News Flash

देशभरातील ४७ हजार गँगमन ‘साहेबा’च्या घरी चाकरीला

मुंबईच्या उपनगरीय परिघात गँगमनच्या वाढत्या अपघातांची संख्या काळजीचे कारण ठरत असताना देशभरातील सुमारे अडीच लाख गँगमनपैकी तब्बल ४७ हजार

| November 4, 2013 12:40 pm

मुंबईच्या उपनगरीय परिघात गँगमनच्या वाढत्या अपघातांची संख्या काळजीचे कारण ठरत असताना देशभरातील सुमारे अडीच लाख गँगमनपैकी तब्बल ४७ हजार गँगमन अधिकाऱ्यांची खासगी कामे करण्यात व्यग्र असल्याचे समजते. हे गँगमन प्रामुख्याने वशिलेबाजीने रेल्वेत लागलेले कर्मचारी असून कष्टाचे काम टाळण्यासाठी ‘नाथा’च्या घरी राबणे पसंत करतात, अशी माहिती रेल्वेतील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. या ‘घरकोंबडय़ा’ गँगमनमुळे गँगमनच्या एकूण कार्यपद्धतीवर परिणाम होत असल्याची टीकाही त्याने केली.
पूर्वी गँगमनच्या मोठय़ा मोठय़ा गँग एकाच वेळी काम करायच्या. या प्रत्येक गँगमध्ये किमान ५० गँगमन होते. त्या वेळी कामाच्या ठिकाणी दोन्ही बाजूंना दोन-दोन गँगमन येणाऱ्या गाडीची सूचना देण्यासाठी उभे केले जात. हे गँगमन प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणापासून अर्धा किलोमीटरच्या परिघात असत. त्यामुळे गाडी येण्याआधीच त्याची माहिती काम करणाऱ्या गँगमनना मिळत असे. मात्र सिमेंटचे स्लिपर्स आल्यापासून काम कमी झाले, असे सांगत रेल्वेने गँगमनची संख्या कमी केली.
सध्या देशभरात मिळून अडीच लाखांच्या आसपास गँगमन काम करत आहेत. मात्र यापैकी जवळपास एकपंचमांश गँगमन हे अधिकाऱ्यांची खासगी कामे करण्यात धन्यता मानणारे आहेत. या गँगमनना ‘लाइनी’वर आणण्याचे प्रयत्न अनेकदा रेल्वे कामगार संघटनांनी केले. मात्र त्याला अद्याप यश आलेले नाही. हे ‘घरकोंबडे’ गँगमन बऱ्याचदा अधिकाऱ्यांच्या वशिल्याने रेल्वेत नोकरीला लागतात. त्यांना प्रत्यक्ष कामाची सवय आणि हौस दोन्ही नसते. मग गँगमनचा पगार घेऊन अधिकाऱ्यांच्या घरची कामे करणे त्यांच्यासाठी सोयीस्कर असते, पण अशा कामचुकार गँगमनमुळे रेल्वेच्या कार्यप्रणालीवर ताण पडत असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
विशेष म्हणजे या ‘घरकोंबडय़ा’ गँगमनविरोधात जुन्याजाणत्या आणि नव्या पण रूळावर काम करणाऱ्या गँगमनमध्येही असंतोषाची भावना आहे. आम्ही घाम गाळत असताना हे लोक साहेबाच्या घरची धूळ साफ करून पगार घेतात. आम्हाला मात्र रेल्वेने वाऱ्यावरच सोडले आहे, अशी भावना काही गँगमननी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती.
सध्या आखडलेल्या संख्येमुळे ५० जणांची गँग ८-१५ जणांचीच बनली आहे. गेल्या दोन महिन्यांत झालेल्या गँगमनच्या अपघातांकडे लक्ष दिले असता किमान ८-१५ जणांची गँगही या ठिकाणी काम करत नसल्याचे लक्षात येते. रविवारी घडलेल्या घटनेत मृत्युमुखी पडलेले चौघे गँगमनच तेथे काम करत होते. त्यांची गँग चौघांचीच होती. त्याशिवाय मध्यंतरी सायन-माटुंगादरम्यान झालेल्या अपघातातही फक्त एकच गँगमन काम करत होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2013 12:40 pm

Web Title: 47000 railway gang man working for officers in all over country
Next Stories
1 डेंग्यूचे मुंबईत सर्वाधिक रुग्ण
2 कल्याणजवळ गाडीची धडक लागून चार गँगमन ठार
3 शुभेच्छांसाठी ‘सर’ मातोश्रीवर
Just Now!
X