लोकसभा निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाचा निर्णय

लोकसभा निवडणुकांमुळे विद्यापीठाच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले असून ७६ परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, तर २७ परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. परीक्षा विभागाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.

ऐन परीक्षांच्या हंगामात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमुळे विद्यापीठांना परीक्षांची वेळापत्रके बदलावी लागली आहेत. पहिल्या टप्प्यातल्या म्हणजे २२, २३ आणि २४ एप्रिलच्या निवडणुकीसाठी तसेच २९ आणि ३० एप्रिल २०१९ या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी विद्यापीठाच्या विविध विद्याशाखेच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेच्या ३०, विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेच्या १७, तर आंतरविद्या शाखेच्या २९ परीक्षा अशा एकूण ७६ परीक्षा वरील पाच दिवसांत सुरू होणार होत्या, त्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर झाल्या आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीमुळे २७ परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेच्या ४, वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेच्या ५ तसेच आंतरविद्याशाखेच्या १८ परीक्षा आहेत. या परीक्षा निवडणुकीपूर्वी सुरू  होत आहेत. यातील काही विषयांच्या परीक्षा या निवडणुकीच्या तारखेदरम्यान येत असल्याने तेवढय़ाच विषयांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

वेळापत्रकांत कमीत कमी बदल करण्याचा विद्यापीठाने प्रयत्न केला आहे. सुधारित वेळापत्रक लवकरच संकेतस्थळावर उपलब्ध होईल, असे परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.

परीक्षांच्या सुधारित तारखा

२५ एप्रिल : बीएससी एरोनॉटिक्स (सत्र-५), टीवाय. बीएससी (एव्हिएशन, सत्र-५), एफवाय. बी-फार्म (सत्र-१) एम.आर्क. ( सत्र-२)

२६ एप्रिल : एमएफएम (द्वितीय वर्ष, सत्र-१),  एमएफएसएम (द्वितीय वर्ष, सत्र-१), एमएचआरडीएम (द्वितीय वर्ष, सत्र-१), एमआयएम (द्वितीय वर्ष, सत्र-१), एमएमएम (द्वितीय वर्ष, सत्र-१), एमईएम (द्वितीय वर्ष, सत्र-१), एम.ओ.एम. (द्वितीय वर्ष, सत्र १), टीवाय. बी-फार्म (सत्र-५).

२ मे : बी.कॉम. (सत्र-६), बीएमएस (सत्र-६).

८ मे : बीएस्सी एरोनॉटिक्स (एव्हिओनिक्स व मेकॅनिक्स, सत्र-६).