समर्थ रामदास विरचित ‘मनोबोधा’च्या १२४व्या श्लोकात श्रीकृष्ण आणि बुद्ध या अवतारांचा उल्लेख आहे. हा श्लोक, त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू. मग मननार्थाकडे वळू. हा श्लोक असा आहे :

तये द्रौपदीकारणें लागवेगें।

त्वरें धांवतू सर्व सांडूनि मागें।

कळीलागि जाला असे बौद्ध मौनी।

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी।। १२४।।

प्रचलित अर्थ : द्रौपदी संकटात सापडली तेव्हा कृष्णानं सर्व सोडून तात्काळ धाव घेतली आणि तिचं रक्षण केलं. कलियुगातही भक्तांच्या रक्षणासाठी बुद्ध अवतार झाला आहे.  आता मननार्थाकडे वळू.  जेव्हा भर राजसभेत द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू झालं तेव्हा कृष्णाची तिनं केलेली आळवणी आणि कृष्णानं घेतलेली धाव मनावर कोरली गेलेली आहे. द्रौपदीची कथा काय सुचवते? पाच पांडवांची पत्नी असलेली, पण कृष्णाची अनन्यभक्त असलेली द्रौपदी म्हणजे पंचमहाभूतांनी घडलेला, पाच ज्ञानेंद्रियं आणि पाच कर्मेंद्रियांच्या प्रपंचात राहूनही परम तत्त्वाशी अनन्य झालेला जीव आहे! अशा भक्तासाठी भगवंत धावून येतो, असं संतही सांगतात. द्रौपदीसाठी भगवंतानं अशी दोनदा धाव घेतली आहे. त्यातली पहिली धाव ही पांडव वनांतरी असतानाची आहे. द्रौपदीकडे एक अक्षय पात्र होतं. त्याद्वारे कितीही लोकांना खाऊ  घालण्याचं सामथ्र्य तिला लाभलं होतं. तिनं भोजन केल्यानंतर आणि एकदा ते पात्र स्वच्छ केल्यानंतर मात्र त्या दिवसासाठी ते पात्र अन्न देण्यास असमर्थ ठरणार होतं. एकदा सर्व पांडव आणि द्रौपदीचंही भोजन आटोपलं तेव्हा दुर्वास ऋषी आपल्या शिष्यांसह थडकले. नदीवर जाऊन आम्ही स्नान करून येतो, मग जेवण्यास वाढ, असं त्यांनी फर्मावलं. ते गेल्यावर चिंतातुर झालेल्या द्रौपदीनं कृष्णाची आळवणी केली तेव्हा कृष्ण प्रकटले. त्यांनी ते अक्षयपात्र मागवलं आणि त्यात राहिलेलं भाताचं एक शीत त्यांनी तिला दाखवलं. ते एक शीत खाऊन कृष्ण इतके तृप्त झाले की दुर्वास आणि त्यांच्या शिष्यांचंही पोट भरलं! थोडक्यात जगाला म्हणजे आपल्या गोतावळ्याला तृप्त करण्यासाठी माणूस अहोरात्र धडपडत असतो. पण त्यानं जर एका परमात्म्याला तृप्त करण्याचं ठरवलं तर ते अधिक सोपं आहे. कारण जगाची भूक फार मोठी आहे आणि त्या परमात्म्याची भूक फार कमी आहे! भाताचं एक शीत खाऊन कृष्ण तृप्त झाले. तसाच एक ‘मी’पणा त्यागायची तयारी दाखवली तरी तो परमात्मा तृप्त होतो. माणसाचं अंत:करण म्हणजे कधीही न संपणाऱ्या इच्छांचं अर्थात अक्षय असलेल्या इच्छांचं पात्र आहे. ना ते अंत:करण कधी तृप्त होतं, ना अंत:करणपूर्वक प्रयत्न केले तरी जग तृप्त होतं! त्या पात्रातली एखादी इच्छा जरी मी भगवंताला अर्पण केली तरी तो तृप्त होतो. कारण त्या एका इच्छेच्या त्यागाच्या जोरावर तो मला निरिच्छ करण्याची अर्थात पूर्ण तृप्त करण्याची प्रक्रिया सुरू करतो. या भक्ताला निराधार करण्याचा प्रयत्न जेव्हा जग करतं तेव्हा हा परमात्मा त्याला अक्षय आधार कसा पुरवतो, हे द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगात कृष्णानं जी धाव घेत अखंड वस्त्रं पुरवली, त्या घटनेतून सूचित होतं. अनन्य भक्तांसाठी भगवंताची ही धाव तात्काळ आहे,  मन:पूर्वक आळवणी केल्यावर लगेच आहे. त्यातही ही धाव कशी आहे? तर, सर्व सांडूनि मागे, अशी आहे. अर्थात तो आपलं सर्व वैभव, सर्व मोठेपणा मागे सोडून येतो.  आता ‘कळीलागि’ जो ‘बौद्ध मौनी’ झाला आहे, हा नववा अवतार मोठा रहस्यमय आहे. काही तत्त्वज्ञ हा अवतार भगवान गौतम बुद्धांचा आहे, हे मानत नाहीत. बौद्ध धर्म मांडणाऱ्या भगवान बुद्धांच्याही आधी पुराणांतरी बुद्ध म्हणून एका अवताराचा उल्लेख आहे आणि राक्षसांना वेदविद्या मिळू नये यासाठी भगवंतानं बुद्धिभेद करण्यासाठी तो अवतार घेतला होता, असं काहींचं म्हणणं आहे. आपण मात्र सर्वच अंगानं या अवताराचा संक्षेपानं विचार करू.