मुंबई पोलिसांनी २२ वर्षांच्या महिलेला १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलाशी लग्न केल्याप्रकरणी अटक केली आहे. बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पॉक्सो) या महिलेवर कारवाई करण्यात आली आहे. तर महिलेने त्या मुलाशी वर्षभरापूर्वीच लग्न केल्याचा दावा असून आम्ही संमतीनेच शरीरसंबंध ठेवले होते, असे त्या महिलेचे म्हणणे आहे. सध्या महिला भायखळा तुरुंगात असून तिने जामिनासाठी अर्ज देखील केला आहे.

कुर्ला पोलिसांकडे गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये एका महिलेने तक्रार दिली होती. तिला १७ वर्षांचा मुलगा आहे. ‘माझ्या मुलाचे २२ वर्षांच्या तरुणीने अपहरण करुन स्वत:च्या घरात डांबून ठेवले. तिने बळजबरीने त्याच्याशी लग्न केले’ असा आरोप तिने केला होता. या प्रकरणी पोलिसांनी पाच दिवसांपूर्वी २२ वर्षांच्या महिलेला अटक केली आहे. महिलेला ४ महिन्यांची मुलगी देखील आहे. ‘मी त्या मुलाशी लग्न केले असून तो १८ वर्षांचा आहे. आम्ही संमतीनेच शरीरसंबंध ठेवले होते. आम्हाला चार महिन्यांची मुलगी देखील आहे’, असे आरोपी महिलेने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी महिलेला पॉक्सो अॅक्ट, बालविवाह प्रतिबंधक कायदा व अन्य कलमांखाली अटक केली आहे.
आरोपी महिला तिच्या चार महिन्यांच्या मुलीसह गेल्या पाच दिवसांपासून भायखळा तुरुंगात आहे. तिने आता जामिनासाठी अर्जदेखील केला आहे. या अर्जावर शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

मुलाच्या आईचे म्हणणे काय?
मुलाच्या आईने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार २३ नोव्हेंबर २०१७ रोजी संबंधित तरुणी तिच्या आई- वडिलांसह आमच्या घरी आली. तिने माझ्या मुलाला धमकी दिली. यानंतर माझा मुलगा तिच्यासोबत निघून गेला आणि पुन्हा घरी परतलाच नाही. माझ्या मुलाला तिने दरवेळी आत्महत्येची धमकी दिली आणि म्हणून तो तिच्यासोबत राहतोय, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. आरोपी महिला घटस्फोटित असून तिचे पूर्वी दोन लग्न झाले होते, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

आरोपी महिलेचे म्हणणे काय?
‘मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार तिला दोन मुली आणि एक मुलगा आहे. तिच्या मोठ्या मुलीचे वय २० वर्ष, दुसऱ्या मुलीचे वय आठ वर्ष असताना मुलगा १७ वर्ष ८ महिन्यांचा कसा काय ?’, असा मुद्दा महिलेने वकिलांमार्फत न्यायालयात उपस्थित केला आहे.