18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

४३८. खरा निकटस्थ

दुर्गुण परवडला, पण दुर्जनाची संगत नको, असा उल्लेख गेल्या भागात केला.

चैतन्य प्रेम | Updated: September 25, 2017 2:57 AM

दुर्गुण परवडला, पण दुर्जनाची संगत नको, असा उल्लेख गेल्या भागात केला. आता दुर्जन आणि दुर्गुण म्हणजे तरी नेमकं काय? परमात्म्यापासून जो दूर करतो तोच दुर्गुण. ‘गुरूचालिसे’तली एक चौपाई आहे की, ‘अस एकहु गुण मोरे नाही, जेहि तोषवु गुरूवर तोही काहि।’ म्हणजे, हे सद्गुरो, माझ्यात असा एकही गुण नाही की ज्यायोगे तुम्हाला संतोष होईल! यावर गुरुजी म्हणाले की, ‘याचा अर्थ असा नव्हे की माझ्यात दोषच दोष आहेत. गुणही आहेत, पण ते सारे जगाला आवडतील असे! मला आवडतील असे नाहीत!!’ म्हणजे काय? तर एखादा उत्तम भजन गातो. लोक अगदी तल्लीन होतात. आता गायन हा गुण आहेच, पण त्या भजनात भाव नसेल आणि लोकांवर छाप मारण्याचाच अंतस्थ हेतू असेल, तर हा ‘गुण’ सद्गुरूंना रुचणारा नाही. समजा एखादा उत्तम प्रवचन करतो. लोक अगदी प्रभावित होतात.

आता प्रभावी वक्तृत्व हा गुण आहेच, पण त्यायोगे लोकांना फसवण्याचा हेतू असेल, तर तो गुण सद्गुरूंना आवडेल का? अगदी त्याचप्रमाणे सेवा हा गुणच असला तरी,’मीच उत्तम सेवा करतो,’ या भावनेचा शिरकाव होताच तो गुण अहंकारात परावर्तित होतो. मग तो कसा आवडणार? तर जो परमात्यापासून दूर करतो तोच दुर्गुण, मग भले जग त्याला गुण का समजेना. अगदी त्याचप्रमाणे दुर्जन म्हणजे जो भगवंतापासून दूर आहे तो!

आता रावण आणि कुंभकर्णाचंच उदाहरण घ्या. हे मूळचे भगवंताचे निष्ठावंत भक्त व द्वारपाल जय आणि विजय. भगवंतापेक्षा अहंभावाचा प्रभाव चित्तावर पडल्यानं त्यांना हिरण्याक्ष व हिरण्यकशिपु, रावण व कुंभकर्ण आणि शिशुपाल व दंतव्रत असे तीन जन्म घ्यावे लागले. या तीन जन्मांत भगवंतापासून दूर राहावे लागले. तेव्हा प्रत्यक्षात निजजन असूनही भगवंतापासून दुरावतो तो दुर्जन! आता रावणादि श्रेष्ठ दुर्जनांची गोष्ट सोडा.. आपल्यापुरता अर्थ हा की जो जगाच्या नादाला लागला आहे तो भगवंतापासून दूरच आहे. अशाची संगत सोडली पाहिजे कारण तो आपल्यालाही जगाच्या नादी लावील. आता दुर्गुण परवडला, पण दुर्जनाचा संग नको, असं का म्हटलं? तर माणसातला चांगलेवाईटपणा हा प्रत्यक्ष सहवासानं अधिक उफाळून येतो. संगतीचा प्रभाव हा थेट परिणाम करणारा असतो. आगीच्या चित्राला हात लागल्यानं भाजत नाही, पण प्रत्यक्ष आगीला हात लागताच भाजतं. तसं सद्गुणांचं वर्णन वाचून ते अंगी बाणवण्याची इच्छा लगेच बळावते, असं नाही.. पण दुर्जनाच्या संगतीनं आपल्यातला वाईटपणा कृतीत यायला वेळ लागत नाही!

आता यापुढे एक पाऊल टाकत समर्थ म्हणतात की, ‘मना कल्पना वाउगी ते न कीजे।’ म्हणजे हे मना सर्व कामना भगवंताच्या चरणी अर्पण कर, त्या पूर्ण होतील की नाही, हे भगवंतावर सोडून दे आणि जो स्वत:च अनंत कामनांमध्ये बुडालेला आहे त्याच्या संगतीत मात्र मनाय कामना घोळवत राहू नकोस..

आता पुढचं सांगतात की, बाबा रे! खरी संगत अखेर आंतरिक विचाराचीच आहे! आणि माणसाचं जे मन आहे ना, ते विचार केल्याशिवाय, कल्पना केल्याशिवाय राहात नाही. म्हणून पहिल्या पावलात कल्पना पूर्ण थांबवणं काही साधणार नाही. त्यामुळे समर्थ कल्पनेला विरोध करीत नाहीत, ‘मना कल्पना न कीजे।’ असं सांगत नाहीत, तर ‘मना कल्पना वाउगी ते न कीजे।’ असं म्हणतात.. वावग्या म्हणजे चुकीच्या कल्पनेला तेवढा विरोध करतात! निदान मनातून चुकीच्या, वाईट कल्पना दूर व्हाव्यात आणि भगवंतानुकूल कल्पना मनात रुजाव्यात यासाठी सांगतात की,‘मना सज्जना सज्जनीं वस्ति कीजे!’ नीट वाचा हं! नुसतं ‘सज्जनी’ पुरेसं नाही.. ‘सज्जना सज्जनीं’ वस्तीच हवी!

 

First Published on September 25, 2017 2:57 am

Web Title: samarth ramdas philosophy 305