पालिकेतर्फे आश्रय योजनेअंतर्गत सफाई कामगारांसाठी बांधण्यात येणारी घरे त्यांना मालकी हक्काने देण्यास पालिका सभागृहाने शुक्रवारी एकमताने मंजुरी दिली. पालिका सभागृहाचा हा निर्णय ऐतिहासिक ठरला आहे.
मोडकळीस आलेल्या घरामध्ये वर्षांनुवर्षे सफाई कामगार खितपत पडले आहेत. मुंबई स्वच्छ ठेवणाऱ्या कामगारांच्या वस्त्यांना उकीरडय़ाचे स्वरूप आले आहे. त्यामुळे आश्रय योजन ेअंतर्गत ३५ हजार सफाई कामगारांसाठी घरे बांधण्याची योजना पालिकेने आखली होती. या योजनेच्या प्रस्तावाला सुधार समितीच्या गुरुवारच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. सफाई कामगारांची घरे बांधण्यासाठी ४ चटईक्षेत्र निर्देशांक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रस्ताव शुक्रवारी पालिका सभागृहात सादर करण्यात आला होता. ही घरे सफाई कामगारांना मालकी हक्काने द्यावी आणि अतिरिक्त घरे प्रकल्पग्रस्तांना देण्याची उपसूचना स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी सभागृहात मांडली. या उपसूचनेसह योजनेच्या प्रस्तवास सभागृहाने मान्यता दिली. त्यामुळे सफाई कामगारांना आश्रय योजनेअंतर्गत हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.