जयेश शिरसाट

१४४ टेनामेन्ट, चिंचपोकळी

चिंचपोकळी स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेली १४४ टेनामेन्ट मुंबईच्या संघटित गुन्हेगारी जगतातलं एक प्रमुख ठाणं. ही चाळ शहरातील एका सुसज्ज संघटित टोळीचं मुख्यालय होती. पण चाळीत घडलेल्या थरारक घटना घडामोडींमुळे ती जास्त चर्चेत आली. एके ४७, एके ५६ सारखी अद्ययावत शस्त्रं १४४ टेनामेन्टने सर्वात आधी पाहिली. हा अद्ययावत शस्त्रसाठा बरीच र्वष बाळगला आणि टोळीयुद्ध, गुन्ह्य़ांमध्ये वापरला. कट्टर प्रतिस्पर्धी टोळ्यांनी टेनामेन्टकडे हा शस्त्रसाठा हक्काने मागितला. टेनामेन्टनेही तो दिला.

महापालिकेने आपल्या कामगारांसाठी शहरात अनेक ठिकाणी बहुमजली चाळी उभारल्या. त्यातलीच ही एक १४४ क्रमांकाची टेनामेन्ट. १९७०च्या दशकात या चारमजली चाळीतील निम्म्या खोल्यांमध्ये महापालिकेचे चतुर्थश्रेणी कामगार, त्यांची कुटुंबं राहात होती. तर उर्वरित खोल्या आपात्कालीन परिस्थितीत बेघर झालेल्यांना तात्पुरता निवारा म्हणून राखीव होत्या. त्यामुळे सुरुवातीपासूनच ही चाळ बहुभाषिक होती. पुढे अमर नाईक, रमेश भोगले ऊर्फ डॉक्टर, अश्विन नाईक, दशरथ रहाणे, कृष्णा पिल्ले, कुमार पिल्ले, वालजी-पालजी या आणि अशा संघटित टोळीतील अन्य म्होरक्यांच्या अस्तित्वामुळे ही चाळ पोलीस अभिलेखावर लाल ठिपक्याने रंगवण्यात आली. सध्या पुनर्विकासासाठी ही चाळ पाडण्यात आली आहे. चाळीतील रहिवाशांना आसपासच्या परिसरात तात्पुरत्या स्वरूपातला निवारा उपलब्ध करून देण्यात आलाय. एका बडय़ा विकासकाने या चाळीच्या जागेत टोलेजंग टॉवर उभारण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे.

१९७८च्या सुमारास अमर नाईक पहिल्यांदा या चाळीत आला. त्याआधी या चाळिशी त्याचा किंवा त्याच्या संघटित गुन्हेगारी टोळीचा काडीमात्र संबंध नव्हता. अमरचे वडील मारुती नाईक दादरच्या घाऊक भाजी बाजारातील व्यापारी. मूळचे नाशिकचे. सुरुवातीपासूनच टपोरी असलेल्या अमरने दादरच्या छबिलदास गल्लीत टोळी बनवून गुन्हेगारी कारवाया सुरू केल्या. याचदरम्यान एका मटक्याच्या अड्डय़ाच्या मालकाच्या हत्येप्रकरणी अमरवर गुन्हा दाखल झाला. त्या वेळी अमर आणि त्याचे साथीदार एका मित्राच्या मदतीने १४४ टेनामेन्टमध्ये लपून राहिले. खटला सुरू झाला तेव्हा वकिलाची फी देण्यासाठी या टोळीने मध्य मुंबईतील मटका, गावठी दारूचे अड्डे लुटण्यास सुरुवात केली. खटल्यातून निर्दोषमुक्त झाल्यानंतर अमरने टेनामेन्टमध्येच ठाण मांडलं. दादरमधील मित्रमंडळी, कारागृहात असताना जवळ आलेले तरुण सारेच टेनामेन्टच्या खाली उभे राहू लागले आणि टेनामेन्ट अमर नाईक टोळीचं मुख्यालय बनलं. पोलिसांची धाड पडली किंवा प्रतिस्पर्धी टोळीने हल्ला केलाच तर निसटण्यासाठीचे चोर रस्ते, टोळीचं कार्यालय, साथीदारांना निवाऱ्याची व्यवस्था, फायरिंग बट अशी व्यवस्था हळूहळू टेनामेन्टमध्ये तयार केली गेली. टोळीने टेनामेन्टसमोर देवीचं मंदिर बांधलं आणि दरवर्षी मोठय़ा थाटामाटात नवरात्रोत्सव सुरू केला. जो आजही आकर्षक देखाव्यांसाठी शहरात प्रसिद्ध आहे.

टेनामेन्टमध्ये आल्यावर अरविंद ढोलकिया या बडय़ा तस्कराने अमर टोळीला जवळ केलं. व्ही. पी. मार्गावरील अलंकार सिनेमाजवळ ढोलकियाचं कार्यालय होतं. त्याच्या तस्करी उद्योगाला संरक्षण पुरवता पुरवता अमरने गंगा-जमुना, रॉक्सी, ऑपेरा हाऊस या चित्रपटगृहांमधला तिकीट ब्लॅकचा व्यवसाय आपल्या हाती घेतला. याच परिसरात गावठी दारूचा गुत्ता सुरू केला. ढोलकियाच्या माध्यमातून त्या काळात तस्करीतले बडे असामी लालूभाई आणि कृष्णा पिल्ले यांच्याशी अमरची ओळख झाली. अमर-कृष्णा जीवलग मित्र बनले. याच मत्रीमुळे कृष्णाने अमरला एके ४६, एके ५६ अशी अद्ययावत शस्त्रे पुरवली. कृष्णाचा संपर्क तामिळी वाघांशी होता, अमरकडील अद्ययावत शस्त्रांचा स्रोत तामिळी वाघ होते, ही पोलीस दलातली चर्चा टेनामेन्ट खोडून काढते.

अमरला रावण तर त्याच्या टोळीला बापट कंपनी अशी नावं पडली. स्वभावामुळे अमरला रावण म्हणत. टोळीचा ब्रेन भोगले. त्याचे वडील डॉक्टर म्हणून भोगलेला डॉक्टर म्हणूनच हाक मारली जायची. तर या बापट कंपनीचं दादरवर वर्चस्व होतं. इथले बहुतांश भाजीचे मळे, बाजारपेठा, व्यावसायिक अमरच्या ताब्यात होते. पूर्व उपनगरात कृष्णा-कुमार पिल्ले तर दक्षिण मुंबईत दशरथ रहाणे टोळीची कमान सांभाळून होते. बैज्या, एैक्क्या, पोत्या ही आणखी काही नावं. शाबीरच्या हत्येनंतर पठाण टोळीपासून वाचवा अशी याचना घेऊन दाऊद स्वत: टेनामेन्टमध्ये आला होता. टेनामेन्टसमोरील त्रिकोणी इमारतीच्या तोंडावरच्या पेट्रोल पंपावर भोगले आणि दाऊदची भेट घडली. ‘बघू, विचार करतो,’ हे भोगलेचे शब्द घेऊन दाऊद परतला. त्या वेळी अमरने दाऊदला मदत करण्यास प्रखर विरोध केला. अखेर दाऊदला लाल विटांच्या चाळीने मदत केली. गवळी टोळी, गोल्डन टोळीशी टेनामेन्टशी खाशी दुश्मनी होती. सुरुवातीला कोणाशीच काही वाकडं नव्हतं. पण गवळीने अश्विनच्या सासऱ्याची हत्या घडवली आणि जे फाटलं ते कधी जुळलंच नाही. गवळी-नाईक यांच्यात भयानक टोळीयुद्ध घडलं. टोळीतील प्रमुख साथीदारांच्या हत्यांसोबत आर्थिक मदत करणारे फायनान्सर, हप्ता देणाऱ्या व्यापारी-व्यावसायिकांच्या हत्या घडू लागल्या. १९९४ मध्ये अमर टोळीने खटाव मिलचे मालक सुनीत खटाव यांची महालक्ष्मी परिसरात हत्या केली. या हत्याकांडालाही दोन टोळ्यांमधील शत्रुत्वाची किनार होती. मात्र खटाव यांच्या हत्येने अमर टोळीला उतरती कळा लावली. अटकसत्र सुरू झालंच, पण चकमकींमध्ये टोळी निम्मी झाली. तीन वर्षांनी अमर पोलिसांच्या चकमकीत ठार झाला. ही चकमक घडली तेव्हा अमरच्या ताब्यात त्या काळातील सर्वात महागडी, परदेशातून आयात केलेली कार होती. ती कुठे गेली त्याचं कोडं अद्यापही टेनामेन्टला सुटलेलं नाही. अमरच्या मृत्यूआधी दाऊद टोळीने टेनामेन्टमध्ये घुसून रमेशची हत्या केली. पोलिसांनुसार भोगलेची हत्या टोळीयुद्धांमधील प्रमुख घटना. अमर, भोगले यांच्या मृत्यूनंतर अश्विन नाईक बापट कंपनीचा म्होरक्या बनला. पत्नी व शिवसेना नगरसेवक नीता नाईक यांच्या हत्येसह अश्विनवर असंख्य गंभीर गुन्हे नोंद केले गेले.

पत्नीच्या हत्येच्या गुन्ह्य़ातून अश्विनची निर्दोष सुटका झाली. सध्या खंडणीच्या गुन्ह्य़ात अश्विन कारागृहात बंद आहे.

अश्विनची अटक, टोळीतील प्रमुख गुंडांचा पोलीस चकमक किंवा प्रतिस्पर्धी टोळीच्या हल्ल्यात मृत्यू यामुळे बापट टोळीची दहशत नावापुरती आणि ठरावीक भागापुरती मर्यादित राहिली. साधारण बावीसेक र्वष टेनामेन्ट एका संघटित टोळीचा अभेद्य किल्ला होता. तो मात्र कधीच ढासळला.

jayesh.shirsat@expressindia.com