खरा सत्संग नाही म्हणून खरं ज्ञान नाही आणि गेल्याच भागात सांगितल्याप्रमाणे खरा सत्संग हा देहाचा नाही तर आंतरिक धारणेचा आहे. ती उपासनेतूनच येत जाते. आज माझी आंतरिक धारणा कसली आहे? तर भौतिकाचीच आहे! ती धारणा निर्माण करण्यासाठी मी काही उपासना केली आहे का? मला या जन्मी जे नाव लाभलं आहे त्या नावाची जाणीव माझ्या अंतरंगात किती भिनली आहे. ती भिनावी यासाठी मी माझ्या नावाचा जन्मापासून जप केला आहे का? भौतिकात वाईट काही नाही, पण त्या भौतिकाच्या प्रभावाइतकं फसवणारं, गुंतवणारंदेखील काही नाही! हे भौतिक कसं आहे? ते चंचल आहे, अस्थिर आहे, अशाश्वत आहे. त्याच्या संगानं मला खरं आंतरिक स्थैर्य लाभणं शक्य नाही. कारण अपूर्णता हाच भौतिकाचा गुण आहे. मनाला मात्र अखंड पूर्णत्वाची ओढ आहे. त्यामुळे भौतिक कितीही मिळवत राहीलं तरी मनाला पूर्ण तृप्ती कधीच लाभत नाही. त्यासाठी भौतिकाच्या आसक्तीत वस्ती करून राहिलेल्या मनाला त्यातून बाहेर काढून व्यापक जाणिवेत वस्ती करायला शिकवावं लागेल! त्यासाठी खरा सत्संग हाच खरा उपाय आहे. हाच भाव मनोबोधाच्या ३९व्या श्लोकात आहे. हा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू, मग मननार्थाकडे वळू. हा श्लोक असा आहे:

जया वर्णिती वेद-शास्त्रें-पुराणें।

जयाचेनि योगें समाधान बाणे।

तयालागि हें सर्व चांचल्य दीजे।

मना सज्जना राघवीं वस्ति कीजे।। ३९।।

प्रचलित अर्थ : वेद, शास्त्रं आणि पुराणं ज्याची थोरवी गातात त्याचा योग होताच पूर्ण समाधान प्राप्त होतं. अशा त्या श्रीरामाला हे मना, तू सर्व चांचल्य देऊन मोकळा हो आणि रामरूपात अखंड वस्ती करून निश्चल राहा.

आता मननार्थाकडे वळू. परमात्म्याची अर्थात सद्गुरूंची थोरवी वेदशास्त्रांनी गायली आहे. माउलींच्या ‘हरिपाठा’वरील ‘अनादि अनंत’ सदरात आपण याचा मागोवा घेतला होताच. त्यात पहिलाच अभंग सांगतो, ‘‘देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी। तेणें मुक्ति चारी साधियेल्या।।’’ खरा दाता जो सद्गुरू त्याच्या द्वारी, अर्थात कान, नाक, डोळे, मुख ही सारी या देहाची दारं त्याची आहेत.. त्या देहद्वारांना जीवनातल्या प्रत्येक क्षणी सद्गुरूकडे वळवलं तर ज्या चार मुक्ती आहेत त्या प्राप्त होतात. ‘‘हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा। पुण्याची गणना कोण करी।।’’ त्या हरिच्या अर्थात भवदु:खाचं हरण करणाऱ्या सद्गुरूंच्या मुखातून जो नाममंत्र ऐकलात तो सदोदित करा, त्यातून जोडल्या जाणाऱ्या सुकृताची गणना कोणालाच करता येणार नाही. ‘‘असोनि संसारीं जिव्हे वेगु करी। वेदशास्त्र उभारी बाह्य़ा सदा।।’’ सदोदित सरत असणाऱ्या या जीवनात वावरताना मुखानं ते नाम घ्या.. वेदशास्त्रही बाह्य़ा उभारून हेच सांगत आहेत. ती वेदशास्त्रही केवळ बाह्य़ज्ञानच वाढवू शकतात, अंतज्र्ञान हा केवळ सद्गुरूचाच प्रांत आहे. तुकाराम महाराजही म्हणतात ना? ‘‘वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा। येरांनी वाहावा भार माथा।।’’ म्हणजे वेदांचा खरा अर्थ केवळ सद्गुरूच जाणतात, आपल्या परीनं अर्थ लावायला जाऊ तर केवळ शब्दज्ञानच वाढेल, अर्थ हाती लागणार नाही. तेव्हा ती वेदशास्त्रही ‘नेति नेति’ म्हणत त्या सद्गुरूचं खरं वर्णन करण्यातली असमर्थता व्यक्त करत एकप्रकारे त्याची महतीच मांडतात (जया वर्णिती वेद-शास्त्रें-पुराणें।).  अशा सद्गुरूच्याच योगानं खरं समाधान प्राप्त होतं (जयाचेनि योगें समाधान बाणे।). नुसतं प्राप्त होत नाही, ‘‘बाणे’’ म्हणजे रुजतं, बिंबतं, पक्कं होतं! अशा सद्गुरूंसाठी सर्व चांचल्य द्यायला पुढचा चरण सांगतो. हे चांचल्य म्हणजे नेमकं काय आणि ते नेमकं द्यायचं कसं, हे आता पाहू.

चैतन्य प्रेम