आसिफ बागवान

गेल्या चार महिन्यांत दोन लाखांहून अधिक जणांना ब्रिटनचा व्हिसा

अंतिम सामन्याला हजेरी लावण्यासाठीही प्रवासाचे नियोजन

क्रिकेटचा कुंभमेळा मानल्या जाणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत ‘डुबकी’ घेऊन पावन होण्याकडे भारतीयांचा ओढा वाढत चालला असून यंदा ८० हजारहून अधिक भारतीय चाहते या स्पर्धेसाठी इंग्लंडला रवाना होतील, असा अंदाज आहे.

इंग्लंडखेरीज नऊ देशांचे संघ असलेल्या या स्पर्धेला हजेरी लावणाऱ्या पर्यटकांमध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी जाणाऱ्या भारतीयांचा उत्साह इतका आहे की, मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांत ब्रिटनच्या व्हिसासाठी १ लाख ३२ हजार भारतीयांनी अर्ज केला आहे. तर स्पर्धेच्या कालावधीत ब्रिटनला रवाना झालेल्या भारतीयांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत तीन टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे.

यंदाची ही स्पर्धा इंग्लंड आणि वेल्स येथे पार पडत असून ३० मेपासून हा ‘रन’संग्राम सुरू झाला आहे. भारताचा पहिला सामना बुधवारी, ५ जून रोजी साऊथ हम्पटन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. या सामन्याला हजेरी लावण्यासाठी ८० हजारांहून अधिक भारतीय रवाना होतील, असा अंदाज ब्रिटनच्या भारतातील उच्चायुक्त कार्यालयातील प्रवक्त्याने व्यक्त केला.

‘आमच्याकडे व्हिसासाठी भारतातून दररोज साडेतीन हजारांहून अधिक अर्ज येत आहेत. एप्रिल ते जुलै हा ब्रिटनमधील पर्यटनासाठीचा हंगाम असल्याने या काळात येथे येणाऱ्यांची संख्या नेहमीच जास्त असते. मात्र, यंदा विश्वचषक स्पर्धेमुळे त्यात आणखी वाढ झाली आहे,’ अशी माहिती या प्रवक्त्याने दिली.

विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाल्यापासूनच अनेक भारतीयांनी स्पर्धेला हजेरी लावण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे. त्यानुसार जानेवारी महिन्यापासूनच व्हिसासाठी अर्जाचा पाऊस सुरू झाल्याची माहिती ब्रिटनच्या उच्चायुक्त कार्यालयातून देण्यात आली. ब्रिटनचा व्हिसा मिळवण्याची प्रक्रिया हाताळणाऱ्या ‘व्हीएफएस ग्लोबल’ या कंपनीकडील आकडेवारीनुसार जानेवारी ते एप्रिलदरम्यान व्हिसासाठी दोन लाखांहून अधिक अर्ज आले त्यापैकी जवळपास ६५ टक्के अर्ज मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांत आले आहेत. भारतीय क्रिकेटप्रेमींच्या सोयीसाठी ‘व्हीएफएस’ने व्हिसासोबत विमानाचे तिकीट तसेच स्पर्धेतील सामन्यांच्या तिकिटांचे एकत्रित पॅकेजही जाहीर केले आहे. तसेच ऐनवेळी अर्ज करणाऱ्यांना पाच दिवसांत व्हिसा देण्यात येत आहे.

भारतीय क्रिकेटचाहत्यांच्या या उत्साहाचा फायदा भारत-इंग्लंडदरम्यान हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्यांनाही होत आहे. जगभरातील विमान प्रवासी, हॉटेल बुकिंगची नोंद ठेवणाऱ्या ‘ग्लोबल डिस्ट्रिब्युशन सिस्टिम’ या यंत्रणेनुसार विश्वचषकाच्या काळात (३० मे ते १४ जुलै) ब्रिटनला जाण्यासाठी विमान तिकिटे आरक्षित करणाऱ्या भारतीयांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत १७५०५ पेक्षा अधिक आहे. हा आकडा २१ मेपर्यंतचा असल्याने प्रत्यक्षात ही वाढ आणखी असल्याचे सांगण्यात येत आहे.  ‘लंडनला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या पाहता, या देशात क्रिकेट हा धर्म का आहे, याची स्पष्ट प्रचीती येते. भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या सामन्याला हजेरी लावणाऱ्यांचा ओढा वाढल्यामुळे यावर्षी मार्च आणि एप्रिलदरम्यान विमानाची आगाऊ तिकिटे आरक्षित करणाऱ्यांची संख्या ३० टक्क्यांनी वाढली आहे,’ असे ‘मेकमायट्रिप’ या कंपनीचे मुख्य संचालन अधिकारी (सीओओ) विपुल प्रकाश यांनी सांगितले.

पाकिस्तानबरोबरच्या सामन्याचे आकर्षण

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याला उपस्थिती लावण्यासाठी जाणाऱ्या भारतीयांपेक्षाही पाकिस्तानविरुद्धच्या भारताच्या सामन्याला हजेरी लावण्याकरिता जाणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘मेकमायट्रिप’च्याच अधिकाऱ्यांच्या मते, जूनच्या तिसऱ्या आठवडय़ात ब्रिटनला रवाना होणाऱ्या भारतीयांच्या संख्येत गतवर्षीच्या तुलनेत ५० टक्क्यांची वाढ झाली आहे. या आठवडय़ात भारताचे तीन सामने असले तरी, त्यातील १६ जून रोजी होणारा पाकिस्तानविरुद्धचा सामना प्रत्यक्ष पाहण्याच्या इच्छेने जाणाऱ्यांची संख्या निश्चितच जास्त आहे. विशेष म्हणजे, भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचेल, असा दृढ विश्वास असल्याने १४ जुलै रोजी होणाऱ्या अंतिम सामन्याकरिता ब्रिटनला जाणाऱ्यांच्या संख्येत तर गतवर्षीच्या तुलनेत तब्बल १०० टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.

भारतीयांचाच उत्साह अधिक

विश्वचषक स्पर्धेत सहभागी असलेल्या दहा देशांपैकी यजमान देश वगळता अन्य नऊ देशांमधून ब्रिटनमध्ये रवाना होणाऱ्यांत भारतीयांचीच संख्या अधिक असल्याचे निरीक्षण आहे. भारताखालोखाल दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि पाकिस्तान येथून येणाऱ्या क्रिकेटप्रेमींचा क्रमांक लागतो. याउलट विश्वचषक स्पर्धेतील गतविजेत्या ऑस्ट्रेलियातून ब्रिटनमध्ये जाणाऱ्यांची संख्या मात्र काही प्रमाणात घटल्याचे आढळून आले आहे. हा कल स्पर्धेच्या सुरुवातीच्या काळातील हवाई तिकिटांच्या बुकिंगच्या आधारे अनुमानित असल्याने स्पर्धा जसजशी पुढे जाईल तसतसे यात बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.