News Flash

राज्यात वर्षभरात १६,५३९ बालमृत्यू

न्यायालयांनीही राज्यातील बालमृत्यूबाबत चिंता व्यक्त करीत वेळोवेळी आरोग्य विभागाच्या कारभारावर ताशेरे आढले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

संदीप आचार्य

बालमृत्यू रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्यानंतरही राज्यात गेल्या वर्षभरात १६ हजारांहून अधिक बालमृत्यू झाले. त्यातील ६६ अर्भकमृत्यू आहेत. बालमृत्यूचा दर सातत्याने कमी होत असून अर्भकमृत्यूचे प्रमाण हजारामागे १९ पर्यंत खाली आल्याचा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात येत असतानाच हे धक्कादायक वास्तव समोर आल्याने सरकारचा दावा फसवा असल्याचे आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

न्यायालयांनीही राज्यातील बालमृत्यूबाबत चिंता व्यक्त करीत वेळोवेळी आरोग्य विभागाच्या कारभारावर ताशेरे आढले आहेत. प्रामुख्याने आदिवासी जिल्ह्यंमध्ये बालमृत्यू व अर्भकमृत्यूचे प्रमाण मोठे असून सक्षम आरोग्य यंत्रणेच्या अभावी बालमृत्यू वाढत असल्याचे ग्रामीण क्षेत्रातील डॉक्टरांचे म्हणणे आहे. दुर्गम व डोंगराळ भागात घरीच बाळंतपण होते व बाळाच्या काळजीचे ज्ञान नसल्यामुळे घरी प्रसूती होणाऱ्या नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त असते.

आरोग्य विभागाच्याच आकडेवारीनुसार २०१८-१९ मध्ये १६,५३९ बालकांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून यातील बहुतेक मृत्यू हे जंतुसंसर्ग,न्युमोनिया तसेच जन्मता वजन कमी असल्यामुळे आणि श्वासारोधामुळे होतात. गेल्या काही वर्षांत नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभागात ६६० खाटांची व्यवस्था केली असली तरी याठिकाणी व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध नसल्याचा आक्षेप आहे. याबाबत आरोग्य विभागातील ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एनआयसीयूमध्ये व्हेंटिलेटर असणे अपेक्षित नाही. तथापि नवजात बालकांसाठी आवश्यक असणाऱ्या अन्य सर्व वैद्यकीय सुविधा या अतिदक्षता विभागात आहेत. मात्र, आरोग्य विभागातील हजारो रिक्त पदांमुळे तसेच पुरेसे बालरोग तज्ज्ञ उपलब्ध होत नसल्यामुळे बालमृत्यू परिणामकारकपणे रोखता येत नाहीत. सुरक्षित प्रसूतीसाठी प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, जननी शिशु सुरक्षा योजना आदी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचप्रमाणे नवजात बालकाची काळजी घेण्यासाठी दाई प्रशिक्षण योजनेसह अनेक योजना राबविण्यात येत असल्या तरी २०१८-१९ मध्ये नंदुरबार जिल्ह्यत घरी प्रसुती झाल्यानंतर ४२६ नवजात बालकांचा मृत्यू झाला तर अमरावतीमध्ये ३०९ आणि गडचिरोलीत ६१ नवजात बालकांचा मृत्यू झाला.

राज्यात वर्षांकाठी १५ लाख बालकांचा जन्म होतो. त्यापैकी सुमारे आठ लाख बालकांचा जन्म हा आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये होतो. घरातच प्रसूती होण्याचे प्रमाण कमी आहे. २०१४ मध्ये दरहजारी बालमृत्यूचे प्रमाण हे २२ एवढे होते ते कमी होऊन १९ वर आले असून ते १० पर्यंत खाली आणण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.

-साधना तायडे, आरोग्य संचालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2019 2:14 am

Web Title: 16539 child deaths during the year abn 97
Next Stories
1 सिडकोच्या विकास नियंत्रण नियमावलीतील बदलास राज्य सरकारची मंजुरी
2 शिक्षण विभागात मनुष्यबळाची कमतरता
3 अंतर्गत गुणदान पुन्हा सुरू होणार!
Just Now!
X