20 January 2019

News Flash

४९०. समाधान-योग

अध्यात्माच्या वाटचालीत उच्च तात्त्विक बोध ऐकतानाही आतमध्ये काहीच पालट होत नाही.

समर्थ रामदास साधकाच्या मनाला म्हणतात, हे मना कोरडय़ा चर्चेत तू आजवर खूप रमलास. पण त्यानं भक्तीप्रेमाचा ओलावा काही लाभला नाही. इतरांच्या तत्त्वाची झाडाझडती खूप केलीस, पण आपल्या आत तशीच झाडाझडती कधी कराविशी वाटली नाही. जीवनातलं खरं श्रेयस्कर काय, शाश्वत काय, जीवनाचं खरं ध्येय काय, याचा निवाडा अंतरंगात झालेला नाही. तो जोवर होत नाही तोवर खरी वाटचालही नाही. जोवर ध्येय ठरत नाही, तोवर प्रयत्नांची दिशाही ठरत नाही. जीवनातल्या दु:खांना कंटाळून अध्यात्माच्या मार्गावर आलो असू तर खरं ध्येय जीवनातलं दु:खं कमी करणं, हेच असतं. हे दु:खसुद्धा केवळ देहसुखाला जे जे प्रतिकूल आहे, त्यापुरतंच असतं. त्यामुळे हे दु:खंही ठिसूळच असतं. मग अध्यात्माच्या वाटचालीत उच्च तात्त्विक बोध ऐकतानाही आतमध्ये काहीच पालट होत नाही. कारण तात्पुरतं जे दु:खाचं वाटत असतं ते दूर व्हावं, एवढंच ध्येय असतं. तेव्हा अध्यात्माच्या मार्गावर येऊनही वाटचालीला खरी दिशा नसते. तर हा निवाडा केला पाहिजे, असं समर्थ सांगतात. समर्थ म्हणतात की, हे साधका, जे सारभूत तत्त्व आहे ते वेगळंच आहे. ज्या गोष्टींना तू हितकारक मानतोस त्या अनेकदा अहितकारकच असतात. ज्यांना शाश्वत सुखाचा आधार मानून त्यांच्या प्राप्तीसाठी तू धडपडतो आहेस ते आधार खरं तर अशाश्वतच आहेत. त्यामुळे त्यांच्यायोगे शाश्वत सुख लाभणं शक्य नाही. खरं समाधान म्हणजे काय, शाश्वत सुख म्हणजे काय, हे केवळ जो शाश्वताशी एकरूप आहे त्याच्याच आधारावर कळू शकतं. त्याच्याच आधारावर त्या सुखप्राप्तीचा अभ्यास साधू शकतो. हा जो शाश्वताशी एकरूप सद्गुरू आहे तो समस्तांमध्ये असूनही वेगळा आहे. त्याच्या आधाराशिवाय, त्याचा खरा योग साधल्याशिवाय खरं समाधान मिळणार नाही. समर्थ सांगतात :

नव्हे पिंडज्ञानें नव्हे तत्त्वज्ञानें।

समाधान कांहीं नव्हे तानमानें।

नव्हे योगयागें नव्हे भोगत्यागें।

समाधान तें सज्जनाचेनि योगें।। १५३।।

हे साधका, ज्या समाधानाचा तू शोध घेत आहेस ते िपडज्ञानानं समजणार नाही. आता ‘पिंड’ म्हणजे काय? ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ हे सूत्र आपण ऐकलं आहेच. म्हणजेच आपला पिंड, आपला देहच ब्रह्मांडाचं लघुत्तम साधारण रूप आहे! देह आहे म्हणून तर जग आहे! याच देहात आकाश आहे, अग्नि, तेज, पाणी, माती आहे.. पंचमहाभूतांशिवाय या सृष्टीत काहीच नाही आणि आपला देहही पंचमहाभूतांनीच घडला आहे. आपण मानतो की हा देह सुखात असला म्हणजे आपण सुखी राहू. त्यामुळे या देहाच्या सुखासाठी जे ज्ञान आपल्याला आवश्यक वाटतं ते मिळवण्यासाठी आपण धडपडत असतो. पण समर्थ सांगतात, बाबा रे, जगातल्या स्थूल सुखाचा मुख्य आधार असलेल्या देहाचं कितीही ज्ञान प्राप्त केलंस तरी समाधान काही मिळणार नाही! मग हे स्थूल ज्ञान मिळवण्याऐवजी माणूस समाधानासाठी सूक्ष्म अशा तत्त्वज्ञानाकडे वळतो. पण समर्थ म्हणतात की, कितीही तत्त्वज्ञान कमावलंस तरी तेवढय़ानं समाधान काही लाभणार नाही! कारण तत्त्वज्ञान जीवनात कसं उतरवायचं, हेच कळत नसल्यानं ते ऐकीव तत्त्वज्ञान खरं समाधान देऊ शकणार नाही. कडाडून भूक लागली आहे, म्हणून पाकशास्त्रावरची कितीही पुस्तकं वाचली तरी पोट भरत नाही! किंवा उत्तमोत्तम पदार्थ कसे रांधावेत, याची भारंभार माहिती असली तरी त्या माहितीचा रवंथ करून काही पोट भरत नाही. पोट भरण्यासाठी पदार्थ रांधावा लागतो, खावा आणि पचवावा लागतो. तत्त्वज्ञानही तसंच पचवावं लागतं आणि जीवनात उतरवावं लागतं. त्यातूनच तर समाधानाचा मार्ग उजळत जातो.

First Published on December 6, 2017 1:51 am

Web Title: samarth ramdas philosophy 352