुरू होते. अर्थात कधी सद्गुणांनी प्रेरित कधी दुर्गुणांनी व्याप्त अशा मनोदशेत, कधी सकारात्मकतेनं उंचावलेल्या तर कधी नकारात्मकतेनं खचलेल्या मनोदशेत ही घुसळण सुरू होते. त्यासाठी ‘मांदार’  म्हणजे मन आणि ‘वासुकी’ म्हणजे मनातले वासनारूपी रज्जू यांनी ही घुसळण सुरू होते तेव्हा आजवर प्रपंचातील आसक्तीपायी ज्या इच्छा, अपेक्षा, मोह, भ्रम मनात खोलवर रुजले होते ते रौद्ररूप धारण करीत उफाळून येतात. त्यांचा प्रभाव इतका जहाल असतो की सगळा चांगुलपणा, सगळं अस्तित्वच धोक्यात येईल! त्यासाठी हे जहाल हलाहल केवळ ‘शिवा’लाच धारण करावं लागतं. म्हणजे केवळ सद्गुरूमय होण्याच्या अभ्यासानंच प्रपंच आसक्तीपायी निर्माण झालेल्या प्रपंचदु:खाचं हलाहल पचवता येतं! ते पचवण्यासाठी सद्गुरूमयतेकडे नेणाऱ्या साधनेचाच अखंड आधार घ्यावा लागतो. आता सद्गुरूमयता म्हणजे कोणा बाह्य़रूप लाभलेल्या अवतारी साक्षात्कारी व्यक्तीशी एकरूप होणं नव्हे. कारण जो खरा सद्गुरू असतो तो देहात असूनही देहाच्या प्रभावापासून मुक्त असतो. त्यामुळे त्याला देहात आणि देहापुरतं पाहाणं, जाणणं हा आत्मघातच असतो. त्यामुळे ज्या शाश्वत तत्त्वाशी तो एकरूप आहे, ज्या शाश्वत समाधानाची वाट तो दाखवत आहे त्या शाश्वताशी आपण एकरूप होण्याचा अभ्यास हाच खरा सद्गुरूमयतेसाठीचा अभ्यास आहे. हा अभ्यास प्रामाणिकपणे सुरू असेल तरच आपल्या अंतरंगातील अशाश्वताच्या मोहाचं हलाहल जिरेल आणि शाश्वताची अमृत इच्छा उत्पन्न होईल!

चैतन्य प्रेम