उधारी चुकवायची म्हणून आयपीएलच्या सामन्यांची बनावट तिकिटे विकणाऱ्या पाच जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आयपीएलच्या मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स या सामन्याची पाच बनावट तिकिटे या पाच जणांनी विकली होती. मात्र ही तिकिटे बनावट असल्याचे संबंधित लोक वानखेडे स्टेडियमच्या प्रवेशद्वारावर पोहोचल्यानंतरच समजले होते.
२८ एप्रिल रोजी वानखेडे मैदानावर होणारा मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स हा सामना पाहण्याची उत्कंठा अनेकांना होती. त्यानुसार सर्व तिकिटेही विकली गेली. त्याच वेळी सामन्याची तिकिटे मिळतात का, हे पाहण्यासाठी वानखेडेला गेलेल्या मनोज (नाव बदलले आहे) यांना एका व्यक्तीने चढय़ा किमतीत तिकिटे मिळवून देतो, असे सांगितले. मनोज यांनीही पाच तिकिटे विकत घेतली. सामना पाहण्यासाठी मनोज आले असता त्यांना प्रवेशद्वारावर अडवून ही तिकिटे बनावट असल्याचे सांगण्यात आले. त्या वेळी त्यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. त्यानंतर मनोज यांनी मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी चौकशीदरम्यान ३० एप्रिल रोजी नामदेव देडगे या तरुणाला अटक केली. त्याने दिलेल्या जबानीनुसार पोलिसांनी हितेश वेद आणि इब्राहीम खान यांना पकडण्यात आले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे वरळी येथे राहणाऱ्या प्रविण नाईक या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रविण बेरोजगार असून उधारी चुकवण्यासाठी त्याने बनावट तिकिटे तयार केली होती.