रसिका मुळ्ये

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) सूचनेनंतरही अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याची भूमिका राज्य सरकारने कायम ठेवली असताना देशभरातील जवळपास ७० टक्के विद्यापीठे परीक्षांबाबत सकारात्मक असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही विद्यापीठांनी परीक्षा घेतल्या असून, अनेक विद्यापीठे ‘यूजीसी’च्या सूचनांनंतर परीक्षेचे नियोजन करत आहेत.

अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत ‘यूजीसी’ने ६ जुलै रोजी विद्यापीठांना सुधारित सूचना केल्या होत्या. त्यानंतरही राज्य सरकारने परीक्षा न घेताच पदवी देण्याची भूमिका कायम ठेवली. मात्र, देशभरातील शेकडो विद्यापीठांची परीक्षा घेण्याची तयारी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘यूजीसी’ने मार्गदर्शक सूचनांवर विद्यापीठांचे मत मागवले होते. त्यास देशातील अभिमत, खासगी, केंद्रीय आणि राज्य विद्यापीठे अशा ६५८ विद्यापीठांनी प्रतिसाद दिला. त्यातील ४५४ विद्यापीठे परीक्षांबाबत सकारात्मक आहेत. यातील अनेक विद्यापीठांच्या परीक्षा घेऊनही झाल्या आहेत, तर काही विद्यापीठे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये परीक्षा घेण्याची तयारी करत आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षा घेण्यासाठी अनेक पर्याय विद्यापीठांना दिले होते. त्यानुसार किंवा प्रसंगी नवे पर्याय शोधून विद्यापीठांनी परीक्षांचे कामकाज पुढे नेले आहे.

विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा हा गेल्या काही दिवसांपासून शैक्षणिक विषयापेक्षा राजकीय विषय झाला. राजकीय पक्ष, संघटनांकडून परीक्षांबाबत वेगवेगळ्या भूमिका घेतल्या गेल्या. दिल्ली येथील केजरीवाल सरकारनेही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करून या वादात उडी घेतली. महाराष्ट्रातील परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचे समर्थन करण्यासाठीही दिल्लीचे उदाहरण दिले गेले. मात्र, दिल्लीतील दोन विद्यापीठांच्या परीक्षांबाबत अद्याप संभ्रम आहे. पाच विद्यापीठांनी यापूर्वीच परीक्षा घेतल्या आहेत, तर एका विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. राज्यातीलही अभिमत विद्यापीठे, खासगी विद्यापीठांनी परीक्षा घेतल्या आहेत. वैद्यकीय विद्यापीठही परीक्षा घेणार आहे. शासकीय विद्यापीठांचे विभाग, संलग्न महाविद्यालये येथे बहुतेक अभ्यासक्रमांच्या पदव्युत्तर पदवीच्या अंतिम सत्रासाठी किंवा वर्षांसाठी असलेले शोधनिबंध, प्रबंध विद्यार्थ्यांनी आधीच जमा केले आहेत, अशी माहिती एका कुलसचिवांनी दिली.

विद्यापीठांच्या परीक्षांची स्थिती

* परीक्षा घेतलेली विद्यापीठे – १८२

* ऑनलाइन, ऑफलाइन किंवा मिश्र पद्धतीने परीक्षा घेण्याचे नियोजन करत असलेली विद्यापीठे – २३४

* परीक्षा घेण्यास संमती आहे; मात्र त्या कशा घ्याव्यात याबाबत शिखर संस्थांच्या सूचनांची प्रतीक्षा करणारी विद्यापीठे – ३८

* अद्याप परीक्षांबाबत संभ्रम असलेली विद्यापीठे – १७७

* नवी असल्यामुळे अद्याप अंतिम वर्षांचे विद्यार्थी नसलेली खासगी विद्यापीठे – २७