कोणतीही पूर्वसूचना न देता काम बंद आंदोलन करून प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या मध्य रेल्वेच्या मोटरमननी शुक्रवारी पुन्हा एकदा आपल्या मनमानी वृत्तीचे दर्शन घडवले. आपल्या एका सहकाऱ्याचे निलंबन मागे घ्यावे, या मागणीसाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या मोटरमननी सायंकाळी मध्य रेल्वेवर अचानक बंद पुकारला. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळेत मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकलसेवा ठप्प होऊन छत्रपती शिवाज टर्मिनसपासून कल्याण-पनवेलपर्यंतच्या स्थानकांत हजारो प्रवासी अडकून पडले. मोटरमनांचे हे आंदोलन पाऊण तासात संपले तरी लोकलगाडय़ांचा गोंधळ रात्री उशिरापर्यंत सुरूच होता.
कामावरून घरी परतण्यासाठी नोकरदार मंडळी रेल्वे स्थानक गाठत असतानाच सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या कार्यकर्त्यांनी सीएसटी स्थानकात अचानक घोषणाबाजी सुरू केली व मोटरमन-गार्ड यांच्यासाठी असलेल्या कक्षाचे दार बंद करून घेतले. त्यामुळे सायंकाळी साडेसहा ते सव्वा सात या काळात हार्बर व मध्य मार्गावरून सीएसटी येथून एकही लोकल सुटू शकली नाही. त्यामुळे सर्व स्थानकांवर प्रचंड गर्दी उसळली.  
मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकेश निगम यांनी आंदोलकांची मागणी मान्य केल्यानंतर सायंकाळी साडेसातच्या सुमारास रेल्वेसेवा सुरू झाली. मात्र, रात्री नऊ वाजेपर्यंत मध्य व हार्बर मार्गाच्या ४४ गाडय़ा रद्द तर ५ गाडय़ा अंशत: रद्द करण्यात आल्याने रात्री उशिरापर्यंत लोकलसेवा विस्कळीत होती. रेल्वेगाडय़ांना झालेली गर्दी पाहून सीएसटी स्थानकाबाहेरून बस पकडण्यासाठीही प्रवाशांनी गर्दी केल्याने बसगाडय़ाही भरून वहात होत्या. या संपूर्ण गदारोळात महिला व ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल झाले. मात्र, आपल्या सहकाऱ्याचे निलंबन रद्द झाल्याचा जल्लोष करणाऱ्या मोटरमनना याची शुद्धही नव्हती!