शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित आंतरराष्ट्रीय विषयावरील कार्यक्रमातला प्रकार
भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमचे सदस्यत्व मिळावे, याकरिता विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी आयोजित परिषदेत खाद्यपदार्थातून विषबाधा झाल्याच्या दोन घटना मुंबईत गुरुवारी घडल्या. वांद्रे येथील थडोमल सहानी अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच हाजीअली येथील लाला लजपतराय महाविद्यालयात सुमारे ५० विद्यार्थ्यांना ही विषबाधा झाली. त्यांच्यावर रुग्णालयांत उपचार झाले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. त्रास होऊ लागलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे पालक घेऊन गेल्याने अन्नविषबाधाग्रस्त विद्यार्थ्यांची नेमकी संख्या स्पष्ट झालेली नाही.
इंडियन इंटरनॅशनल मॉडेल युनाटेड नेशन्स २०१५-१६ या विद्यार्थ्यांच्याच संस्थेने गुरुवारी वांद्रे येथील सहानी आणि हाजी अलीतील लाला लजपतराय महाविद्यालयासह चर्चगेटचे के. सी. महाविद्यालय आणि व्हिसलिंग वूड्स या ठिकाणी हे कार्यक्रम आयोजित केले होते. कार्यक्रमांसाठी आठवी ते दहावी इयत्तेतील हजारो विद्यार्थ्यांना बोलाविण्यात आले होते.
यातील थडोमल सहानी येथील कार्यक्रमात सुमारे १४०० विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांना बॉक्समधून दुपारचे जेवण देण्यात आले. दुपारी १२.३०च्या सुमारास काही विद्यार्थ्यांना मळमळणे, उलटय़ा होणे असा त्रास होऊ लागला. तीन विद्यार्थ्यांना खारच्या हिंदुजा रुग्णालयात तर दोघांना वांद्रे येथील होली फॅमिली रुग्णालयात नेण्यात आले. आयोजकांनी मुलांच्या पालकांना बोलावून त्यांना घरी घेऊन जाण्यास सांगितले. रुग्णालयात दाखल सर्व मुलांची प्रकृती स्थिर आहे.
लाला महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात १२ विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागला. या विद्यार्थ्यांना भाटिया, ब्रीच कँडी आणि जसलोक रुग्णालयात नेण्यात आले. ताडदेव पोलीस आणि खार पोलीस या घटनेचा तपास करत असून कार्यक्रमाला ‘बॉक्स ८’ या ऑनलाइन कंपनीने खाद्याचे बॉक्स पुरविल्याचे स्पष्ट होत आहे.

जवळपास ५००० विद्यार्थी चार ठिकाणी जमले होते. ‘बॉक्स ८’ या कंपनीला या विद्यार्थ्यांना भात आणि दाल मखनी हे पदार्थ पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले होते. परंतु, भात शिळा होता आणि डाळही आंबट लागत होती. मुलांची प्रकृती बिघडल्यानंतर आम्ही तातडीने उपचार देण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या ‘बॉक्स ८’ या अन्नपुरवठादार कंपनीवर कारवाई झाली पाहिजे.
– ऋषभ शाह, कार्यक्रमाचे आयोजक