पुढील महिन्यात होणारी महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नवी मुंबईतील गणेश नाईक यांच्या साम्राज्याला आणखी धक्का देण्याच्या उद्देशाने भाजपने पद्धतशीरपणे पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून गावठाण क्षेत्रातील सुमारे २० हजार अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत केली. भाजपला अनुकूल ठरतील, असे निर्णय घेण्याचा धडाका मुख्यमंत्र्यांनी लावला आहे.
नवी मुंबईतील धोकादायक इमारतींच्या पुनर्बाधणीसाठी अडीचपर्यंत चटईक्षेत्र निर्देशांक मंजूर केल्यावर आता गावठाणातील अनधिकृत बांधकामे नियमित करताना त्यांच्यासाठी समूह विकास योजना (क्लस्टर ) लागू करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
विधानसभा निवडणुकीत बेलापूर मतदारसंघात भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांचा पराभव केला होता. या पाश्र्वभूमीवर महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने जोर दिला आहे. वर्षांनुवर्षे रखडलेल्या अनधिकृत बांधकामांचा विषय मार्गी लावल्याबद्दल आमदार मंदा म्हात्रे यांनी सभागृहातच मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. गणेश नाईक आणि राष्ट्रवादीला नवी मुंबई महापालिकेत रोखण्याची भाजपची योजना आहे.
नवी मुंबईतील गावठाण क्षेत्राचा सामूहिक विकास योजनेंतर्गत विकास करण्यासाठी चापर्यंत कमाल चटईक्षेत्र निर्देशांक मंजूर करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
सामूहिक विकास योजनेला मान्यता मिळाल्याने नवी मुंबई गावठाणातील सुमारे २० हजार घरे नियमित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यातील १४ हजार घरे नवी मुंबई महापालिकेच्या तर सहा हजार घरे ‘सिडको’च्या हद्दीतील आहेत.

योजनेची प्रमुख उद्दिष्टे
*घरे नियमित करून त्या परिसरात पायाभूत सुविधा उपलब्ध करणे
*१२.५ टक्के भूखंडांवर कशाही प्रकारे बांधण्यात आलेल्या घरांचा नियोजनबद्धरीत्या पुनर्विकास शक्य.
*समूह विकास योजनेसाठी भूखंडाचे किमान क्षेत्र चार हजार चौरस मीटर ही अट ठेवण्यात आली आहे. पण नियोजनाच्या दृष्टीने अडचणीचे ठरतील अशा ठिकाणी हे क्षेत्र दोन हजार चौरस मीटर राहील.
*चापर्यंत चटईक्षेत्र निर्देशांक वापरता येईल तसेच घराच्या एकूण क्षेत्रफळाच्या २५ टक्के वाढीव क्षेत्रफळ मिळू शकेल.