मौजमजा करण्यासाठी तीन मित्रांनी एकत्र येऊन सराफाचे दुकान लुटण्याची योजना आखली. कुर्ला येथील संघवी ज्वेलर्सच्या दुकानात त्यांनी पद्धतशीरपणे चोरीही केली. थोडेथोडके नव्हे तर तब्बल तीन कोटींचे घबाड त्यांच्या हाती लागले. पण शेवटी पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचलेच आणि त्यांचे मनसुबे धुळीस मिळाले.
कुर्ला पश्चिमेला न्यू मिल रोड येथे रतनचंद जैन यांचे ६० वर्षे जुने ‘आर. आर. संघवी अ‍ॅण्ड कंपनी’ नावाचे दागिन्यांचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात ३० जानेवारी रोजी पाच लाखांची रोख रक्कम आणि दहा किलो दागिने मिळून सुमारे तीन कोटी रुपयांची चोरी झाली होती. दुकानात सहा महिन्यांपासून काम करणारा नोकर प्रमोद भाटी (२२) हा बेपत्ता होता. त्यामुळे तोच या प्रकरणातला संशयित होता. कुर्ला पोलिसांनी या तपासासाठी एकूण चार पथके स्थापन केली. प्रमोदचा मोबाईल बंद होता. पोलीस त्याच्या गुजरातमधील पालनपूर गावी पोहोचले. तेव्हा त्याचा कल्पेश पटेल नावाचा मित्रही बेपत्ता असल्याचे समजले. त्यामुळे पोलिसांनी कल्पेशच्या मोबाईलवर लक्ष ठेवले. मोबाईल लोकेशनवरून कल्पेश दिल्लीत असल्याचे समजले आणि पोलिसांनी दिल्लीत जाऊन कल्पेश पटेल आणि प्रमोदला अटक केली. त्यांनी चोरलेला मुद्देमाल पालनपूर येथील भाविन मोदी या तिसऱ्या मित्राच्या घरी ठेवला होता. तो पोलिसांनी जप्त केला.
याबाबत माहिती देताना परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी म्हणाले की, गुरुवारी दुकान बंद असते. त्यामुळे कल्पेश आणि भाविन मुंबईत आले होते. दुकानाची चावी शेजारच्या के. के. ज्वेलर्सकडे असते. दुकानात नोकराचे काम करणाऱ्या प्रमोदने आतील तिजोरी मुद्दामहून उघडी ठेवली होती. मग तिघांनी आतील तिजोरीवर डल्ला मारला. त्यानंतर ते पालनपूरला पळाले. चोरलेले दागिने पालनपूरला भाविन मोदीच्या घरी ठेवून पुढे दिल्लीत गेले.
प्रमोदचे काका या दुकानात काम करतात. त्यांच्या ओळखीने प्रमोद येथे कामावर लागला होता. मध्यंतरी तो गावी गेला असता कल्पेश आणि भाविन हे मित्र भेटले. तिघांनी एकत्र येऊन मौजमजेसाठी दुकान लुटण्याची योजना बनवली होती, असे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणात चोरीला गेलेला शंभर टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहायक पोलीस आयुक्त प्रकाश लांडगे, कुल्र्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सर्जेराव जगदाळे आदींच्या पथकाने आरोपींना गजाआड केले.