एक जानेवारी २०१५ ला त्याने खांद्यावर एक बॅग, एक दुर्बीण, टेलिस्कोप आणि कॅमेरा अशा मोजक्याच साहित्यानिशी अंटाक्र्टिकाहून पक्षी पाहण्यास सुरुवात केली आणि ३१ डिसेंबर २०१५ला जेव्हा त्याने ६०४२ वा पक्षी पाहिला, तेव्हा तो भारतात तिनसुखिया येथे होता. कधी जंगलात, तर कधी पाणथळ जागांवर, कधी दुथडी भरून वाहणाऱ्या नदीतून प्रवास करीत, तर कधी अगदी शहरी भागात जेथे जेथे म्हणून पक्षी पाहता येतील अशा तब्बल ४२ देशांत तो वर्षभर भटकत होता. त्याचे नाव नोआ स्ट्रायकर. व्यवसायाने लेखक असणारा केवळ २९ वर्षांचा नोआ, त्याची ही पक्षिदर्शनाची वर्षभराची भटकंती पूर्ण करून नुकताच एक दिवसाच्या मुंबईभेटीवर आला होता.
सध्या जगभरातील पक्षिप्रेमींचे जाळेदेखील खूप मोठे आहे. २०१४ मध्ये चार महिने या सर्वाशी संपर्क साधून मी संपूर्ण प्रवासाची आखणी केली होती. त्यामुळे नेमकी माहिती हातात होती. प्रवासाबाबतचे फारसे चोचले नसतील तर स्वस्तात प्रवास करण्याची अनेक साधने जगात आहेत. त्यामुळेच ६० हजार डॉलरमध्ये माझी ही विश्वपक्षी भ्रमंती पूर्ण होऊ शकली. पक्षी तर पाहिलेच, पण माझ्यासारखेच अनेक पक्षिवेडे त्यानिमित्ताने भेटू शकले हे अधिक महत्त्वाचे, असे त्याने ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
विक्रम हा नंतरचा भाग झाला, पण मुळातच हा प्रवास, त्यातले अनुभव महत्त्वाचे असल्याचे त्याने स्पष्ट केले. भारतातील एकूणच नैसर्गिक भौगोलिक परिस्थितीतील वैविध्य त्याला भावले. मात्र आपल्याकडे पक्षी निरीक्षणापेक्षा पक्षी छायाचित्रणावर अधिक भर देणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे तो नमूद करतो.
सळसळत्या उत्साहाचं मूर्तिमंत प्रतीक म्हणावं लागेल असंच त्याचं व्यक्तिमत्त्व आहे. यापूर्वीचा विक्रम पार करता येईल असे त्याला वाटत होते, त्यातूनच हा प्रवास सुरू झाला. त्याच्या या प्रवासात अनेक रंजक कथादेखील आहेत. लवकरच त्याचे पुस्तक येणार आहे. त्याची ६०४२ वी सिल्व्हर ब्रेस्टेड ब्रॉडबिल ही नोंद वर्षअखेरची आणि भारतात नोंदवलेली असल्यामुळे आपल्यासाठी तर महत्त्वाची आहेच, पण त्यानंतर त्याने ओरिएंटल बे आऊल हा पक्षीदेखील पाहिला आणि त्याचं छायाचित्रदेखील त्याला टिपता आलं. या पक्ष्याचे भारतातील हे पहिलेच छायाचित्रण असण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. अर्थात विक्रमांच्या पलीकडे जाऊन त्याचा भर आहे तो नोंदीवर. त्यामुळे पक्षी निरीक्षण झाल्यावर गाडीत बसताच ‘ई-बर्ड’ या अ‍ॅपवर त्याच्या नोंदी सुरू होतात. ‘ई-बर्ड’ ही पक्षी निरीक्षकांच्या नोंदींची सर्वात मोठी वेबसाइट असून त्यावरील नोंदींना विश्वासार्हता आहे. आजवर पाहिलेल्या एकूण एक प्रजातींची शास्त्रीय नावे, ठिकाणे यासहित सविस्तर नोंदी त्याच्या ब्लॉगवर पाहता येतात.
इंग्लंड, अमेरिकेत एकाच दिवशी अधिकाधिक पक्षी पाहण्याची संकल्पना ‘बिग डे’ म्हणून ओळखली जाते. अशाच प्रकारे एका वर्षांत अधिकाधिक
पक्षी पाहण्याला ‘बिग इयर’ संबोधले जाते. ‘बिग इयर’ नावाचा चित्रपटदेखील आला होता. रुथ मिलर आणि
अ‍ॅलन मिलर यांनी २००८ मध्ये अशा ‘बिग इयर’ भटकंतीमध्ये ४३४१ पक्षी पाहिले होते.