12 December 2019

News Flash

ऋतू सोहळा!

ऋतूंचे सोहळे भोगावे लागतात पंचसंवेदनांसह! शहरात निसर्ग नाही, असे म्हणून आपण मोकळे होतो, पण शहरातही त्याचे अस्तित्व असतेच, त्याकडे आपण लक्षही देत नाही.

आधुनिक युगात ताणतणाव प्रचंड वाढले आहेत. अशा अवस्थेत निसर्गच उपाय आणि उपचार असेल आणि त्यात ऋतूंची भूमिका महत्त्वाची असेल.

विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

किलबिल किलबिल पक्षी बोलती
झुळझुळ झुळझुळ झरे वाहती
पानोपानी फुले बहरती
फुलपाखरे वर भिरभिरती
स्वप्नी आले काही एक मी
गाव पाहिला बाई…

हे बालगीत जवळपास प्रत्येकाने लहानपणी ऐकलेले असते आणि तेव्हापासून त्या स्वप्नाच्या गावाचा शोध सुरू होतो.. आयुष्यात आपण मोठे होतो तरी स्वप्नाच्या गावाचा शोध सुरूच राहतो, पण त्या स्वप्नाच्या गावातील गोष्टी मात्र बदललेल्या असतात. झुळुझुळु वाहणाऱ्या झऱ्याची जागा जाकुझीने घेतलेली असते, तर मंद वाऱ्याची झुळूक जाऊन तिथे वातानुकूलित यंत्रातून येणारा गार वारा आपल्याला हवा असतो. किलबिलाटाची जागा सराऊंड साऊंड यंत्रणेने घेतलेली असते. स्वप्न असले तरी ते बदललेले असते. मग कधी तरी एकदा आपल्याला आधुनिक युगात अडकत चालल्याची जाणीव होते आणि मग साक्षात्कारासाठी आपण निसर्गाकडे वळण्याचा निर्णय घेतो..

आपल्या आजूबाजूला असलेले ऋतुचक्र समजून घेतले असते, अनुभवले असते किंवा भोगले असते, तर ही वेळ आली नसती. ऋतूंचे सोहळे भोगावे लागतात पंचसंवेदनांसह! शहरात निसर्ग नाही, असे म्हणून आपण मोकळे होतो, पण शहरातही त्याचे अस्तित्व असतेच, त्याकडे आपण लक्षही देत नाही. गावाकडच्या निसर्गाची गंमत असते तशी शहराकडच्या निसर्गाचीही एक गंमत असते; पण डोळे असले तरी नजर नसल्याने आपल्या हातून ती गंमत सुटते. शहरातही एखाद्या रस्त्याच्या कडेला किंवा मग चौरस्त्याच्या कोपऱ्यावर एखादा नीलमोहर भरभरून फुललेला असतो; पण आपले लक्ष जाते ते मात्र सिग्नलच्या लाल-पिवळ्या आणि हिरव्या रंगसंकेतांकडे. नीलमोहर मात्र आपण विसरून जातो. मग थेट भूतानला पर्यटनासाठी गेल्यावर पुनाखा झाँग बौद्ध मठाशेजारी हारीने फुललेला नीलमोहर पाहून आपण मोहरून जातो आणि मग परतल्यानंतर एके दिवशी सहज नजर जाते तेव्हा तो नाक्यावरचा नीलमोहर तोच भूतानचा आनंद सहज देऊन जातो.

आधुनिक युगात ताणतणाव प्रचंड वाढले आहेत. अशा अवस्थेत निसर्गच उपाय आणि उपचार असेल आणि त्यात ऋतूंची भूमिका महत्त्वाची असेल. या ऋतुचक्राकडे लक्ष जावे, त्यातील गंमत लक्षात यावी म्हणून या खेपेस ‘लोकप्रभा’ने ‘ऋतू पर्यटन’ असा वेगळा विषय या विशेषांकामध्ये हाताळला आहे. त्यात लडाखमधील गोठलेल्या नदीवरचा चद्दर ट्रेक आहे, तसाच जर्दाळूच्या बहराचा महोत्सवही आहे. जपानचा चेरी फुलांचा महोत्सव आहे तसा अंटाक्र्टिकावरील पेंग्विनचा वेगळा अनुभवही आहे. निसर्ग- ऋतुचक्र आणि आपले आयुष्य यात एक समान धागा आहे जोडणारा; पण त्याचाही आपल्याला एरवी विसर पडलेला असतो. युरोप-अमेरिकेतील नयनरम्य पानगळीचा सोहळा या अंकात आहे. येणाऱ्या वसंताची चाहूल तो सहज देऊन जातो आणि वसंताच्या तयारीचे शास्त्रही सहज सांगून जातो, फक्त त्यासाठी वेध घेणारी नजर मात्र हवी. हे सारे ऋतुचक्राचे सोहळे भोगायला हवेत; पण त्याची सुरुवात थेट पर्यटनाच्या अनुभवातून न होता आपल्याच आजूबाजूला असलेल्या नाक्यावरच्या वृक्षांच्या ऋतुचक्र सोहळ्यापासून व्हावी, इतकेच!

First Published on July 19, 2019 1:06 am

Web Title: understanding nature
Just Now!
X