शरीरसंबंधास नकार देणाऱ्या २० वर्षांच्या तरुणीची तिच्या मित्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना नालासोपारा येथे घडली. त्या दोघांची फेसबुकवरुन ओळख झाली होती. पोलिसांनी आरोपी हरिदास निरगुडे याला अटक केली आहे.

नालासोपारा येथे राहणाऱ्या हरिदास निरगुडे या तरुणाची काही महिन्यांपूर्वी वाशीतील २० वर्षांच्या तरुणीशी फेसबुकवरुन ओळख झाली होती. दोघांमधील चॅटिंगही वाढले होते. अखेरीस दोघांनी भेटण्याचा निर्णय घेतला. हरिदासने तिला बहिणीच्या घरी बोलावले होते. रविवारी ती राजनगरमधील तानीय मोनार्क या इमारतीत हरिदासच्या घरात गेली.  घरी आल्यावर हरिदासने तिच्याकडे शरीरसंबंधांची मागणी केली. मात्र तिने नकार देताच हरिदास संतापला. त्याने बुटाच्या लेसने गळा आवळून तिची हत्या केली. हत्येनंतर त्याने तरुणीचा मृतदेह इमारतीत जिन्या खाली टाकून दिला. इमारतीतील एका रहिवाशाने तिचा मृतदेह बघितला. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. इमारतीतील अन्य रहिवाशांना तरुणीबाबत माहिती आहे का याचा शोध घेण्यात आला. मात्र यानंतर हरिदासच्या फ्लॅटजवळील रक्ताच्या डागामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला आणि या खुनाचा उलगडा झाला. पोलिसांनी हरिदासला अटक केली आहे. तरुणी तिच्या कुटुंबीयांना न सांगताच नालासोपाऱ्याला आली होती, असे समजते. घटना घडली त्या वेळी हरिदासची बहीण घरी नव्हती.