22 February 2020

News Flash

मनोधैर्याची कसोटी

आपल्याकडे आपत्ती व्यवस्थापन म्हणजे केवळ नागरिकांची सुटका असेच समीकरण दिसते आहे.

विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
सांगलीमध्ये पूरग्रस्तांची सुटका करणारे पथक नागरिकांना सुरक्षा बोटींमध्ये घेऊन तीन दिवस सलग कार्यरत होते. त्या अवस्थेत तिसऱ्या दिवशी कुणा एका सैनिकाची नजर जीव वाचविण्यासाठी सलग तीन दिवस एका खांबावरच अडकून राहिलेल्या माकडाच्या पिल्लाकडे गेली. त्याने सुरक्षा बोट त्याच्या दिशेने नेली आणि माकडाच्या त्या पिल्लाच्या दिशेने मदतीचा हात पुढे केला. त्या माकडाने त्याचा हात पकडून थेट त्याला मिठीच मारली. सुरक्षित स्थळी आल्यानंतर त्या माकडाला उतरवण्याचा प्रयत्न त्या सैनिकाने केला. मात्र ते एवढे भेदरलेले होते; त्याला बसलेला मानसिक धक्का एवढा मोठा होता की, ते माकड त्या सैनिकाला नंतर काही तास घट्ट बिलगूनच होते. माकडाची ही अवस्था तर उत्क्रांत झालेल्या माणसाच्या मनावर या महापुराचे किती आघात झालेले असतील, याची केवळ कल्पना केली तरी या महापुराचे महागंभीर परिणाम सहज लक्षात येतील.

महापुरानंतर मदतीचा ओघ सुरू झाला तो नंतरही काही काळ कायम राहील. सरकारने नुकसानभरपाईही जाहीर केली, ती मिळेलही. पण ती कितीशी पुरणार आणि त्यातून पूरग्रस्तांची आयुष्ये उभी राहणार का हा प्रश्नच आहे. आपल्याकडे आपत्ती व्यवस्थापन म्हणजे केवळ नागरिकांची सुटका असेच समीकरण दिसते आहे. आपत्ती व्यवस्थापनाची सुरुवात तिच्या आगमनाच्या मिळालेल्या इशाऱ्यानंतर तात्काळ होते. मनुष्यहानी व वित्तहानी वाचविण्यासाठी प्रयत्न तात्काळ अपेक्षित असतात. मात्र आपल्याकडे दिसली ती केवळ आपत्तीनंतरची पळापळ. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या घाटमाथ्यावरच्या जोरदार पावसाच्या इशाऱ्याकडे आपत्ती व्यवस्थापनाचे झालेले दुर्लक्ष हे महापुराचे महाकारण आहे. या खेपेस कव्हरस्टोरीमध्ये त्याकडेच ‘लोकप्रभा’ने लक्ष वेधले आहे.

याच आपत्तीव्यवस्थापनामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग असायला हवा तो मानसोपचार आणि मनोविकारतज्ज्ञांचा. मात्र त्याबाबत आपल्याकडे कोणतीही ठोस तरतूद किंवा कार्यवाही झालेली नाही. गेली कित्येक वर्षे मनोविकारतज्ज्ञांनी याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न वेळोवेळी केला आहे. मात्र त्याकडे आपण फारसे लक्ष दिलेले नाही. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा या कवितेमध्येही यातून कवीला सुचवायचे आहे ते मनोधैर्यच! या मनोधैर्यावरच महापुरासारख्या आपत्तीमध्ये जबर आघात झालेला असतो. कुणी निवृत्तीला आलेले, आता दोन वर्षांनी निवांत.. असा विचार कुणाच्या मनात तर कुणी घरकर्ज फेडून मुलाच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतलेला आणि आता हा असा अचानक घरदार उद्ध्वस्त करणारा महापुराचा महाप्रकोप. माणसे कोलमडून जाणे साहजिकच आहे. हे कोलमडणे सर्वार्थाने आहे. मानसिकदृष्टय़ा खचणे हे सर्वाधिक वाईट आहे. मात्र आपल्या आपत्ती व्यवस्थापनात त्यावरच्या उपायांना ठोस व ठाम स्थान नाही.

मनोविकारतज्ज्ञ सांगतात की माणसे पुरती कोलमडतात. त्यातून परिस्थितीचे भान यायलाच त्यांना दहा-पंधरा दिवस लागतात. त्यानंतरची स्थिती अधिक भेदक असते. खुट्ट झाले तरी मनात भीतीची कंपने सुरू होतात अनेकांच्या बाबतीत हे आघात आयुष्यभर सोबत राहतात. खचलेली मन:स्थिती आयुष्यभर सोबत करते आणि आयुष्यच उद्ध्वस्त झालेले असते. अनेकदा गावच्या गाव असे उदासीनतेच्या जबर फटक्याखाली येते. त्यांचे समुपदेशन महत्त्वाचे असते. त्यातही ती व्यक्ती ऐन तरुण असेल तर त्याच्यासमोर आणि कुटुंबासमोरही अनंत प्रश्नांची मालिकाच सुरू होते. अशा वेळेस गरज असते ती मनोधैर्याची. त्यासाठी मनोविकारतज्ज्ञ किंवा मानसोपचारतज्ज्ञ गरजेचे असतात. अशा वेळेस या तज्ज्ञांची फौज आपल्याकडे असावी लागते. पण आपल्याकडे मानसिक विकारांच्या बाबतीत आनंदी आनंदच आहे. अशा वेळेस आता फक्त पूरग्रस्तांचीच नव्हे तर समाज म्हणून आपल्या सर्वाच्याही मनोधैर्याचीच कसोटी असेल!

First Published on August 23, 2019 1:06 am

Web Title: maharashtra flood 2019 heavy rain
Next Stories
1 ओल्या दुष्काळात तेरावा महिना
2 आव्हान
3 कोंडलेला श्वास!