भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारताच ‘शत प्रतिशत’ भाजपचा नारा दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना हवी असेल, तरच शिवसेनेशी युती केली जाईल, अन्यथा स्वबळावर निवडणुका लढण्याचे दानवे यांनी जाहीर केले. मात्र शिवसेना जुना मित्रपक्ष असून आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाणार नसल्याचेही दानवे यांनी स्पष्ट केले.
प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यावर दानवे दिल्लीहून गुरुवारी मुंबईत व प्रदेश कार्यालयात आले. त्यांचे मोठय़ा दणक्यात व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना दानवे यांनी सरकार आणि पक्षात योग्य समन्वय साधला जाईल आणि मंत्र्यांमध्येही विसंवाद राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असेही दानवे यांनी सांगितले. महसूल मंत्री एकनाथ खडसे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज नसून प्रसिध्दीमाध्यमांमधूनच केवळ तशा बातम्या येत आहेत. त्याचबरोबर मंत्र्यांमध्येही समन्वय राखला जात असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले.
आगामी काळात नवी मुंबई, औरंगाबाद आणि पालघर जिल्हा परिषदेची निवडणूक होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेशी युती ठेवायची की नाही, याचा निर्णय स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या इच्छेनुसार घेतला जाईल, असे दानवे यांनी सांगितले. विधानसभा निवडणूकही भाजपने स्वबळावर लढविली असून ‘शत प्रतिशत’ भाजपसाठी चांगले वातावरण असल्याचा विश्वासही व्यक्त केला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार दुष्काळग्रस्तांना मदत करण्यात कमी पडत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे, त्याबाबत विचारता ते त्यांचे ‘वैयक्तिक मत’ असेल, अशी टिप्पणी दानवे यांनी केली. राज्य मंत्रिमंडळात शिवसेना व घटकपक्षांना किती स्थान द्यायचे, याचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील, असे त्यांनी सांगितले.