‘एमआरव्हीसी’ मध्य तसेच पश्चिम रेल्वेबरोबर चर्चा करणार

मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये सहा महिन्यांपूर्वी दाखल झालेली वातानुकूलित लोकल अजून चाचणीसाठीही कारशेडबाहेर आली नसली, तरी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) अशा ४७ नव्या वातानुकूलित लोकल मुंबईत आणण्याची योजना आखली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या ‘एमयूटीपी-३’ योजनेत ५६४ नवीन डबे म्हणजेच १२ डब्यांच्या ४७ गाडय़ा येणार आहेत. या गाडय़ा वातानुकूलितच असाव्यात, असा एमआरव्हीसीचा आग्रह आहे. तरीही मध्य व पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित लोकलची चाचणी सुरू झाल्यानंतर त्या चाचणीच्या निष्कर्षांवरून याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

एमयूटीपी-३मध्ये नव्या गाडय़ांसाठी ३४९१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून १२ डब्यांच्या ४७ नव्या गाडय़ा खरेदी करण्यात येतील. या गाडय़ा कशा असतील, याबाबत एमआरव्हीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारले असता त्याने गोपनीयतेच्या अटीवर ही माहिती दिली. एमआरव्हीसी वातानुकूलित गाडय़ांना प्राधान्य देण्याच्या विचारात असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. मुंबईच्या उपनगरीय भागात एकच वातानुकूलित लोकल आली असून तीदेखील प्रवाशांच्या सेवेत आलेली नाही. या लोकलची संख्या वाढल्याशिवाय त्यांना प्रतिसाद मिळणार नाही. त्यामुळे येणाऱ्या सर्व गाडय़ा वातानुकूलितच घेण्याकडे एमआरव्हीसीचा कल असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

नाही तर बंबार्डिअर!

पश्चिम व मध्य रेल्वेने वातानुकूलित लोकलसाठी प्रतिकूल शेरा दिला, तर या ४७ पैकी काही गाडय़ा वातानुकूलित आणि बहुतांश बंबार्डिअर बनावटीच्या गाडय़ा सेवेत आणल्या जातील. या नव्या गाडय़ांमध्ये अत्याधुनिक सुविधा असतील, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.