12 December 2017

News Flash

४०६. दशावतार : ४

या आत्मारामाचे कूर्मरूप म्हणजे श्वास, उपप्राण ज्याला म्हणतात तो वायू

चैतन्य प्रेम | Updated: August 8, 2017 2:13 AM

श्री समर्थ रामदास विरचित ‘मनोबोधा’च्या १२३ ते १२५ या तीन श्लोकांत श्रीराम, श्रीकृष्ण आणि बुद्ध या आजवर झालेल्या अवतारांचा आणि पुढे होणाऱ्या कल्की अवताराचा उल्लेख आहे. त्याकडे आपण वळणार आहोतच तसंच गेल्या भागात जे प्रश्न अखेरीस उपस्थित केले त्यांचा मागोवा १२६व्या श्लोकाच्या विवरणात घेणार आहोत. आता या १२० ते १२२ श्लोकांतील काही गूढांचा विचार करू. बेळगावचे पू. काणे महाराज यांनी १२० व्या श्लोकाचा जो अन्वयार्थ मांडला आहे तो पाहू. मत्स्य, कूर्म, वराह अवतारांचा उल्लेख या १२०व्या श्लोकात आहे. नामाच्या योगे होणाऱ्या प्रक्रियेशी या श्लोकांची सांगड काणे महाराज घालतात. ते म्हणतात, ‘‘शुद्ध बुद्धीने अंत:करणपूर्वक केलेल्या नामस्मरणाचे फळ देण्याकरिता तोच आत्माराम सूर्यमंडळ भेदणारे मछ यंत्र झाला. या भ्रूमध्यातून त्या अत्यंत वेगवान अशा मछ यंत्राचा भेद करून हा जीव नामाच्या योगे ब्रह्मपदाला जाऊन पोहोचतो. या आत्मारामाचे कूर्मरूप म्हणजे श्वास, उपप्राण ज्याला म्हणतात तो वायू – कण्ठभागी राहून धरा म्हणजे पृथ्वीरूपी शरीर धारण करतो आणि कंठातील नामस्मरणाने तुष्ट व पुष्ट होतो. प्रेमळ भक्तांच्या रक्षणाकरिता आत्मविस्मृत झालेल्या, घसरलेल्या जीवांना तारण्यासाठी आणि त्यांना स्वस्थानी नेण्यासाठी भगवंतालाही अत्यंत कनिष्ठ योनीत अवतरित व्हावे लागते.’’ आता परशुराम अवतार कथा साधकाला काही गूढ सत्याकडे नेते का? सूक्ष्म विचार केला तर जाणवेल की, जमदग्नीच्या पोटी परशुराम जन्मला होता. म्हणजेच सत्त्वगुणातून रजोगुणही उत्पन्न होऊ  शकतो. साधनेनं सहज लाभलेल्या कामनापूर्तीच्या सिद्धीचं या रजोगुणाला प्रेम असतं. या सिद्धीच्या जपणुकीसाठी तो कोणतेही टोक गाठू शकतो. मात्र सत्त्वगुण त्याला प्रतिबंध करण्यासाठी अधिक तप:पूत करतो तेव्हा जगाची ममता तो पूर्ण नष्ट करतो. मग अंतरंगातून मायेचे पाश तुटले तरी सत्त्वगुणाच्या आधारावर पुन्हा तो याच मायाजगतात वावरतो, पण पूर्ण निर्लिप्त भावानं. मग थोडं जरी दुर्लक्ष झालं आणि साधक मायावी जंगलात पुन्हा फसला तरी सत्त्वगुणाचा नाश होऊ  शकतो. अशा परिस्थितीत साधक मायाशरण होऊन द्वैताच्या तडाख्यात सापडू शकतो; पण परशुरामाची कथा सांगते की, सत्त्वगुण लोपण्यात आपल्याच अंतरंगातील जे जे तामस आणि रजस गुण कारणीभूत ठरले त्यांचा हा साधक अत्यंत नेटानं नायनाट करून आपली आंतरिक तपोभूमी नि:क्षत्रिय करतो. ‘क्ष’ म्हणजे न दिसणारे पण असणारे आणि ‘त्रय’ म्हणजे तीन.. म्हणजेच न दिसणाऱ्या पण असणाऱ्या त्रिगुणांचा तो अंतरंगातून नायनाट करतो. खरी गोम इथंच आहे! त्रिगुण नष्ट झाल्याचं भासतं खरं, पण सात्त्विक अहं शाबूत असतो. त्या साक्षात अहंरूपी धनुष्याचं भंजन प्रभू रामच अवतरित होऊन करतात! आता याच रामाचं वर्णन ‘मनोबोधा’च्या १२३व्या श्लोकात आहे. प्रथम हा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ पाहू. मग मननार्थाकडे वळू. हा श्लोक असा आहे:

अहल्येसतीलागि आरण्यपंथें।

कुडावा पुढें देव बंदीं तयांतें।

बळें सोडितां धाव घाली निशाणीं।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी।। १२३।।

प्रचलित अर्थ : रावणानं देवांना बंदिवासात टाकलं तेव्हा परमात्मा राम यांनी दशरथ व कौसल्येच्या पोटी जन्म घेतला. त्यानं शापामुळे शिळा होऊन पडलेल्या अहल्येला पूर्ववत केलं. पुढे देवांना रावणाच्या जाचातून कायमचं सोडविण्यासाठी त्यानं रावणाशी घनघोर युद्ध केलं. हा राम भक्तांचा कैवारी आहे. तो भक्तांची उपेक्षा करीत नाही. आता मननार्थ पाहू, पण एक सूक्ष्म गोष्ट लक्षात आली का? गेल्या अनेक श्लोकांत ‘नुपेक्षी कदा देव दासाभिमानी,’ असं समर्थ म्हणत आहेत. या श्लोकात मात्र ते ‘नुपेक्षी कदा राम दासाभिमानी,’ असं म्हणत आहेत!

First Published on August 8, 2017 2:13 am

Web Title: samarth ramdas philosophy 277