पोलिसाची नोकरी म्हटलं की अनेक प्रकाराच्या लोकांचा पोलिसांना सामना करावा लागतो. अनेकदा पोलिसांची चूक नसतानाही त्यांना दोष दिला जातो. त्यामुळेच पोलिसाची नोकरी हे सर्वात कठीण कामांपैकी एक मानले जाते. नुकतेच राजस्थानमध्ये एका पोलिसाला जमावाने मारहाण केली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. एका छोट्या बाचाबाचीवरुन हा वाद हणामारीपर्यंत गेला आणि त्यातच या पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला. पोलीस आणि नागरिकांमध्ये होणाऱ्या वादाच्या घटना देशभरात वारंवार घडताना दिसतात. मुंबईमध्येही नुकताच एका पोलीस हवालदाराला तीन मद्यधुंद तरुणांचा विचित्र अनुभव आला. या तीन तरुणांनी १६ जुलैच्या रात्री दारुच्या नशेत ऑन ड्युटी पोलीस हवालदाराला बळजबरीने गाडीमध्ये बसवत त्याचे अपहरण केले.

चेंबूरमधील चेड्डा नगर परिसरामधून दारुच्या नशेत तीन तरुण गाडीतून प्रवास करत होते. त्यावेळी त्यांनी अचानक रस्त्यामध्ये गाडी थांबल्याने वाहतूक कोंडी झाली. त्यावेळी या तरुणांना समजवण्यासाठी एक पोलीस हवालदार घटनास्थळी दाखल झाला. त्या पोलीस हवालदाराला त्यांनी बळजबरीने गाडी बसवले आणि त्याला चेंबुरहून थेट घाटकोपरला घेऊन गेले.

मिळालेल्या माहितीनुसार, चेंबूरमधील चड्डा नगर भागात होंडा सीटी गाडी रस्त्याच्या मधोमध पार्क करण्यात आल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यावेळी त्या परिसरात कार्यरत असणारे पोलीस हवालदार विकास मुंडे हे घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा करड्या रंगाची होंडा सिटी गाडी रस्त्याच्या मधोमध उभी असल्याने मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे मुंडे यांना दिसले. मुंडे यांनी गाडीच्या खिडकीच्या काचेवर हात मारु ती उघडायला लावली. खिडकीची काच उघडल्यानंतर मुंडे यांनी गाडीत डोकावले असता समोर बसलेली व्यक्ती नशेत असल्याचे त्यांना दिसले. गाडीमधून दारुचा वास येत होता तसेच गाडीत बियरचे अनेक कॅन्स पडल्याचे मुंडेंना दिसले. मुंडे यांनी या तिघांना गाडी रस्त्याच्या बाजूला लावण्यास सांगितले. त्यावेळी नशेत असणारे हे तिघेजण खाली उतरले आणि मुंडे यांच्याशी वाद घालू लागले. ‘त्या तिघांनी एकाच वेळी माझ्यावर हल्ला केला. मला शिवीगाळ करत ते बुक्के मारु लागले. त्यांनी मला गाडीमध्ये ढकलले. काही कळण्याच्या आतच मी गाडीमध्ये होतो आणि गाडी वेगाने धावत होती,’ असं मुंडे यांनी सांगितले. घडलेल्या प्रकाराबद्दल मुंडेच्या सहकाऱ्यांनी कंट्रोल रुमला कळवले. कंट्रोल रुमने ही माहिती विक्रोळीमध्ये तैनात असणाऱ्या पोलिसांच्या तुकडीला दिली. या पोलिसांनी लगेचच या होंडा सीटी गाडीचा पाठलाग सुरु केला. बराच वेळ पाठलाग केल्यानंतर मुंडे यांच्याकडी वॉकीटॉकीच्या मदतीने त्यांनी घाटकोपरमध्ये पूर्व द्रुतगती मार्गावर या गाडीला गाठले. पोलिसींनी या तिघांपैकी दोघांना ताब्यात घेतले तर तिसरी व्यक्ती अंधाराचा फायदा घेऊन निसटण्यास यशस्वी ठरली.

टिळक नगर पोलिस स्थानकातील वरिष्ठ निरिक्षक एस. पी. कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या मुलांची नावे विराज शिंदे (२१ वर्षे) आणि गौरव पंजवानी (२२ वर्षे) अशी आहेत. तर या दोघांचा तिसरा साथीदार राज सिंग याचा पोलीस शोध घेत आहेत. ‘पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले तेव्हा त्यांनी मद्यपान केले आहे की नाही यासंदर्भातील चाचणी करण्यात आली असता या तरुणांनी भरपूर दारू प्यायल्याचे सिद्ध झाले. हे तरुण इतके नशेत होते की ते बोलू ही शकत नव्हते. आम्ही त्यांना मोटर आणि वाहन कायद्याअंतर्गत अटक केली आहे’ अशी माहिती कांबळे यांनी दिली.