भारतीय चलन स्वीकारत नसल्यामुळे प्रवासी आणि सहल आयोजकांची तारांबळ

नेपाळमध्ये भारतातील ५०० आणि एक हजारांचे चलन स्वीकारत नसल्यामुळे पर्यटनासाठी गेलेल्या मुंबईतील हजारो नागरिकांना आणि सहल आयोजकांना याचा फटका बसला आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी आणल्यानंतर देशात आणि देशाबाहेरूनही चांगल्या-वाईट प्रतिक्रिया येत आहेत. नेपाळमध्ये पोहोचल्यानंतर नोटांच्या बंदीची बातमी कळल्यानंतर उपाहारगृह, अतिथिगृह आणि बाजारांमध्ये ५०० आणि १००० रुपयांची नोट स्वीकारत नसल्यामुळे सर्व व्यवहार क्रेडिटवर करावा लागला आहे.

मुंबई-पुण्यातून सुमारे ६० पर्यटकांना घेऊन गेलेल्या विशाल यात्रा या सहल कंपनीच्या आयोजकांना या बंदीचा चांगलाच फटका बसला. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी हे पर्यटक नेपाळमध्ये दाखल झाले होते. मात्र मंगळवारी रात्री ५०० आणि १००० रुपये नोटांच्या बंदीनंतर नेपाळमध्ये भारतीय चलन घेण्याचे नाकारण्यात आले.

त्यामुळे अनेक ठिकाणी पैसे नंतर दिले जातील या ठरावावर व्यवहार करण्यात आला आहे, असे सहलीचे समन्वयक मेराज आलम यांनी सांगितले. प्रवाशांना भारतीय चलन बदलून नेपाळी चलन (नेपालीसी) न मिळाल्यामुळे त्यांना खरेदी करता आली नाही. त्यामुळे अनेक प्रवाशांचा हिरमोड झाला. पहिल्यांदाच नेपाळ फिरण्यासाठी आलेल्या स्वाती भालेराव यांना आपल्या कुटुंबासाठी वस्तू घेण्याची इच्छा होती, मात्र पैसे असतानाही त्यांना खरेदी करता न आल्यामुळे त्यांची निराशा झाली, तर दुसरीकडे मुंबई विद्यापीठातील बहि:शाल विभागातील ३० मुलांचा अभ्यास दौरा उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आला होता. मंगळवारी रात्री हे विद्यार्थी ट्रेनमधून प्रवास करीत होते.

प्रवासासाठी निघालेल्या या विद्यार्थ्यांकडे ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा होत्या. अतिथीगृह आणि वाहनाचे बुकिंग आधीच केले असले तरी रोजच्या खाण्याचा खर्च करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून पैसे जमा करण्यात आले आणि त्यातून जमलेल्या १२ हजार रुपयात विद्यार्थ्यांचा खाण्याचा खर्च भागविला जात असल्याचे अभ्यास दौऱ्यातील विद्यार्थ्यांनी सांगितले.

टोलनाक्यावर वाद

आनंदवन-हेमलकसा-ताडोबा ही सहल आयोजन करणाऱ्या अमृतयात्रा या कंपनीला टोलनाक्याजवळ त्रास सहन करावा लागला. सहलीला जाताना कंपनीचे आयोजक अनिल काळे प्रवासी खर्चासाठी सोबत ५० हजार रुपये घेऊन गेले होते. मात्र बुधवारी टोलवर पाचशे रुपये घेत नसल्यामुळे त्यांचा संबंधित व्यक्तीसोबत वाद झाला. नियम पटवून दिल्यानंतर त्यांच्याकडील ५०० रुपये स्वीकारण्यात आले. नागपुरात हल्दीराम या दुकानात खरेदी करण्यासाठी गेल्यावर ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा घेतल्या जाणार नाहीत, ही पाटी पाहिल्यावर प्रवाशांचा हिरमोड झाला. मात्र शुक्रवारी जाणाऱ्या सहलीत आम्ही तयारीत आहोत, असे काळे यांनी सांगितले.