रोजगार हमी विभागाचे स्पष्टीकरण

महाराष्ट्राच्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेतून रोजगार हमी विभागाच्या माध्यमातून ‘महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने’अंतर्गत चालू आर्थिक वर्षांत ५५५ शेततळी पूर्ण झाल्याचे केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अहवालात म्हटले असले, तरी राज्याच्या ‘रोहयो’ विभागाच्या खुलाशानुसार, राज्यात या योजनेतून या कालावधीत २७८ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत.

केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, गेल्या एप्रिलपासून राज्यात ५५५ शेततळी पूर्ण झाल्याचे ‘लोकसत्ता’च्या ७ जुलैच्या अंकात ‘शेततळ्यांच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचे कागदी घोडे’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले होते. त्यावर आज राज्याच्या रोजगार हमी विभागाने केलेल्या खुलाशात म्हटले आहे की, १० ऑक्टोबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार रोहयो विभागामार्फत सुरू झालेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेअंतर्गत १ लाख ११ हजार १११ शेततळी बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. २०१६-१७ या कालावधीत २,६३१ शेततळ्याची कामे पूर्ण झाली आहेत, तर २०१७-१८ मध्ये २७८ कामे पूर्ण झाली आहेत. योजना सुरू झाल्यापासून ६ जुलै २०१७ पर्यंत संपूर्ण राज्यातून २ लाख ७२ हजार ८४३ अर्ज प्राप्त झाले असून ४५,०६६ कामे पूर्ण झाली आहेत, असाही दावा या खुलाशात करण्यात आला आहे. औरंगाबाद विभागात एकूण ८९,२८८ अर्ज प्राप्त झाले असून ४,९३५ कामे पूर्ण झाली आहेत, असेही म्हटले आहे. राज्य शासनाच्या रोजगार हमी योजना विभागाच्या संकेतस्थळावर मात्र, पूर्ण झालेल्या शेततळ्यांची संख्या सुमारे ३७ हजार ६०० एवढी दिसते. याच संकेतस्थळावरील माहितीनुसार प्राप्त अर्जाची संख्या २ लाख २१ हजार ८९७ एवढी असून तांत्रिकदृष्टय़ा पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची संख्या ५८ हजार १४० एवढी आहे.

केंद्राच्या अधिकृत संकेतस्थळावरही देशभरातील पूर्ण झालेल्या शेततळ्यांची आकडेवारी असून ६ जुलै २०१७ रोजीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात चालू आर्थिक वर्षांत पूर्ण झालेल्या शेततळ्यांची संख्या ५५५ इतकी आहे. राज्याच्या अधिकृत संकेतस्थळावरील आकडेवारी, राज्य शासनाच्या रोजगार हमी योजना विभागाने केलेले स्पष्टीकरण आणि केंद्र सरकारच्या संकेतस्थळावरील माहिती यामधील तफावत नेमक्या आकडेवारीबाबत संभ्रम वाढविणारी असल्याचे दिसत आहे.