प्रसाद रावकर

पालिकेच्या पर्यावरण अहवालातील निष्कर्ष; दक्षिण मुंबईतील अनेक भागांत मात्र दूषित पाणी

पालिकेच्या जल विभागाकडून मुंबईकरांना शुद्ध, निर्मळ पाणीपुरवठा होत असल्याचा दावा २०१८-१९ वर्षांच्या पर्यावरण स्थितिदर्शक अहवालात करण्यात आला आहे. मुंबईत केवळ सरासरी ०.७ टक्के दूषित पाणीपुरवठा झाल्याचे अहवालातील आकडेवारीच्या आधारे नमूद करण्यात आले आहे. तर वांद्रे पूर्व भागात पाणीपुरवठय़ाबाबत सर्व काही कुशलमंगल असून या भागात टिपूसभरही दूषित पाणीपुरवठा झालेला नाही असे आकडेवारीवरून दिसते. मात्र प्रत्यक्षात दक्षिण मुंबईमधील सी. पी. टँक, नळबाजार, भेंडीबाजार, डोंगरी यासह दाटीवाटीने उभ्या असलेल्या चाळी आणि झोपडपट्टय़ांमध्ये अधूनमधून होणाऱ्या दूषित पाणीपुरवठय़ामुळे नागरिक बेजार झाले आहेत. त्यामुळे या अहवालातील दूषित पाणीपुरवठा आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

पालिकेच्या पर्यावरण विभागाने २०१८-१९ या वर्षांचा पर्यावरण स्थितिदर्शक अहवाल तयार केला असून मुंबईकरांना करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठय़ाचा त्यात आढावा घेण्यात आला आहे. मुंबईकरांना स्वच्छ पाणी मिळते की नाही याची तपासणी करण्यासाठी मुंबईच्या २४ विभाग आणि २७ सेवा जलाशयातून दर दिवशी २०० ते २५० नमुने घेऊन त्यांची पालिकेच्या जी-उत्तर विभाग कार्यालयातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. पावसाळा, तसेच आपत्कालीन परिस्थितीत विविध विभागांमार्फत ३०० ते ३५० पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले जातात. या नमुन्यांच्या तपासणीच्या आधारे मुंबईत केवळ ०.७ टक्के दूषित पाणीपुरवठा झाल्याचा दावा करण्यात आला आहे. दूषित पाण्याचे २०१७-१८ मधील प्रमाण सरासरी एक टक्का, तर २०१६-१७ मध्ये सरासरी तीन टक्के होते.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे २०१८-१९ मध्ये पालिकेच्या एच-पूर्व म्हणजे वांद्रे पूर्व आणि आसपासच्या परिसरातील दूषित पाणीपुरवठय़ाचे प्रमाण सरासरी शून्य टक्के दर्शविण्यात आले आहे. मात्र, या परिसरातील झोपडपट्टय़ांमध्ये अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वारंवार येत असतात.  एम-पश्चिम (गोवंडी, मानखुर्द) आणि बी (डोंगरी, पायधुणी, नळबाजार, सी. पी. टँक) विभाग कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक म्हणजे अनुक्रमे सुमारे २.४ टक्के व २.१ टक्के दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे पालिकेने मान्य केले आहे. त्याखालोखाल ‘डी’ विभागात (गिरगाव, ग्रॅन्टरोड, ताडदेव) १.५ टक्के, एच-पश्चिम विभागात (खार, वांद्रे पश्चिम) १.३ टक्के, ‘एल’ विभागात (कुर्ला) १.२ टक्के, एम-पूर्व  विभागात (अणुशक्ती नगर, चेंबूर) १.९ टक्के, आर-मध्यमध्ये (बोरिवली पश्चिम) १.८ टक्के दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

जलवाहिन्यांतील गळती जबाबदार

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपासून सुमारे १०० ते १७५ कि.मी. दुरून जलवाहिन्यांच्या माध्यमातून जलशुद्धीकरण केंद्रांपर्यंत पाणी वाहून आणले जाते. जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केलेले पाणी जलवाहिन्यांच्या जाळ्यामार्फत मुंबईकरांच्या घराघरात पोहोचविले जाते. शुद्धीकरण केल्यानंतर केंद्रातून बाहेर पडणारे पाणी कोलिफॉर्म आणि ई-कोलाय जीवाणूमुक्त असते. मात्र जलवाहिन्यांमधून गळती होत असल्यामुळे मुंबईकरांच्या घरापर्यंत पोहोचताना वाटेत पाण्यात दूषित पाणी मिसळते. त्यामुळे काही भागांत आजही दूषित पाणीपुरवठा होत आहे.