स्मारकाआड येणारी ७९ झाडे तोडणार; ३७ झाडांचे पुनर्रोपण

मुंबई : दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील इंडिया युनिट मिल क्रमांक ६ (इंदू मिल)च्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असून मिल परिसरातील तब्बल ११६ झाडे स्मारकाआड येत होती. ही  झाडे तोडण्याची परवानगी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत गुरुवारी देण्यात आली.

गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीची दखल घेत केंद्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी इंदू मिलची जागा देण्यास हिरवा कंदील दाखविला. इंदू मिलमध्ये उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा आराखडा तयार करण्यात आला असून या स्मारकाआड इंदू मिलमधील ११६ झाडे येत होती. त्यामध्ये आंबा, पेरू, फणस, जांभूळ, शेवगा, सुपारी, सोनमोहर, जंगली बदाम, गुलमोहर, अशोक, समुद्रफूल, पिंपळ, वड, सुबाभूळ, उंदी, ओतांब, पुत्रंजिवा, निम, पायर, गुंज, चाफा आदी झाडांचा समावेश आहे. ही झाडे हटविण्यास परवानगी मिळावी म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)च्या कार्यकारी अभियंत्यांनी पालिकेकडे अर्ज सादर केला होता. या अर्जाची दखल घेत पालिकेच्या उद्यान विभागाने इंदू मिल परिसराची पाहणी केली. तसेच आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्याची सूचनाही केली. त्यानुसार एमएमआरडीएने १९ जून रोजी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केली होती.

आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात आल्यानंतर त्यांची पडताळणी करून पालिकेच्या उद्यान विभागाने ७९ झाडे तोडण्यास आणि ३७ झाडांचे पुनर्रोपण करण्यास परवानगी दिली. याबाबतचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीच्या गुरुवारच्या बैठकीत सादर करण्यात आला होता. समितीने एकमताने या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यामुळे स्मारकाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात आल्यानंतर इंदू मिल परिसरात कापण्यात येणाऱ्या झाडांच्या जातीसह अन्य जातीच्या झाडांचे रोपण करण्यात येणार

आहे. तसेच मूळ जागेवरून हटविण्यात येणाऱ्या काही वृक्षांचे मिल परिसरात पुनर्रोपण करण्यात येणार आहे, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.