News Flash

Love Diaries : …तारा जुळल्याच नाहीत!

मीनाक्षीला गिटार वाजवताना बघणं हे त्याला आनंद देऊन जायचं...

Love Diaries

खरंतर अमितला आज ऑफिसमधून निघायला थोडा उशीरच झाला होता. शुक्रवार असल्यामुळं त्याला पुण्याला जायचं होतं. डेक्कन क्वीनच बुकिंगही त्यानं आठवडाभर आधीच करून ठेवलं होतं. साडेचार वाजायला आले तरी हातातलं काम संपलं नव्हतं. तसं मरिन ड्राईव्हपासून सीएसटी फार लांब नाही. पण पुण्यापेक्षा मुंबई फार काही वेगळी नाही. पुण्यातल्या रिक्षावाल्याप्रमाणं मुंबईतले टॅक्सीवाले त्यांच्या मनाचे राजे. वाटलं तर प्रवासी घेणार नाहीतर रस्त्याच्या कडेला गाडी लावून नुसतं आजूबाजूला बघत बसणार. मुंबईत येऊन दोन महिने उलटून गेल्यामुळं अमितला याची सवय झाली होती. ऑफिसमधल्या घड्याळापेक्षा त्याचं लक्ष बॉसच्या केबिनकडंच जास्त होतं. अखेर त्याला आवश्यक असलेली डॉक्युमेंट्स घेऊन विजय केबिनमधून बाहेर आला आणि अमितचा जीव भांड्यात पडला. त्याला वीकएंडला याच डॉक्युमेंट्सवरून पुढच्या आठवड्यासाठी प्रेझेंटेशन बनवायचे होतं. त्यानं लगेचच ती डॉक्युमेंट्स बॅगत भरली आणि कलिग्सना बाय करत मेन डोअर उघडलं. पळत पळतच त्यानं ऑफिसची इमारत सोडली. घड्याळात पावणे पाच वाजून गेले होते. आता बेस्टची वाट बघण्यात अर्थ नाही, हे त्याच्या लक्षातही आलं होतं. “सीएसटी चलोगे क्या?”, असं त्यानं एका टॅक्सीवाल्याला विचारल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघूनच अमितला हा बांद्र्यांच्या अलीकडं येणारच नाही, हे कळून चुकलं होतं. थोडं पुढं गेल्यावर त्याला एक वयस्कर ड्रायव्हर असलेली टॅक्सी दिसली. सीएसटी विचारताच त्यानं होकारार्थी मान डोलवली. अमितनं लगेचच हातातील बॅग टॅक्सीत टाकत स्वतःला आतमध्ये अॅडजेस्ट केलं. एवढं सगळं होईपर्यंत अमितचा शर्ट ओला चिंब झाला होता. मुंबईतील दमट हवा त्याला अजिबात आवडत नव्हती. पण काय करणार परिस्थितीपुढं मान तुकवत त्याला नोकरीतील बदल स्वीकारायला लागला होता. टॅक्सी मंत्रालयापर्यंत जात नाहीच तो त्याचा मोबाईल वाजू लागला. पलीकडून स्मिता लाईनवर होती. अमित ऑफिसमधून निघाला की नाही, हे विचारण्यासाठी ती फोन करत होती. शिवाय रात्री जेवायला काय करायचं हा सुद्धा तिचा प्रश्न होता. अमितला काय आवडतं, हे तिला चांगलंच ठाऊक होतं. पण तरीही त्याचा काही वेगळा मूड आहे का, हे जाणून घेण्यासाठी तिनं फोन केला. “निघालोय.. पोहोचेन १० मिनिटांत सीएसटीला”, अमितनं स्मिताला सांगितलं. तिच्या पुढच्या प्रश्नावर अमितच उत्तरही ठरलेलं होतं. “कोबीची भाजी, आमटी आणि गरम गरम पोळ्या…’ कांद्याची आमटी म्हणजे अमितचा जीव की प्राण. अगदी एनिटाईम फेव्हरिट. साहिल काय करतोय, या प्रश्नावर स्मितानं खेळतोय असं उत्तर दिलं. इतर एक दोन विषय झाल्यावर अमितनं आल्यावर बोलू, असं सांगत फोन ठेवला. तोपर्यंत टॅक्सी सीएसटीजवळच्या अंडरग्राऊंड फूटवेजवळ पोहोचली होती. अमितनं तिथचं टॅक्सी सोडत चालत जाण्याचा निर्णय घेतला. टॅक्सीतून उतरला त्यावेळी पाच वाजून गेले होते. त्यानं पळत पळतच प्लॅटफॉर्म नंबर ९ गाठला. वीकली अपडाऊनमुळं डेक्कन क्वीन कुठं लागते, हे त्याला माहिती झालं होतं आणि आजही गाडी त्याच प्लॅटफॉर्मवर उभी होती. यावेळी अमितला अगदी हवी तशी विंडोसीट मिळाली होती. हातातल्या बॅग रॅकवर टाकून अमितनं जागा पकडली आणि गाडीनं पुण्याच्या दिशेने प्रस्थानही ठेवलं

मार्च महिना सुरू झाल्यामुळं उकाडा चांगला जाणवत होता. त्यामुळं गाडीतले सगळे फॅन चालू होते. सहजच अमितचं लक्ष वरच्या बाजूला गेलं आणि त्याच्या समोरील बाजूचा एकच फॅन सुरू नसल्याचं त्याच्या लक्षात आलं. तिथले काही प्रवासी तो फॅन चालू करण्यासाठी प्रयत्न करत होते. पण त्याला यश येत नव्हतं अखेर त्यांनी प्रयत्न सोडले. गाडीनं वेग घेतला. डेक्कन क्वीनमधलं चीज ऑम्लेट खायचं हे अमितनं आधीच ठरवून ठेवलं होते. तशी ऑर्डरही त्याने देऊन टाकली. अमितच्या डोक्यात वीकेंड प्लॅन्स आकार घेऊ लागले होते. स्मितासोबत शॉपिंगला जायचं होतं. साहिलचा बर्थडे जवळ आल्यामुळं त्याचाही इव्हेंट प्लॅन करायचा होता. गाडीनं दादर सोडलं आणि वेग एकदम कमी झाला. त्यामुळं अमितचं लक्ष साहजिकच बाहेर गेले. काय झालंय हे त्याला कळत नव्हतं. पण गाडी सायन स्टेशनात आल्यावर थांबलीच. त्यामुळं अमितनं खिडकीतूनच डोकावत पुढचं काही दिसतंय का, हे बघण्याचा प्रयत्न केला. पण फारसं काही पदरात पडले नाही. इतक्यात वेटरने त्याच्या हातात चीज ऑम्लेट आणून दिलं. ते हातात घेऊन अमितनं पुन्हा एकदा नजर बाहेर वळवली आणि त्याला समोरच्या प्लॅटफॉर्मवर ओळखीची व्यक्ती दिसली. गोल चेहरा, मोकळे सोडलेले केस, डोळ्यावर मोठ्या फ्रेमचा गॉगल… ती ‘ती’च आहे का, हे नीटपणे बघण्यासाठी अमितची नजर पुन्हा पुन्हा तिकडं जाऊ लागली. नीट बघितल्यावर ती मीनाक्षीच असल्याचं त्याच्या लक्षात आलं. समोर ती दिसत असल्यामुळं अमित खूप अस्वस्थ झाला. सारखी सारखी त्याची नजर तिच्याकडंच जात होती. तिचं मात्र याकडं अजिबात लक्ष नव्हतं. ती परेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकलकडं लक्ष लावून होती. इतक्यात अमितच्या गाडीनं हळूहळू पुढं जाण्यास सुरुवात केली. गाडी पुढं जाऊ लागली, तसा तो अधिकच अस्वस्थ झाला. काय करावं त्याला काहीच सुचत नव्हतं. गाडीचा वेग हळूहळू वाढत होता, तसा अमितचा अस्वस्थपणाही… त्यानं हातातलं चीज ऑम्लेट तसंच सीटखाली सारत रुमालानं चेहरा पुसण्यास सुरुवात केली. मीनाक्षीचा विचार त्याच्या मनातून जातच नव्हता. खूप प्रयत्नांती अगदी तिनेक वर्षांपूर्वी अमितला मीनाक्षीच्या विचारातून बाहेर पडण्यात यश आलं होतं. पण आता पुन्हा सगळं झरझर त्याच्या डोळ्यापुढून जाऊ लागलं होतं. गाडीच्या वेगापेक्षा अमितच्या मनात दाटून आलेल्या आठवणींचा वेग जास्त होता. त्याला एकदम मीनाक्षीची आणि त्याची पहिली भेट आठवली.

………………….

अमितनं कॉमर्स डिस्टिंक्शनमध्ये पास केल्यानंतर आईनं त्याच्यासाठी गिटार आणून दिली होती. गिटार शिकण्यासाठी अमितनं सहकारनगरमध्येच क्लास जॉईन केला होता. तिथं त्याला पहिल्यांदा मीनाक्षी दिसली. तीसुद्धा गिटार शिकण्यासाठी त्याच क्लासमध्ये येत होती. तिनं अमितपेक्षा दोन आठवडे आधीच सुरुवात केल्यामुळं तिचा हात सरावला होता. एक दिवस सरांना थोडावेळ कामानिमित्त बाहेर जायचं असल्यामुळं त्यांनी मीनाक्षीलाच अमितकडं लक्ष द्यायला आणि त्या दिवसाचा सराव करून घ्यायला सांगितलं आणि तोच दिवस त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. मीनाक्षी अगदी सरांनी शिकवल्याप्रमाणं अमितला सगळं काही सांगत होती. अमितही लक्षपूर्वक समजून घेत होता. दोघांनी मिळून एकत्रितच सराव केला. त्यानंतर दोघंही क्लासमधून एकत्रितच बाहेर पडले. अमितनं अगदी सहजपणे कॉफी घ्यायची का, विचारल्यावर मीनाक्षीनही त्याला होकार दिला आणि दोघंही जवळच असलेल्या ‘रिलॅक्स’मध्ये गेले.

“तुला गिटारची आवड कशी?”, अमितने कॉफीची ऑर्डर देत मीनाक्षीला विचारलं. “बाबांना गिटारची खूप आवड. पण त्यावेळी घरची परिस्थिती बेताची असल्यामुळं त्यांना जमलंच नाही. त्यांची ती इच्छा अपूर्णच राहिली. पण का कोण जाणे त्यांच्याकडून मला ही आवड मिळाली असावं असं वाटतं.”, मीनाक्षीच्या उत्तरानं अमितला हळूहळू तिच्या घरच्यांबद्दल कल्पना येऊ लागली.

“काय करतात बाबा?”

“महाराष्ट्र बॅंकेत आहेत.”

“हो का!!! माझीही आई त्याच बॅंकेत”, अमित म्हणाला.

दोघांची बॅंक एकच असली तरी ब्रॅंच वेगळ्या होत्या हे त्यांच्या बोलण्यातून पुढं स्पष्ट झालंच.

“तू काय करतेस?” असं त्यानं विचारल्यावर, “लॉ थर्ड इयर” तिनं सांगून टाकलं. दोघांनी कॉफी घेऊन होईपर्यंत एकमेकांच्या कुटुंबीयांबद्दल जाणून घेतलं. अमितला रविला भेटायला जायचं होतं. त्यामुळं त्यानं तिथून निघण्याची तयारी केली. घरी सोडू का? असं त्यानं मीनाक्षीला विचारलं. पण तिनं नकारार्थी मान हालवत, माझं घर जवळच आहे, मी जाईन चालत, असं त्याला सांगितलं. मग तिला सीऑफ करत त्यानं गाडीला किक मारली. मीनाक्षीसोबत घेतलेली पहिली कॉफी त्याला अगदी लख्खपणे आठवत होती.

……………………..

गाडीनं कर्जत गाठलं होतं. पण अमितच्या मनातली अस्वस्था काही कमी होत नव्हती. त्याचं लक्ष सारखं सारखं त्या एकाच बंद फॅनकडं जात होतं. डब्यात सगळ्यांचं सगळं व्यवस्थित सुरू आहे. पण आपली अवस्था त्या बंद पडलेल्या फॅनसारखी झाली असल्याचं त्याला जाणवत होतं. मीनाक्षीच्या विचारांनी त्याच्या मनात कल्लोळ उठला होता. एका मागून एक विचार मनात येत होते.

…………………….

मीनाक्षीला गिटार वाजवताना बघणं हे त्याला आनंद देऊन जायचं. वाजवत असताना तिच्या चेहऱ्यावर उमटणारे भाव, तारेवरून सरसरा हलणारी तिची बोटं, त्यावरील रोज बदलणारे नेलपॉलिश, तिची केस मोकळे सोडण्याची स्टाईल या सगळ्याबद्दल त्याच्या मनात वेगळ्या भावना जागृत होऊ लागल्या होत्या. तिच्यासोबत असण्यात आपल्याला जास्तीत जास्त आनंद मिळतो, हे त्याच्या लक्षात आलं होतं. पण तिला काय वाटेल, या विचारानं तो आपल्या मनातील भावना उघड होऊ देत नव्हता. पण जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवता यावा, यासाठी तो वेगवेगळी कारणंही शोधत राहायचा. मग कधी कॉफी, कधी पिक्चर, कधी नाटक तर कधी विद्यापीठातला फेरफटका… या भेटींमधून तो तिच्या मनात काय चाललाय, याचा कानोसा घ्यायचा प्रयत्न करायचा.
मीनाक्षीसुद्धा अमितला कधी नाही म्हणायची नाही. पहिल्या कॉफीनंतर दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले होते. ४ मेला मीनाक्षीचा वाढदिवस! त्यासाठी अमितनं स्पेशल प्लॅन करून तिला सांगितला होता. मीनाक्षीनंही तो दिवस अमितसाठीच राखून ठेवला होता.

………………

गाडी लोणावळ्याला आली होती. दमट हवामान संपून छान वारं वाहू लागलं होतं. पण अमितच लक्ष सारखं सारखं त्याच बंद पडलेल्या फॅनकडं जात होतं. तो बंद फॅन त्याला पुन्हा पुन्हा भूतकाळाकडे घेऊन जात होता…

……………………..

अखेर ‘तो’ दिवस उगवलाच. अमित मीनाक्षीला पिकअप करण्यासाठी तिच्या घरी पोहोचला. तिच्या आई-वडिलांची त्याची चांगली ओळख झाली होती. त्यामुळं त्यांच्याशी काहीवेळ गप्पा मारून दोघं एकदमच घरातून बाहेर पडले. अमितच्याच बाईकवरून दोघेही एम्प्रेस गार्डनच्या दिशेने निघाले. आजही मीनाक्षीनं केस मोकळे सोडले होते. डोळ्यावर मोठा काळा गॉगल होता आणि तिनं स्काय ब्ल्यू रंगाचा पंजाबी कुर्ता घातला होता. हा रंग म्हणजे अमितचा एकदम हॉट फेव्हरिट. एम्प्रेस गार्डनचा फेरफटका मारल्यावर दोघेही गर्द झाडींच्या दाट सावलीखालील बाकड्यावर विसावले. मीनाक्षीला शुभेच्छा देऊन झाल्यावर दोघेही काहीवेळ पहिल्या भेटीमध्ये रमले. गिटारचा क्लास…सरांशिवाय गेलेला तो पहिला दिवस…रिलॅक्सची कॉफी… सगळ्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. याचवेळी अमितनं थेट विषयाला हात घालत आपल्या मनातील भावना तिच्यासमोर मांडली. आपल्यातील मैत्रीला पुढे घेऊन जायचे का, असा अगदी साधा प्रश्न त्यानं मीनाक्षीला विचारला. मीनाक्षीला हा प्रश्न अनपेक्षित नव्हताच मुळी. अमित आणि मीनाक्षीतील मैत्रीमध्ये खूप मोकळेपणा आला होता. अमितच्या प्रश्नाचं उत्तर तिनं आधीच मनात ठरवून ठेवलं होत. ते त्याला सांगण्याची ही योग्य वेळ हेसुद्धा ती घरून निघतानाच ठरवून आली होती. तिला अमित आवडत नक्कीच होता. पण त्याच्यासोबतची मैत्री पुढच्या टप्प्यावर न्यायला ती तयार नव्हती. एकमेकांसोबत काही वेळ आनंदात घालवणं आणि संपूर्ण आयुष्याची गाठ बांधणं यामधलं भलंमोठं अंतर तिनं अगदी योग्यपणे समजून घेतलं होतं. आणि अमितलाही त्याबद्दल जाणीव करून द्यायला हवी… उगाच तो वाहावत जाऊ नये… हे सुद्धा तिनं ठरवून टाकलं होतं. झालंही अगदी तसंच. तिनं अमितला स्वतःच्या मनातील भावना समजावून सांगितल्या. संपूर्ण आयुष्यासाठी मी तुझी निवड नाही करू शकत, हे सुद्धा तिनं स्पष्टपणे सांगितलं. तिच्या उत्तरानं अमितला धक्का नक्कीच बसला होता. पण त्याला सावरण्याचं आणि आपल्या निर्णयाची पार्श्वभूमी सांगण्याचं काम मीनाक्षीनं परफेक्ट केलं होतं.

………………………

गाडी शिवाजीनगरला पोहोचली आणि अमित गाडीतून उतरून रिक्षास्टॅडच्या दिशेने चालू लागला. मोबाईलवर स्मिताचा कॉल येत होता. पण तो उचलण्याची त्याची इच्छाच नव्हती. त्यानं फक्त टेक्स्ट करत २० मिनिटांत पोहोचतोय, एवढंच तिला कळवलं. अमितचं काहीतरी बिनसलं असल्याचं स्मितानं त्याचा चेहरा बघूनच ओळखलं होतं. पण बॉसनं दिली असेल काहीतरी असाईनमेंट, म्हणून त्याचा चेहरा पडला असावा… असं स्मिताला वाटून गेलं. तिन उगाच आल्या आल्या वाद नको म्हणून विषय टाळला. साहिलला थोडावेळ जवळ घेऊन अमित फ्रेश व्हायला गेला. परत आल्यावर टीव्ही लावून तो शांतपणे बघत बसला होता. इकडं साहिल हॉलमध्ये ठेवलेल्या अमितच्या गिटारच्या तारांशी खेळत होता.

“साहिल, नको खेळू गिटारशी”, अमितनं त्याला सांगितलं.

पण तो ऐकत नव्हता. एकामागून एक चॅनल सर्फ करता करता अमित अचानक एका चॅनेलवर येऊन थांबला. त्या चॅनेलवर परेल स्टेशनवरचं सीसीटीव्ही फुटेज दाखवत होते. धावत्या गाडीतून उतरण्याच्या प्रयत्नात अंदाज न आल्यानं एका महिलेचा लोकलखाली सापडून मृत्यू झाल्याची बातमी होती. अमित त्याकडं नीट बघू लागला. इतक्यात त्या महिलेचा फोटो चॅनेलवर दिसला आणि त्याचक्षणी जोरात आवाज आला…

साहिलनं गिटारची तार तोडली होती…

– तीन फुल्या, तीन बदाम

 

© सर्व हक्क सुरक्षित

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2017 1:15 am

Web Title: exclusive marathi love stories sad love stories sad ending love stories love story in mumbai pune
Next Stories
1 Love Diaries : किस्मत कनेक्शन (भाग २)
2 Love Diaries : किस्मत कनेक्शन…
3 Happy Propose Day: ब्रेकअप के बाद…
Just Now!
X