पूर्व उपनगरातील १०२ रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे रद्द; डागडुजीची गरज नसलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे

मुंबई महापालिका हादरवून सोडणाऱ्या गेल्या वर्षीच्या रस्ते घोटाळय़ाची चौकशी अद्याप पूर्ण झाली नसताना, पूर्व उपनगरात आणखी एक रस्ते घोटाळा होता होता फिस्कटला आहे. पूर्व उपनगरातील ३११ रस्त्य़ांचे नूतनीकरण करण्याची कामे देण्यात आली होती. मात्र, यापैकी ३२ रस्त्यांना डागडुजीची गरज नसल्याचे व ७० रस्त्यांचे केवळ पृष्ठभाग दुरुस्त करण्याची गरज असल्याचे उघड झाले. त्यानंतर या १०२ रस्त्यांची कामे रद्द करण्यात आली आहेत. पालिका अधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे त्या त्या भागांतील स्थानिक नेतेमंडळींचे आर्थित हितसंबंध मात्र दुखावले गेले आहेत.

मागील वर्षभरात रस्ते विभागाने वॉर्ड पातळीवरून दुरुस्ती आवश्यक असलेल्या रस्त्यांची यादी मागवली होती. त्यानुसार पूर्व उपनगरात ३११ रस्ते नव्याने तयार करण्याचे (प्रकल्प रस्त्याचे) कंत्राट देण्यात आले. त्यानंतर या उपनगरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली झाली. नव्याने आलेल्या अधिकाऱ्याने केलेल्या पाहणीनंतर ३११ पैकी ३० रस्त्यांना कोणत्याही प्रकारच्या डागडुजीची गरज नसल्याचा निर्वाळा देत प्रकल्प रस्त्यांच्या कामातून पूर्ण वगळण्यात आले तर ७२ रस्ते नव्याने तयार करण्याऐवजी त्याचा केवळ पृष्ठभाग नीट (रिसरफेसिंग) करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सर्व रस्त्यांची कामे आधीच देण्यात आली होती. ‘पाहणी करून रस्त्यांच्या कामात बदल करण्याचे, ते रद्द करण्याचे अधिकार पालिकेकडे आहेत. रस्त्यांच्या कंत्राटात ते नमूद केलेले असते. त्या अधिकाराचा वापर करून हे रस्ते प्रकल्प कामातून वगळण्यात आले’ असे पालिकेच्या रस्ते विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

फेब्रुवारी २०१७ मध्ये पालिकेच्या निवडणुका झाल्या. या पाश्र्वभूमीवर २०१६-१७ या आर्थिक वर्षांत पालिकेने तब्बल १०४० रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिली. २०१५ मध्ये महानगरपालिकेकडून साधारण ५०० रस्त्यांना मंजुरी देण्यात आली होती. पावसाळा संपल्यानंतर १ ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली. त्यात पूर्व उपनगरातील २८१ रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यांमधून आधीच ३० रस्ते वगळण्यात आले. हे रस्ते दुरुस्त करण्याची गरज नसल्याचे लक्षात आले. त्याचप्रमाणे २८१ पैकी ७२ रस्ते मुळापासून तयार करण्यापेक्षा त्यांचा केवळ पृष्ठभाग तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सर्व रस्त्यांसाठी पालिकेने १७२ कोटी ८४ लाख रुपयांची कंत्राटे दिली होती. मात्र ३११ पैकी १०२ रस्ते वगळल्याने पालिकेच्या ८४ कोटी ३९ लाख रुपयांची बचत झाल्याचा दावा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला. पश्चिम उपनगरात ४१३ रस्त्यांची कामे तर शहराच्या दक्षिण भागात १४१ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. यातील कोणतेही रस्ते वगळण्यात आले नाहीत. आता पुन्हा पालिकेने पूर्व उपनगरात प्रामुख्याने भांडुप व मुलुंड येथील रस्त्यांची पाहणी करून दुरुस्ती आवश्यक असलेल्या रस्त्यांचा अहवाल मागवला आहे. वगळण्यात आलेल्या रस्त्यांचा नव्याने समावेश  करण्यासाठी राजकीय प्रयत्न सुरू आहेत. मात्र ‘वगळण्यात आलेले कोणतेही रस्ते पुन्हा नव्याने घेण्यात येणार नाहीत. ज्या रस्त्यांची कामे करणे आवश्यक आहेत, त्या रस्त्यांचीच पाहणी करण्यात येत आहे,’ असे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी सांगितले.

पूर्व उपनगरे

* कंत्राट दिलेले रस्ते – ३११

* पूर्ण वगळलेले रस्ते – ३०

* नव्याने तयार करण्याऐवजी पृष्ठभाग नीट करण्यासाठी दिलेले रस्ते – ७२