– सुनील धवन

करोना काळात आपल्याला अनेक बदल झालेले पाहण्यास मिळाले. मग ती जीवन शैली असो किंवा इतर बदल असोत ते आपण आता स्वीकारले आहेत. करोना काळात आणखी एक महत्त्वाची बाब झाली ती म्हणजे आरोग्य विमा काढण्याकडे लोकांचा कल वाढला. करोना झाल्यानंतर उपचारांचा जो खर्च आहे तो खासगी रुग्णालयात काही लाखांच्या घरात आहे. त्यामुळे हा खर्च कव्हर करणारे आरोग्य विमा घेण्याकडे लोकांचा कल वाढला. ज्यांच्याकडे आधीच आरोग्य विमा होता त्यांनी त्यात करोनाचा समावेश करता येतो आहे का हे पाहून त्याप्रमाणे बदल करुन घेतले. करोना ची साथ आल्यापासून आरोग्य विमा घेतानाच्या अर्जात एक नवा पर्यायही निवडण्यास सुरुवात झाली.

आज घडीला सगळं जगच करोनाचा सामना करतं आहे. या करोना महामारीमुळे आर्थिक गोष्टींवर बराच ताण पडला. अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या किंवा पगार कपातीचाही सामना करावा लागला. मात्र या सगळ्यात महत्त्वाचे ठरले ते आरोग्य विमा. आरोग्य विमा असेल तर तो घेणाऱ्या ग्राहकांना त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा आरोग्याविषयीचा खर्च करणं कठीण गेलं नाही. दीर्घ काळासाठी गुंतवणूक केलेल्या रक्कमेला हात लावण्यापेक्षा अनेकांनी या काळात आरोग्य विम्याचा वापर केला.

करोनाचं संकट अद्यापही संपलेलं नाही. त्यामुळे आता तुम्ही जर हेल्थ इन्शुरन्स प्लान घेत असाल तर त्यासाठी पाच महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही आरोग्य विमान घेताना या पाच गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हालाच त्याचा फायदा होईल. आपण आता जाणून घेऊ काय आहेत या पाच गोष्टी..

१) जाणून घ्या-कोणत्या प्रकारचा आरोग्य विमा तुम्ही घेत आहात

आज घडीला अनेक प्रकारचे आरोग्य विमा उपलब्ध आहेत. या सगळ्या प्लानचं कव्हरेज वेगवेगळं आहे. काही आरोग्य विमा योजना या नुकसान भरपाई देणाऱ्या आहेत. काही आरोग्य विमा योजना या एकदम लाभ देणाऱ्या आहेत. ज्या योजनांमध्ये भरपाईचा उल्लेख आहे त्या विमा योजना हॉस्पिटलची बिलं किंवा इतर आरोग्य खर्चांची रक्कम देऊ शकतात. काही कंपन्या इन्शुरन्सची रक्कम थेट देतात. काही विमा कंपन्या थेट रुग्णालयांना बिल देऊन टाकतात. आपल्या स्वतःसाठी घेतलेली विमा योजना असो किंवा कुटुंबीयांसाठी घेतलेली आरोग्य विमा योजना त्यांना मेडिक्लेम असं संबोधलं जातं. हे मेडिक्लेम अनेक दुर्धर आजारांच्या उपचारांसाठी उपयोगी ठरतात.

उदाहरणार्थ एखाद्या कव्हरेजमध्ये आरोग्य विमा हा ९ लाखांचा असेल आणि जर आजाराच्या उपचारांचं बिल हे १ लाख ८० हजार आलं तर मेडिक्लेम प्रकारात येणाऱ्या विमा योजना या रुग्णलयांचं पूर्ण बिल भरतात. पण जेव्हा ग्राहकाने ‘क्रिटिकल इलनेस प्लान’ घेतला असेल तर त्याला ९ लाखांची पूर्ण रक्कम दुर्धर आजाराच्या वेळी मिळते. मात्र यासाठी कोणत्या रुग्णालयात दाखल केलं गेलं यासंबंधीच्या काही अटी-शर्थीही असतात.

आणखी एक गोष्ट लक्षात घ्या वैयक्तिक हेल्थ प्लान आणि क्रिटिकल इलनेस प्लान्स हे दोन्ही एकमेकांशी संलग्न नसतात. हे दोन्ही प्लान वेगळ्या कारणांसाठी काढले जातात. ते सारखे वाटत असले तरीही सारखे नसतात.

२) तुमच्या विमा योजनेच्या मर्यादा काय आहेत ते शोधा

तुम्ही जो आरोग्य विमा घेतला आहे. त्याचे सब लिमिट्स म्हणजे इतर मर्यादा काय आहेत ते पाहून घ्या. जर या मर्यादा तुम्ही पाहिल्यात आणि त्यानंतर आरोग्य विमा काढलात तर तुम्हाला कदाचित हॉस्पिटलचं बिल हे स्वखर्चाने भरावं लागणार नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सब लिमिट्स असणाऱ्या प्लान्सद्वारे डॉक्टरांची फी, नर्सिंग चार्जेस, आयसीयू चार्जेस, तसंच रोज लागणाऱ्या रुमचं रेंट हे सगळं संलग्न असतं. बहुतेकवेळा रुम रेंट हे एकूण लागणाऱ्या शुल्काच्या १ टक्का इतकंच मिळणारेही काही प्लान्स असतात. त्यामुळे पॉलिसी घेणाऱ्याने त्याला नेमका कोणता प्लान हवा आहे ते सब लिमिट पाहून ठरवायचं असतं.

३) ही खात्री करुन घ्याच

हेल्थ इन्शुरन्स किंवा आरोग्य विमा हे दीर्घ मुदतीचे असतात. त्यामुळे विमा पॉलिसी काढल्यापासूनच्या पहिल्या दिवसापासून ते लाभ देत नाहीत. पॉलिसी धारकाला काही आजार आधीच असतील तर त्यासाठीच्या उपचारांचाही खर्च यातून करता येत नाही ही बाब पॉलिसी विकत घेताना लक्षात ठेवा. जर एखाद्या विमा धारकाला तो विमा घेण्याआधी एखादा आजार झाला असेल तर विशिष्ट कालावधीनंतर पॉलिसीत कव्हर करता येऊ शकतो. मात्र विमा काढल्याच्या पहिल्या दिवसापासून करता येत नाही. सध्याच्या आरोग्य विमांच्या धोरणांनुसार हा कालावधी ४८ महिन्यांचा आहे. म्हणजे जवळपास चार वर्षे एखाद्या आधीपासून झालेल्या आजाराचा खर्च मिळण्यासाठी पॉलिसी धारकाला वाट बघावी लागते. काही विमा पॉलिसी कंपन्या ही मुदत ३६ महिन्यांपर्यंत देऊ शकतात.

दरम्यान ही गोष्ट नक्कीच लक्षात घेतली पाहिजे की आरोग्य विमा धारकाची मेडिकल हिस्ट्री त्याने पॉलिसी घेण्याआधी सांगायला हवी. जर त्याला आधीच काही आजार असतील तर त्याच्या उपचारांचे काय? हे त्याने नवी पॉलिसी काढण्याआधी विचार केलेले असले पाहिजे. ज्या विमा कंपनीतून विमा पॉलिसी काढायची आहे त्या कंपनीला आरोग्यविषयक सर्व माहिती पुरवली पाहिजे. त्यानंतरच पॉलिसी काढली पाहिजे

४) को पेमेंट्सच्या पर्यायांबाबत..

सध्याच्या घडीला काही आरोग्य विमा असेही आहेत जे खास करुन वयोवृद्धांसाठी किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आले आहेत. यामध्ये को पेमेंट हा पर्याय आहे ना याची खात्री करुन घ्या. समजा एखाद्या पॉलिसी धारक ज्येष्ठ नागरिकाला रुग्णालयात दाखल करावे लागले. तर त्याचा २० टक्के खर्च हा पॉलिसीधारकाला उचलावा लागतो. एखाद्या पॉलिसीधारकाने या पेक्षा जास्त खर्च उचलला तर प्रीमीयमची तेवढी बचत होऊ शकते.

५) आरोग्य विमा कव्हरेजच्या फिक्स्ड रकमेविषयी…

खरंतर एखाद्या आरोग्य विम्यासाठी कव्हरेज म्हणून किती रक्कम मिळू शकते हे मोजण्याचे कोणतेही गणक यंत्र नाही. तुम्ही कोणत्या शहरात राहता यावर हे ते बऱ्याचदा अवलंबून असतं. तसंच तुमच्या शहरांमध्ये किती आणि कोणती हॉस्पिटल्स आहेत यावरही ते अवलंबून असतं. कव्हरेजमध्ये पॉलिसीधारक आणि त्याचे कुटुंबीय येतात की नाही हे पाहणं गरजेचं आहे. तुम्ही जर एम्प्लॉयर ग्रुप हेल्थ कव्हरेजमध्ये पैसे गुंतवत असाल तर त्याचवेळी व्यक्तीगत हेल्थ कव्हरेज देणारा आरोग्य विमा काढायला विसरु नका.

आता तुम्हाला नेमकी कल्पना आली असेल की आरोग्य विमा नेमक्या कशाप्रकारे कार्यरत असतात. त्यामुळे आता आरोग्य विमा काढणार असाल तर या पाच गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि त्यानंतर तुमचा आरोग्य विमा घ्या. कोणत्याही आरोग्य विम्यावर खरेदीच्या आधी सही करताना त्यांनी दिलेल्या नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचायला विसरु नका.