14 August 2020

News Flash

१४. नमू शारदा : १

श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘‘तुम्ही एक पाऊल टाका, मी दहा पावलं तुमच्याकडे चालत येईन.’’

श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘‘ज्यानं माझ्या हातात आपला हात दिला त्याचा हात मी रामाच्या हाती दिल्याशिवाय राहाणार नाही.’’ ऐकताना कसं वाटतं? खूप छान, खूप सहजसोपं वाटतं ना? निदान मला तरी तसं वाटायचं. आता लक्षात येतं, ‘मुळारंभ’ अशा सद्गुरूंच्या हातात हात देणं तरी साधतं का? ‘हात’ म्हणजे संपूर्ण कर्तेपण! श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘‘तुम्ही एक पाऊल टाका, मी दहा पावलं तुमच्याकडे चालत येईन.’’ पाऊल टाकणं सोडा, पाऊल उचलवतं तरी का? एक पाऊल म्हणजे एक इंद्रिय! कान, डोळे, मुख.. एखादं तरी इंद्रियं भगवंतासाठी वाहून टाका.. मग मी दहाही इंद्रियांना भगवत्प्रेमाचं वळण लावीन, असं श्रीमहाराज सांगत आहेत जणू.. तेव्हा सद्गुरू ग्रंथरूपात असो, समाधीस्थ असो की प्रत्यक्ष देहातला असो; आपलं कर्तेपण जाता जात नाही. एखाद्या इंद्रियाला भक्तीकडे वळवणं साधत नाही. मग सद्गुरूचं व्यापक, विराट रूप तरी कसं कळावं? आता गूढार्थ सोडा, पण ज्याच्या हाती या नश्वर देहाचा हात देण्याचा योगही अत्यंत दुर्लभ तो समोर आला असतानाही मला साक्षात्कार झाल्याचं जाणवतंही नाही! गीतेत भगवंत म्हणतात ना? ‘अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम्’.. म्हणजे मी देहरूपात अवतरतो तेव्हा मूढ लोक मला जाणू शकत नाहीत.. ‘मनाचे श्लोकां’च्या विवेचनात खरी भक्ती म्हणजे खऱ्या सद्गुरूशीच ऐक्य साधणं कसं, हे पुढे उलगडेलच. तर समर्थानी या श्लोकांचा प्रारंभ सद्गुरू वंदनेनं केला आहे. याला ‘मंगलाचरण’ म्हटलं जातं. सद्गुरूंच्या मंगल चरणांना हृदयात धारण करूनच साधकाची खरी वाटचाल सुरू होते. ही वाट कोणती आणि त्या वाटेनं चालणं कसं सुरू करायचं, हे पुढील दोन चरणांत नमूद आहे. समर्थ सांगतात, ‘‘नमूं शारदा मूळ चत्वार वाचा। गमूं पंथ आनंत या राघवाचा।।’’ सद्गुरूचा हा जो अनंत पंथ आहे तो कसा जाणता येईल? तर ‘नमूं शारदा मूळ चत्वार वाचा’! या मार्गावर वाटचाल करायची तर ‘शारदे’चं नमन साधलं पाहिजे. या ‘शारदे’चं व्यापक रूप समर्थानी दासबोधाच्या स्तवनात वर्णिलं आहे. समर्थ सांगतात, ही ‘‘’शब्दमूळ वाग्देवता’’ आहे!  या सृष्टीच्या निर्मितीआधीही ॐकार होता आणि सृष्टीही ॐकारातूनच उत्पन्न झाली, असंही तत्त्वज्ञान सांगतं ना? आणि ‘ओम्कार स्वरूपा सद्गुरू समर्था’, असं सद्गुरूंचं वर्णन नाथांनीही केलं आहे. तर हा जो ॐकार आहे, त्या शब्दब्रह्माचं मूळ ही शारदा आहे! अर्थात ही मूळ परमशक्ती आत्मशक्तीच्या रूपानं जीवमात्रात आहे. म्हणूनच सद्गुरूपाठोपाठ तिला नमन केलं आहे. या ‘शारदे’चं वर्णन करताना समर्थ सांगतात, ‘‘जे अनंत ब्रह्मांडें घडी। लीळा विनोदेचि मोडी। आपण आदिपुरुषीं दडी। मारून राहे।। जे प्रत्यक्ष पाहातां आडळे। विचार घेतां तरी नाडळे। जयेचा पार न कळे। ब्रह्मादिकांसी।। जे सर्व नाटक अंतर्कळा। जाणीव स्फूर्ती निर्मळा। जयेचेनि स्वानंदसोहळा। ज्ञानशक्ती।।’’ ही शारदा महामाया आहे. ती ‘लीळा विनोदेचि’ म्हणजे सहजपणे अनंत ब्रह्मांडं घडवते आणि मोडते, पण स्वत: मात्र ‘आदिपुरुषी’ लपून राहाते! हा आदिपुरुष म्हणजे ब्रह्मदेव नव्हे, कारण तिच्या मायेच्या प्रभावातून ब्रह्मादिकही सुटलेले नाहीत आणि तेदेखील तिला जाणत नाहीत, असं पुढे म्हटलं आहेच. तर मूळ परमात्म्याची ही मायाशक्तीच आहे. ती या सृष्टीच्या नाटकाची अंतर्कळा आहे. शुद्ध जाणीव रूपानं ती प्राणिमात्रात आहे, पण देहबुद्धीच्या वज्रलेपानं तिचा अंतप्र्रवाह जणू दबला आहे. तिच्याशिवाय आत्मज्ञान नाही आणि ते नाही तोवर खऱ्या स्वानंदाची प्राप्तीही नाही. आता प्रश्न असा की, ही ‘शारदा’ जर आत्मशक्ती आहे तर मग ती अज्ञानभ्रमात रमवणारी महामायाही कशी असू शकेल?

चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2016 6:05 am

Web Title: shri gondavalekar maharaj philosophy
Next Stories
1 १३. आरंभ तो निर्गुणाचा : २
2 १२. आरंभ तो निर्गुणाचा : १
3 ११. तप आणि हरी..
Just Now!
X