वसई-विरार व मिरा-भाईंदर महानगरपालिका परिसरातील वाढत्या लोकसंख्येला पाणी पुरवण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे सूर्या धरणातून ९३३ कोटी रुपयांची योजना आखण्यात आली असून त्यापैकी ३५ टक्के म्हणजेच ३२६ कोटी रुपये जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियानामधून (जेएनएनयूआरएम) मिळावेत अशी मागणी ‘एमएमआरडीए’ने केली आहे.
  याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्यात आला आहे. मुंबईलगत विस्तारत असणाऱ्या नागरी क्षेत्रातील दिवसेंदिवस वाढत असलेल्या लोकसंख्येला पाणी पुरवण्याच्या दृष्टिकोनातून नवीन पाणी योजना हाती घेण्यात येत आहे. वसई-विरार आणि मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात मोठय़ाप्रमाणात लोकसंख्या वाढत आहे. ‘एमएमआरडीए’च्या भाडेतत्त्वावरील घर योजनेतील अनेक प्रकल्प या पट्टय़ात उभे राहत आहेत. त्यामुळे या वाढत्या लोकसंख्येची पाण्याची गरज भागवण्यासाठी सूर्या धरणातून वसई-विरार आणि मिरा भाईंदरला पाणी पुरवठा करण्यासाठी वितरण यंत्रणा उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च ९३३ कोटी रुपये असून त्यापैकी ५० टक्के रक्कम अंमलबजावणी करणारी यंत्रणा या नात्याने ‘एमएमआरडीए’ खर्च करणार आहे. १५ टक्के रक्कम राज्य सरकार देईल. बाकीची ३५ टक्के रक्कम जेएनएनयूआरएमअंतर्गत मिळावी, यासाठीचा प्रस्ताव एमएमआरडीएने पाठवला आहे. पाणी वितरणाची यंत्रणा, वाहिन्या टाकून सूर्या धरणातून रोज ३०३ दशलक्ष लिटर पाणी दोन्ही महापालिका क्षेत्रात नेण्यात येणार आहे.