News Flash

“आव्हाडांकडे पाठपुरावा केला, पण मुख्यमंत्र्यांकडे जाईपर्यंत दखल घेतली नाही”

म्हाडाच्या १०० खोल्या कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी देण्याच्या निर्णयाला स्थगिती... शिवसेना आमदार चौधरी यांनी तक्रारीवर मांडली भूमिका

म्हाडाच्या १०० खोल्या कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी देण्याच्या निर्णयाला स्थगिती... शिवसेना आमदारांनी तक्रारीवर मांडली भूमिका

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी टाटा कॅन्सर रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी म्हाडाच्या १०० खोल्या देण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या खोल्यांचा ताबा टाटा रुग्णालयाकडे देण्यात आला होता. मात्र, गृहनिर्माण विभागाने घेतलेल्या या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली. शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी याबद्दलची तक्रार मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. यानिर्णयावर जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली, तर अजय चौधरी यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

आमदार अजय चौधरी यांनी तक्रार केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गृहविभागाच्या निर्णयाला स्थगिती दिली. याविषयी टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार अजय चौधरी म्हणाले, “कॅन्सरग्रस्तांसाठी इथे जागा दिली जात असली, तरी त्यामुळे स्थानिकांच्या आरोग्याला धोका आहे. त्याविरोधात स्थानिक महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. यासंदर्भात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे पाठपुरावाही केला होता. पत्रं लिहिली. त्यांच्या पीएला भेटलो, पण मी मुख्यमंत्र्यांकडे जाईपर्यंत माझ्या तक्रारीची दखल घेतली नाही. मी कोणतीही सीमा ओलांडली नाही. स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींना विचार न घेता हा निर्णय घेण्यात आला”, असं आमदार अजय चौधरी यांनी म्हटलं आहे.

संबंधित वृत्त-कर्करुग्णांच्या नातेवाईकांसाठी घरे देण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती

“जितेंद्र आव्हाडांनी माझी दखल घेतली नाही. माझी दखल न घेतल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जावं लागलं. जितेंद्र आव्हाड यांना दोन पत्रं लिहिली पण दखल घेतली नाही. माझ्याकडे कागदोपत्री पुरावे आहेत. मी निराधारपणे बोलत नाही. मला जितेंद्र आव्हाड यांनी भेटण्यासाठी वेळ दिली नाही. ज्यावेळी हा निर्णय झाला, त्यावेळी स्थानिक महिलांनी म्हाडाच्या सीईओंना घेराव घातला होता”, असंही चौधरी म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या तक्रारीत चौधरींनी काय म्हटलं आहे?

“आपल्या मतदार संघातील सुखकर्ता आणि विघ्नहर्ता या पुनर्विकसीत इमारतींमध्ये ७०० मराठी कुटुंब राहतात. येथील १०० सदनिका कर्करूग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी देण्याच्या म्हाडाच्या निर्णयामुळे या रहिवाशामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे या निर्णयाला तत्काळ स्थगिती द्यावी आणि याऐवजी भोईवाडा येथील म्हाडा गृहसंकुलामध्ये तयार इमारतीमधील सदनिका टाटा रूग्णालयास द्यावी,” असं चौधरी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलेलं आहे.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

“आपण हा निर्णय एका उदात्त भावनेनं घेतला होता. यामध्ये माझा कुठलाही स्वार्थ नाही. बाहेर गावाहून येणाऱ्या कॅन्सरच्या रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय व्हावी, या एका उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला होता. पण या निर्णयाला स्थगिती येणं ही दुर्देवाची बाब आहे”, असं सांगत आव्हाड यांनी स्थगितीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 12:02 pm

Web Title: 100 flats in mhada buildings to tata cancer hospital cm uddhav thackeray stays allotment jitendra awhad ajay choudhary bmh 90
Next Stories
1 ओबीसी आरक्षणाशिवाय पोटनिवडणुका; भुजबळांचा सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा
2 रुग्णाच्या डोळ्याला उंदीर चावल्याने इजा
3 कर्करुग्णांच्या नातेवाईकांसाठी घरे देण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती
Just Now!
X