दुबईला जाणाऱ्या ११ प्रवाशांना अटक

सहार पोलिसांनी दुबईला निघालेल्या ११ प्रवाशांना अटक करून त्यांच्या ताब्यातील तब्बल ५५ क्रेडिट, डेबिट आणि इंटरनॅशनल करन्सी किंवा ट्रॅव्हल कार्ड्स हस्तगत केली. या प्रत्येक कार्डावर एक लाख दिऱ्हाम जमा होते. शिवाय प्रत्येकाच्या झडतीत दहा हजार दिऱ्हाम आढळले. चौकशीदरम्यान अटक आरोपी दुबईत उतरताच ही कार्ड्स तेथील व्यक्तींकडे सुपूर्द करणार होत्या. त्याआधारे दुबईतून पैसे काढले जाणार होते. धक्कादायक बाब ही की, यांच्याप्रमाणेच आणखी ५८ व्यक्ती प्रत्येकी पाच कार्ड्स घेऊन दुबईला रवाना झाल्या. आतापर्यंतच्या तपासातून अवैध हवाला व्यवसायाची ही नवी पद्धत असावी या निष्कर्षांवर सहार पोलीस पोहोचले आहेत.

या कारवाईबाबत माहिती देताना परिमंडळ आठचे पोलीस उपायुक्त अनिल कुंभारे यांनी सांगितले की, ५ मार्चच्या मध्यरात्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईला जाण्यासाठी आलेल्या समीना सय्यद अली (२४) या तरुणीला संशयास्पद हालचालींमुळे सुरक्षा अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. तेव्हा तिच्याकडे १० हजार दिऱ्हाम आणि विविध बँकांची, खासगी वित्त संस्थांची डेबिट, क्रेडिट, ट्रॅव्हल कार्ड्स सापडली. समीनाला सहार पोलिसांच्या हवाली केले गेले. तेथील चौकशीत तिच्याप्रमाणेच दुबईला जाणाऱ्या अन्य दहा जणांना ताब्यात घेतले गेले.