शिवाजी पार्कला स्वत:चं एक व्यक्तिमत्त्व आहे. खरं तर दोन व्यक्तिमत्त्वं आहेत. मानसशास्त्रात अशी अनेक व्यक्तिमत्त्वं असणाऱ्या व्यक्तीला आजार असतो असं मानतात. मला हे पटत नाही. शाळेत असताना आमचे एक शिक्षक होते. सकाळी भाजी आणताना त्यांचं व्यक्तिमत्त्व आणि दुपारी आम्हाला निर्दयपणे चोपून काढताना दिसणारं व्यक्तिमत्त्व अत्यंत भिन्न होतं. पण ते मनोरुग्ण आहेत असं आम्हाला कधी वाटलं नाही.

दादरला माझ्या घराच्या जवळच शिवाजी पार्क आहे. या मैदानाला सामाजिक, राजकीय महत्त्व वगैरे आहे. अनेक पक्षांच्या ‘विराट’ सभा तिथे झाल्या आहेत, होत असतात. निवडणुकांच्या वेळी बहुतेक पक्षांची पहिली किंवा शेवटची सभा तिथे घेतली जाते. अत्रे, बाळासाहेब, राज ठाकरे आणि वाजपेयी अशा मोठमोठय़ा वक्त्यांची भाषणं या पार्कने ऐकलेली आहेत. दुसऱ्या दिवशी पेपरात ‘शिवतीर्थावर विराट सभा’ या मथळ्याखाली त्यांची पानभर वर्णनंही वाचायला मिळत. बऱ्याचदा तेच ते गर्दीचे फोटो बातमीखाली असल्यासारखे वाटायचे. पण त्या बातमीतला ‘विराट’ हा शब्द मला कायम खटकत आलाय. जो राजा असून जरासंधाच्या हातातलं बाहुला बनला होता, एक पुरुष सैरंध्री होऊन त्याच्या मुलीची सखी बनून राजवाडय़ात राहत होता, एक लोकोत्तर वीर आचारी होऊन त्याच्याकडे अन्न शिजवीत होता, डोईजड झालेल्या सेनापती कम् नातेवाईकाची हत्या करायला त्याचीच मदत घ्यावी लागली, त्याच्या गाई चोरल्या तेव्हा पांडवांना त्या लढून परत आणून द्याव्या लागल्या.. एकंदरीत त्या लढाईच्या वृत्तान्तावरून विराट राजाकडे गाई सोडल्यास दुसरं काहीही नव्हतं असं दिसतं. (मुंबईला पूर्वी गोरेगाव आणि वरळी इथून दुधाचा पुरवठा व्हायचा. आता ती व्यवस्था कोलमडून दूरदुरून सहकारी दूध संघांचं दूध डोक्यावर मारलं जातंय. आणि हे महासंघ एकेकाळी सत्तेत असणाऱ्यांचे आहेत. विराट राजाही असाच स्वत:च्या मालकीच्या गाईंचे दूध रयतेच्या गळ्यात मारत असेल का?) मग अशा राजाच्या नावाचा उल्लेख ‘प्रचंड’च्या ऐवजी ‘विराट’  का केला जातो? असे का बरे झाले? काही कळत नाही. हे जरासं विषयांतर झालं. असो!

तर अशा या शिवाजी पार्कला एक स्वत:चं व्यक्तिमत्त्व आहे. खरं तर दोन व्यक्तिमत्त्वं आहेत. मानसशास्त्रात अशी अनेक व्यक्तिमत्त्वं असणाऱ्या व्यक्तीला आजार असतो असं मानतात. मला हे पटत नाही. शाळेत असताना आमचे एक शिक्षक होते. सकाळी भाजी आणताना त्यांचं व्यक्तिमत्त्व आणि दुपारी आम्हाला निर्दयपणे चोपून काढताना दिसणारं व्यक्तिमत्त्व अत्यंत भिन्न होतं. पण ते मनोरुग्ण आहेत असं आम्हाला कधी वाटलं नाही. (वांड मुलांना चोपून काढायचा हक्क जाऊन आता सगळे शिक्षक नि:शस्त्र केले गेलेत. बिच्चारे!) थोडक्यात, शिवाजी पार्कला दोन ठळक व्यक्तिमत्त्वं आहेत. सकाळचं शिवाजी पार्क आणि उरलेल्या वेळेचं शिवाजी पार्क. प्रत्येक शहरात असं एक मैदान असतं. पण तिथे इथल्यासारखे प्रकार पाहायला मिळत नाहीत. पहाटे सुमारे साडेतीन-पावणेचारला शिवाजी पार्क जेमतेम तीन तासांची अर्धवट झोप डोळ्यात बाळगून जागं होतं. काही वरिष्ठ नागरिक तिथे फिरायला सुरुवात करतात. काही गबाळ्या वेशात असतात, तर काही अगदी ऐटबाज कपडे घालून येतात. आमचे दिवंगत मित्र नंदू जूकर लग्नाला चालतील असे कपडे घालून सकाळी फिरायला यायचे. काही जण सोबत कुत्रे घेऊन येतात, तर काही कुत्रे आपल्या मालक-मालकिणींना फिरायला घेऊन येतात. खूपदा त्या कुत्र्यांच्या डोळ्यांत मला अनावर झालेली झोप दिसून येते.

‘‘अवर कंट्री हॅज नो फ्युचर. आत्ता आमच्या सतीशकडे गेलो होतो फॉर चार मंथ्स. त्या यू. एस.मध्ये लाइफला व्हॅल्यू आहे हो! इकडे साला सगळं बेक्कार.’’ एखादा सुशिक्षित अडाणी माणूस आपलं ज्ञान पाजळत चालत असतो. त्यावर दुसरा त्याहून सुशिक्षित आणि अडाणी आपला वरचढपणा दाखवायला ‘‘ओह! फर्स्ट टाइम गेला होता का? मी बारा र्वष जातोय आमच्या मुलीकडे. तेव्हाचं आता तिथेही काही राहिलं नाही. आमच्या नातीच्या वेळेला गेलो होतो. तीन महिने होतो.’’ आता तिथे नोकर महाग आहेत म्हणूनच यांना बोलावलं होतं, हे कुठे सांगत बसा!

..तर त्याच वेळेला दुसरीकडे देशी अवतार आपली अज्ञानज्योत पेटवून कडाडत असतो.. ‘‘एकदा संघाच्या हातात द्या सगळं! सुतासारखे सरळ येतील.’’

‘‘बाहेरच्या लोकांना बोलवा आणि झोपडय़ा वाढवा. आणि द्या त्यांना पक्की घरं. काय गरज आहे फुकटात द्यायची? प्रत्येक घरात डिश टी. व्ही. असतो. पैसे खायला घालून यांना लाइट मिळते, पाणी मिळतं. करप्शन! दुसरं काय?’’

आता रेशनिंग ऑफिस किंवा पालिकेत आणि बेस्टमध्ये मराठीच लोक काम करतात. आणि हे सगळं झोपडपट्टीवासीयांना देणं यांच्याचमुळे शक्य होतं. पण हे सांगणार कोणाला? कारण इथला प्रत्येक जण आपल्या मतांचा सूर्य घेऊन येतो आणि इतरांनी आपल्या मतांचे ग्रह त्याच्याभोवती फिरते ठेवले पाहिजेत असा त्याचा हट्ट असतो.

‘‘काय सांगू सुमनताई! नाही म्हणजे नाही उठत आमची सूनबाई सातशिवाय! आपण तरी किती तोंड वाजवायचं? बरं, कातडं नाही ना ओढून घेता येत डोळ्यांवर? शेवटी हे इथं येणं बरं.’’

‘‘आमचाही सलील असा एकदम तिच्या मुठीत जाईल असं वाटलं नव्हतं. आपलेच भोग! दुसरं काय? घ्या! सुनेनं काल चिवडा आणलाय! घ्या, टाका तोंडात!’’ ..असंही ऐकायला मिळतं. नावं वेगवेगळी, पण तक्रार तीच!

मैदानाच्या बाहेर घोळक्याने धावणारे अनेक जण असतात. रहदारीला आपला अडथळा होतोय हे त्यांच्या डोक्यातच शिरत नाही. दुसऱ्या कोपऱ्यात बॅटएवढीसुद्धा उंची नसलेली मुलं क्रिकेटच्या नेटवर आणली जातात. त्यांच्या पालकांना आपला मुलगा भावी सचिन तेंडुलकर झाल्याची स्वप्नं पडायला लागलेली असतात. त्यांना काय सांगणार, की मुलगा सचिन तेंडुलकर होण्यासाठी तुमचं रमेश तेंडुलकर सरांचं नशीब असावं लागतं. बाकी त्यासाठी सचिनने घेतलेले कष्ट, मेहनत, गुणवत्ता आणि २०-२२ र्वष खेळण्यासाठी मुख्यत: लागणारी शारीरिक क्षमता त्याने स्वत: कमावली, हे कोणीच लक्षात घेत नाही. क्रिकेट इंग्लंडमध्ये जन्माला आलं नसून शिवाजी पार्कात आलंय असं वाटण्याइतकं क्रिकेटवर इथे बोललं जातं.

जगातल्या सगळ्या विषयांवर शिवाजी पार्कीयांना मतं असतात. त्यात पुन्हा दुसऱ्यांच्या मतांकडे किंवा सूचनेकडे दुर्लक्ष करणं हे शिवाजी पार्कचं वैशिष्टय़. काही जण एखादी फेरी मारून उर्वरित वेळात इतरांना केवळ सूचनाच करत असतात. कट्टय़ावर विविध गोष्टींची विक्री चालू असते. वेगवेगळे फळांचे रस, गव्हांकुरांचा रस, भाजीपाला, चहा-कॉफी, व्यायामाचे कपडे, मसाले, कडधान्ये, गजरे (हे सकाळी सहा वाजता कोण घेत असेल बरं?), नीरा, इडल्या, वडे, उपमा, पोहे.. जे म्हणाल ते! कसा कुणास ठाऊक, पण प्रत्येक विचारसरणीचा आपापला गट करून माणसं बसलेली असतात. एक नाना-नानी उद्यान आहे. तिथे त्यांच्यासाठी वर्तमानपत्रे येतात. कधी कधी चहा-बिस्किटंही असतात. छान गाणीही लागतात. काही लोक तिथे त्यांच्या अंदाजाने व्यायामाचे नि:शुल्क वर्ग चालवत असतात. त्यात हसण्याचा एक प्रकार असतो. ते खोटं खोटं हसणं मला फार विदारक वाटतं. खरं तर विदारक वगैरे नाही, चक्क विनोदी वाटतं. अरे, तुम्हाला हसताही येत नाही मनापासून? यावर लगेच ‘आता तसं विनोदी लिहीत नाही कोणी! सगळं संपत आलंय..’ असा विसंवादी सूर काही विद्वान लावतील; पण आहेत ना अजून! अत्रे आहेत, पु. ल. आहेत. शहरी, साडेतीन टक्केवाले नको असतील तर शंकर पाटील आहेत, द. मा. मिरासदार आहेत. मराठी वाचन तुमच्या सामाजिक दर्जाच्या खालच्या स्तराचं वाटत असेल तर आणि समजत असेल तर असंख्य इंग्लिश लेखक आहेत. वाचा ना आणि हसा ना मनमोकळं! आमच्या कट्टय़ावरचे एक अमराठी गृहस्थ हा हसण्याचा प्रकार बघून म्हणाले होते- ‘घर में बेटे और बहू रुलाते है, इसलिए यहाँ आकर हसते हैं!’ कधी कधी कोणीतरी शुगर चेक करायचं मशीन विकायला येतो. एक दिवस तो गर्दी जमवून जातो. एकदा ग्रीन-टीवाला आला होता आणि तो चहा वाटत होता. आम्ही जिथे बसतो तिथे समोरच आला. आम्ही कोणीच तो प्यायलो नाही. स्ट्रॉबेरी टी म्हणजे स्ट्रॉबेरीचीही चव लागत नाही आणि चहाचीही- असला प्रकार होता. पण लोकांनी गर्दी केली. लाखो-कोटींच्या गोष्टी करणारेही धक्काबुक्की करत चहा पीत होते. कारण काय, तर तो फुकट होता. हेही पार्कातल्या वैशिष्टय़ांपैकी एक.

कधी कधी एखादी गाडी येते. त्यातून कॅमेरा वगैरे उतरतो आणि शूटिंग सुरू होतं. मुख्यत्वे लोकांच्या विविध प्रतिक्रिया घेणं. लोक हिरीरीने पुढे जातात. मात्र, जरा काही वेगळा प्रश्न आला की अंग काढून घेतात. कातडीबचावूपणा हीसुद्धा पार्काची खासियत. पूर्वी कट्टय़ावर एक उभा आणि उरलेले ऐकताहेत अशी लोकांची गैरसोय होती. मध्यंतरी आमदार नितीन सरदेसाई यांनी तिथे बसायला कट्टय़ाच्या जवळच काही बाकं आणून बसवली आणि शेकडो वरिष्ठांची उत्तम सोय झाली. तसेच मैदानातून येणाऱ्या चेंडूपासून बचाव म्हणून जाळ्याही बसवल्या. (आता ते आमदार नाहीत; पण त्यांनी केलेल्या सोयी तशाच आहेत म्हणून ‘माजी’ हा शब्द वापरला नाही.) आज त्या जाळ्या नष्ट झाल्या आहेत. बऱ्याच वेळा तिथल्याच खेळणाऱ्यांनी त्याला भोकं पाडली आहेत. पुन्हा नव्याने त्या बसवून द्याव्या असा अर्ज करूया असं आम्ही आणि आसपासच्या काही गटांनी ठरवलं. त्यासाठी लोकांच्या सह्य़ांची मोहीम घ्यायला गेलो तर कोणी तयार नाही. काहींनी तर ‘सही करायलासुद्धा वेळ नाही हो! तुम्ही पुढे व्हा आम्ही आहोतच..’ असं बजावून सांगितलं. आपण सोडून इतर सुधारले की आपला समाज चटकन् हा-हा म्हणता सुधारेल, ही खास सकाळच्या शिवाजी पार्कीय जनतेची विचारसरणी.

आता नंतरचे शिवाजी पार्क पुढच्या भागात..

sanjaydmone21@gmail.com