हौशी छायाचित्रकार के. सी. नय्यर यांचा संग्रहित ठेवा रसिकांसाठी खुला

हौशी छायाचित्रकार के. सी. नय्यर यांच्या संग्रहातील २०० दुर्मीळ छायाचित्रण कॅमेऱ्यांचा ठेवा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला मिळाला आहे. लवकरच हा ठेवा रसिकांना पाहण्याकरिता खुला होईल. यात काही व्हिण्टेज कॅमेरे, पोलोराईड कॅमेरे, मॅजिक लँटर्न अशा विविध प्रकारच्या छायाचित्रण कॅमेऱ्यांबरोबरच चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारे अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांनी त्यांच्या मोहिमेत वापरलेल्या टेलिस्कोपची प्रतिकृती यांचा समावेश आहे.

मुंबईत उभ्या राहिलेल्या पहिल्यावहिल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील ठेवा वाढविण्याकरिता फिल्म डिव्हिजनने कंबर कसली आहे. त्यासाठी चित्रपटविषयक संग्राहकांनी त्यांच्याकडील दुर्मीळ ऐवज संग्रहालयाला द्यावा, असे आवाहन फिल्म डिव्हिजनचे डायरेक्टर जनरल प्रशांत पाठराबे यांनी केले आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून नय्यर यांची कन्या शोभा नय्यर यांच्याकडून २०० कॅमेरे संग्रहालयाने मिळविले आहेत. के. सी. नय्यर यांना कॅमेऱ्यांचा छंद होता. ते उत्कृष्ट कॅमेरामन होते. त्यांच्या संग्रही असलेल्या या कॅमेऱ्यांची माहिती काढण्यासाठीच दोन वर्षे लागल्याचे शोभा नय्यर यांनी सांगितले.

कोलकाता येथील एका संग्राहकाकडून वेशभूषांचा संग्रहसुद्धा संग्रहालयाला मिळणार आहे. संग्रहालयातील प्रादेशिक चित्रपटविषयक विभागही समृद्ध करण्याची गरज पाठराबे यांनी व्यक्त केली. यात मराठी चित्रपटासंबंधी आणखी दस्तावेज मांडण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संग्रहालयाच्या कामाचा विस्तार करण्याकरिता दुर्मीळ चित्रपटांचे सादरीकरण, चित्रपट महोत्सव, कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र राज्य पर्यटन मंडळाच्या मदतीने पर्यटकांकरिता उपक्रम राबविण्यासाठी संग्रहालय प्रयत्न करणार आहे.

संग्रह वाढण्यासाठी प्रयत्न

फिल्म डिव्हिजनने विमल रॉय यांच्या कन्या रिंकी रॉय भट्टाचार्य, रणधीर कपूर, तेलुगू चित्रपटसृष्टीतील एन. टी. रामाराव, मामुटी अशा दिग्गजांच्या नातेवाईकांशी म्हणजेच नागेश्वरराव, रामकुमार, एम. जी. रामचंद्रन यांच्याकडील दुर्मीळ संग्राह्य़ वस्तू संग्रहालयासाठी मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे पाठराबे यांनी सांगितले. त्याचबरोबर बाबुराव पेंटर यांच्या चित्रपटांशी संबंधित संग्रहासाठी संबंधितांशी चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर मुंबईस्थित चित्रपटनिर्मिती संस्थांशीही चर्चा सुरू आहे.