शैलजा तिवले

‘आरोग्यवर्धिनी’मध्ये रूपांतरित झालेल्या राज्यातील एक हजार १३० उपकेंद्रांमध्ये लवकरच एचआयव्ही, मधुमेह, डेंग्यू, हिवताप, क्षयरोग इत्यादी २५ प्राथमिक आरोग्य चाचण्या मोफत करण्यात येणार आहेत. या केंद्रावर पूर्णवेळ वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती झाली असून येत्या महिनाभरात ही सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंतची रुग्णांची पायपीट थांबेल.

राज्यात १ हजार ८२३ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १० हजार ६३८ उपकेंद्रे चालविली जातात. आदिवासी भागांमध्ये सुमारे तीन हजार आणि बिगर आदिवासी भागांमध्ये सुमारे साडेपाच हजार लोकसंख्येमागे एक आरोग्य उपकेंद्र सेवा देते. सर्वसाधारणपणे उपकेंद्रामध्ये आरोग्य सेवक, सेविका आणि एक अंशकालीन परिचारिका असतात. हे उपकेंद्र आठवडय़ातून दोन किंवा तीन वेळा सुरू असते. तेथे प्रथमोपचार, प्रसूतीपूर्व तपासणी आणि किरकोळ आजारांवर औषधोपचार, कुटुंब कल्याण, माता बाल संगोपनविषयक सल्ला या बरोबरच क्षयरोग, कुष्ठरोग आणि हिवतापाच्या रुग्णांवर उपचार इत्यादी मर्यादित सेवा देण्यात येतात. या उपकेंद्रांमध्ये प्रथमच पूर्णवेळ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करून त्यांचे रूपांतर अद्ययावत अशा आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये करण्यात येणार आहे. राज्यातील १९ जिल्ह्य़ांमधील एक हजार १३० उपकेंद्रामध्ये आयुर्वेद पदवीधारक पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी म्हणून मार्चपासून रुजू झाले आहेत.

त्यामुळे या केंद्रावर आता दररोज बाह्य़रुग्ण विभाग सुरू आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून आता या केंद्रामध्ये आरोग्य चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. यात मधुमेह, सीबीसी, लघवी, यकृत, मूत्रपिंड कार्यक्षमता, गर्भधारणा, कोलेस्टेरॉल इत्यादी प्राथमिक २५ आरोग्य चाचण्यांचा समावेश आहे.

डेंग्यू, हिवताप, मधुमेह या साध्या चाचण्यांसाठीही रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रावर जावे लागते. तेथे गर्दीमध्ये ताटकळत बसावे लागते. या चाचण्या उपकेंद्रावर होऊ लागल्यानंतर रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रावर जाण्याची आवश्यकता नाही. येत्या सहा महिन्यांत सर्व उपकेंद्रांवर मोफत आरोग्य चाचण्या सुरू करण्यात येतील. – डॉ. विजय कंदेवाड, साहाय्यक संचालक, आरोग्य संचालनालय