दोन वर्षांतील कारवाई; सरकारी कर्मचारी, पोलिसांचाही समावेश

मुंबई : अपंगांच्या डब्यात घुसखोरी करणाऱ्यांविरोधात मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने केलेल्या कारवाईत गेल्या दोन वर्षांत तब्बल ६५ हजार प्रवाशांना दंड करण्यात आला आहे. त्यात सरकारी कर्मचारी आणि पोलिसांचाही समावेश आहे.

उच्च न्यायालयाने अपंगांच्या डब्यातील घुसखोरीबाबत दिलेल्या आदेशांनंतर कारवाई तीव्र करण्यात आली आहे. जानेवारी २०१७ ते जानेवारी २०१९ दरम्यान मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अपंगांसाठीच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या ६५ हजार घुसखोरांवर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे या डब्यातून पोलीस आणि सरकारी कर्मचारीही सर्रास प्रवास करताना आढळले आहेत.

मध्य व पश्चिम रेल्वेवर लोकलमधील अपंगांच्या राखीव डब्यातून सामान्य प्रवाशांना प्रवास करण्यास मनाई आहे. तरीही नियम गुंडाळून सामान्य प्रवासी त्यात घुसखोरी करतात. त्याचा मनस्ताप अपंगांना सहन करावा लागतो. या विरोधात अपंग प्रवाशांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. न्यायालयाने कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर रेल्वेने बडगा उगारला होता.

माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन गायकवाड यांनी पश्चिम आणि मध्य रेल्वे प्रशासनाकडून अपंगांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्यांवरील कारवाईची माहिती मागवली होती. गेल्या दोन वर्षांत पश्चिम रेल्वेवर ३४ हजार ३३८ सामान्य प्रवाशांनी अपंगांच्या राखीव डब्यात घुसखोरी केली. त्यांच्याकडून ९८ लाख ३० हजार ७०५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मध्य रेल्वेवरही ३१ हजार सामान्य प्रवाशांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यांच्याकडून ७७ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. यात २९ हजार ८५५ पुरुष आणि एक हजार १५१ महिला प्रवासी आहेत.

मध्य रेल्वेवर १४५ सरकारी  कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई झाली असून ६४ जणांविरोधात न्यायालयामार्फत दंडात्मक कारवाई करताना १० हजार ३२० रुपये दंड वसूल केला आहे. चार जणांना तिकीट तपासनीसांनी दंड आकारला आणि ८१ कर्मचाऱ्यांविरोधात त्यांच्या विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे.

लोकलने रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यांच्या तक्रारींची संख्या पाहता रेल्वेकडील मनुष्यबळ अपुरे आहे, अशी प्रतिक्रिया नितीन गायकवाड या अपंग प्रवाशाने दिली.

हेल्पलाइन आणि मनुष्यबळ अपुरे

पश्चिम रेल्वेवर १८२ क्रमांकाच्या पाच आणि मध्य रेल्वेवर याच क्रमांकाच्या सहा हेल्पलाइन २४ तास कार्यरत आहेत. पश्चिम रेल्वेवर त्यासाठी दहा आणि मध्य रेल्वेवर १८ रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी आहेत. पश्चिम रेल्वेच्या हेल्पलाइनवर दिवसाला १०० ते १५० तक्रारी आणि मध्य रेल्वेवर २५ ते ३० कॉल येतात. जानेवारी २०१७ ते जानेवारी २०१९ पर्यंत मध्य रेल्वेवरील १८२ हेल्पलाइनवर २५ हजार ४९२ कॉल आले तर पश्चिम रेल्वेवर ६८ हजार ९२८ कॉल आल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. त्यात ९८७ कॉल हे महिला प्रवाशांनी विविध प्रकारच्या मदतीसाठी केले आहेत.