या आठवडय़ापासून सुविधा उपलब्ध; रुबी अल्केअर संस्थेकडून डॉक्टरसह निमवैद्यकीय कर्मचारी

मुंबई : पालिकेचे १५ दवाखाने या आठवडय़ापासून सकाळच्या नियमित कालावधीव्यतिरिक्त संध्याकाळीही ४ ते ११ या वेळेत खुले राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांना आता संध्याकाळच्या वेळेत पालिकेची आरोग्य सेवा उपलब्ध असेल.

शहरभरात पालिकेचे १७५ दवाखाने आहेत. सकाळी नऊ ते चार या वेळेत सुरू असणाऱ्या या दवाखान्यांमध्ये प्राथमिक आरोग्य सेवा दिली जाते.

हे दवाखाने संध्याकाळच्या वेळी उपलब्ध नसल्याने कामावर जाणाऱ्यांना उपचार घेता येत नाही. तसेच संध्याकाळी प्रकृती बिघडल्यास कोणतीही व्यवस्था उपलब्ध नसल्याने या रुग्णांचा भार मुख्य किंवा उपनगरीय रुग्णालयांवर येतो. तेव्हा रुग्णांसाठी संध्याकाळी चारनंतरही आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी सार्वजनिक खासगी तत्त्वावर शहरातील दवाखाने संध्याकाळी ४ ते ११ या वेळेत खुले ठेवण्याचा निर्णय डिसेंबर २०१९ मध्ये घेतला गेला. यासाठी १५ दवाखान्यांची निवडही केली होती.

रुबी अल्केअर संस्थेच्या मदतीने या आठवडय़ापासून हे दवाखाने संध्याकाळी खुले होतील. दवाखान्यातील पायाभूत सुविधा पालिकेच्या असतील, तर डॉक्टरसह निमवैद्यकीय कर्मचारी संस्थेचे असतील. मात्र आवश्यक औषधांचा साठा हा पालिकेकडून पुरविला जाईल. यात त्या दिवसापुरतीच औषधे दिली जातील. पुढील औषधे घेण्यासाठी रुग्णांना सकाळच्या वेळेत दवाखान्यात यावे लागेल. प्राथमिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यासाठी म्हणून हा प्रयोग केला आहे. पुढील टप्प्यांमध्ये ३५ दवाखाने संध्याकाळी सुरू केले जातील, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिली. दवाखाने संध्याकाळी सुरू करण्यासाठी २०२०-२१  या वर्षांच्या अर्थसंकल्पामध्ये १.२८ कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.

हे दवाखाने सुरू राहणार

* कुलाबा पालिका दवाखाना

* वालपाखडी पालिका दवाखाना

* बने कंपाऊंड पालिका दवाखाना ल्ल रावळी कॅम्प, सायन कोळीवाडा

* वडाळा पालिका दवाखाना

* बीडीडी चाळ पालिका दवाखान

* साऊटर स्ट्रीट पालिका दवाखाना

* कलिना दवाखाना, सांताक्रूझ

* जुना खार दवाखाना

* एन.जे.वाडिया दवाखाना, अंधेरी(पश्चिम)

* चोकसी दवाखाना

* गोराई म्हाडा दवाखाना

* चुनाभट्टी दवाखाना

* रमाबाई आंबेडकर पालिका दवाखाना

* कांजुरगाव दवाखाना