खासगी रुग्णालयांमध्ये प्राणवायूचा तुटवडा निर्माण झालेला असताना आता बोरिवलीतील पालिकेच्या भगवती रुग्णालयातही प्राणवायूची चणचण निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे २५ करोना रुग्णांना अन्यत्र हलवण्याची वेळ ओढवली.

प्राणवायूवर असलेल्या या २५ रुग्णांना शुक्रवारी दहिसर जम्बो करोना केंद्र आणि कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात हलविण्यात आले. भगवती रुग्णालयात फक्त दोन ते तीन दिवस पुरेल इतका प्राणवायूचा साठा असल्याने पालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतल्याचे समजते.

मुंबईसह राज्यात वैद्यकीय प्राणवायूचा तुटवडा निर्माण होत असल्याचा प्रकार घडकीस आला आहे. अनेक खासगी रुग्णालयात प्राणवायूच्या तुटवड्यामुळे एकाच वेळी अनेक रुग्ण दगावल्याच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे पालिके ने मुंबईमधील रुग्णालयांतील प्राणवायूचा पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी सहा समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती नुकतीच केली आहे. त्यातच शुक्रवारी भगवती रुग्णालयात फक्त दोन ते तीन दिवस पुरेल इतका प्राणवायूचा साठा असल्याचे लक्षात आले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून २५ रुग्णांना हलविण्यात आले आहे. यातील दोन ते तीन रुग्ण हे अतिदक्षता विभागातील होते.

भगवती रुग्णालयात रुग्णांना पारंपरिक पद्धतीने सिलिंडरमधून प्राणवायू दिला जातो. प्राणवायूचे सिलिंडर संपल्यास आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून रुग्णांना आधीच हलविण्यात आल्याचे समजते. यापैकी २५ रुग्णांना दहिसर जम्बो करोना केंद्र आणि शताब्दी रुग्णालयात हलविण्यात आले.

या दोन्ही ठिकाणी मोठ्या टाक्यांमध्ये प्राणवायू साठवला जातो. त्यामुळे रुग्णांना तिथे हलवण्यात आले असल्याची माहिती आरोग्य समिती अध्यक्ष राजूल पटेल यांनी दिली. रुग्णालयातील प्राणवायूच्या साठ्याचे नियोजन करण्यासाठी योग्य खबरदारी घेण्यात येत आहे. त्यासाठी विशेष समन्वय अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.